पंतप्रधान कार्यालय

येणाऱ्या सणांच्या काळात कोरोनाविषयक काळजी घेण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


नव्या नियमांमुळे शेतीक्षेत्राला होणाऱ्या फायद्यांची  चुणूक  महाराष्ट्रातील एका कंपनीने दाखवली :पंतप्रधान

Posted On: 25 OCT 2020 12:54PM by PIB Mumbai

मुंबई, 25 ऑक्‍टोबर 2020

 

अजून, पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार असून दिवाळी, ईद, भाऊबीज, छटपूजा, गुरू नानक देवजी जयंती आदी  सणांच्या काळात कोरोना संकट लक्षात घेऊन संयमाने वागण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात बोलताना आवाहन केले.

सणासुदीला खरेदी करताना व्होकल फोर लोकल हा मंत्र लक्षात ठेवून स्थानिक वस्तूंना प्राधान्य देण्याचे देखील पंतप्रधानांनी आवाहन केले. यावेळी त्यांनी जगभरात प्रसिद्ध होत असलेल्या खादी उत्पादनांचा उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की अध्यात्म, योग, आयुर्वेद याच प्रमाणे भारतीय खेळसुद्धा जगाला आकर्षित करत आहेत, हे सांगताना त्यांनी मल्लखांब खेळाचे उदाहरण दिले आणि अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी प्रसार केलेल्या मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचा त्यांनी उल्लेख केला.

ज्ञानाचा प्रसार केल्याने आपल्याला अपार आनंद मिळतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की ज्ञानासारखं जगात काहीही पवित्र नाही. ज्ञानाचे प्रसार करणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो असे पंतप्रधान म्हणाले.

येत्या 31 ऑक्‍टोबर रोजी असणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवस दिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण काढून पंतप्रधानांनी त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे गांधीजी कसे पोट धरून हसत असतात याचा उल्लेख केला यावरून आपण विनोद बुद्धी जागृत ठेवण्याची शिकवण घेतली पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला एक केले आहे याची देखील पंतप्रधानांनी आठवण काढली. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पुलवामाने कसे स्थानिक उद्योगांच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनवले आहे याचे उदाहरण पंतप्रधानांनी प्रस्तुत केले.

भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार शेतकरी भारतात कुठेही आपले उत्पादन घेऊ शकतो व त्याची चांगली किंमत मिळू शकतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीने शेतकऱ्यांना मका खरेदीच्या मोबदल्याबरोबरच नफ्यातील बोनस देऊन शेती क्षेत्रातील शक्यतांची चुणुक दाखवली आहे असे पंतप्रधान म्हणाले.

येणार्‍या सण उत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी पुन्हा एकदा हात साबणाने धुणे आणि दोन गज अंतर ठेवणे  आणि मास्क वापरणे या गोष्टी करण्याचे आवाहन केले

 

* * *

RT/MC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667443) Visitor Counter : 84