आयुष मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात कोरोना प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश- श्रीपाद नाईक
‘कोरोना योद्ध्यांच्या निःस्सीम त्यागाचा समाजापुढे आदर्श’
Posted On:
22 OCT 2020 5:16PM by PIB Mumbai
पणजी, 22 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज केशव साधना शाळा, डिचोली आणि मणिपाल रुग्णालय, बांबोळी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाविरोधात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लढा देत असलेल्या कोरोना योद्ध्यांनी आपल्या निःस्सीम त्यागातून समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले. ते म्हणाले, कठीण परिस्थितीत बरेच लोक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. मात्र, वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विनातक्रार अहोरात्र काम केले. पीपीई कीट घालून सलग बारा तास काम करणे, याचे कुठेही मोल होऊ शकत नाही. रुग्णांना बरे करण्याबरोबरच समाजाच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्याचे काम सर्व घटकांनी केले आहे. या सेवेबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे श्री नाईक म्हणाले.
आघाडीवरील कोरोनायोद्ध्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सांडू फार्मसीच्या रोगप्रतिकारक शक्ती कीटचे वाटप करण्यात आले.
स्वतः कोरोनाबाधित झाल्यामुळे ही सर्व प्रक्रिया जवळून अनुभवल्याचे नाईक यांनी सांगितले. तसेच त्यांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. मास्कचा वापर, नियमित साबणाने हात धुणे, सामाजिक अंतराचे पालन करणे या बाबींकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये, असे ते म्हणाले.
डिचोली येथील कार्यक्रमाला सभापती राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झांट्ये, सांडू फार्मसीचे संचालक उमेश सांडू यांची तर मणिपाल रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमाला मणिपाल रुग्णालय प्रमुख मनीष त्रिवेदी, डॉ शेखर साळकर यांची उपस्थिती होती.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666801)
Visitor Counter : 125