संरक्षण मंत्रालय

टेरिटोरिअल आर्मीचा स्थापना दिन साजरा

Posted On: 09 OCT 2020 6:40PM by PIB Mumbai

पुणे, 9 ऑक्टोबर 2020


प्रादेशिक सेना अर्थात टेरिटोरिअल आर्मीचा  आज पुणे येथे 72 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. दि. 9 ऑक्टोबर, 1848 रोजी या सेनेची ‘सिटीझन आर्मी’ म्हणून स्थापना करण्यात आली होती. युद्धकाळामध्ये नियमित सैन्याच्या सुरक्षेसाठी दुस-या फळीतील सुरक्षा सहायक म्हणून ‘टीए’ने महत्वपूर्ण भूमिका बजावली.  दारूगोळ्यासंह इतर अतिशय विनाशकारी शस्त्रास्त्रांना आवश्यक जागी पोहोचवणे, युद्धासाठी ती शस्त्रास्त्रे तयार करणे, तसचे विनाशकारी दारूगोळा साठवणूक केलेल्या क्षेत्राचे रक्षण करणे अशी महत्वाची आणि जोखमीची कामगिरी टेरिटोरिअल आर्मीचे जवान पार पाडतात. ‘टीए’मधील सैनिक प्रतिभावान असून अनेक प्रकारच्या कौशल्यपूर्ण कार्यांसाठी ते ओळखले जातात. संरक्षण क्षेत्रामधील त्यांचे योगदान अनेकपटींनी वाढले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या सर्व युद्धांमध्ये टीए बटालियनचा सहभाग होता. त्यांच्या लढाईतील कौशल्यामुळे   हवाई संरक्षण आणि तोफखाना क्षेत्रातील अनेक टिए युनिट यांचे नियमित सैन्य विभागामध्ये रूपांतरण करण्यात आले.  

टेरिटोरिअल आर्मीच्या 72 व्या स्थापना दिनानिमित्त आज -दि. 9 ऑक्टोबर, 2020 ला लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती, जनरल ऑफिसर कमांडिंग- इन- चीफ दक्षिणी कमांड यांनी ‘टीए’मध्ये सेवा करणा-या ज्येष्ठ अधिकारी, ज्युनियर कमिशन अधिकारी, जवान आणि सेनेच्या दक्षिण विभागाच्या अधिका-यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. 

केरळ ते गुजरात आणि अंदमानपर्यंत दक्षिण कमांड विभागामध्ये तेरा इन्फंट्री टी.ए. बटालियन आहेत. यामध्ये कन्नूर, कोइंबतूर, बेळगाव, कोल्हापूर, पुणे येथे त्यांची कायमस्वरूपी स्थाने आहेत.  टी.ए. बटालियनचे सैनिक अतिवृष्टी-महापूर काळात मदत करतात. सुरक्षेसाठी टी.ए.चे बहुतांश जवान काश्मिर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त मराठवाडा भागामध्ये वनीकरणाचे  तसेच राजस्थानातल्या वाळवंटी प्रदेशात इंदिरा गांधी कालव्याचे काम या जवानांनी केले आहे. संकटकाळी तसेच रेल्वे, तेल विपणन यासारख्या महत्वाच्या कामांसाठी टी.ए. बटालियनचे जवान सदैव सज्ज असतात. त्यामुळे टी.ए. सैनिक विविध कौशल्यात पारंगत असणारे लढवय्ये आहेत. भारतीय सैन्य आणि राष्ट्र निर्माणामध्ये त्यांनी मोलाचे योगदान देताना विविध भूमिका बजावल्या आहेत. 

 

 

* * *

M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663196) Visitor Counter : 91


Read this release in: English