सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये गांधी जयंतीनिमित्त चरख्याचे अनावरण
Posted On:
02 OCT 2020 6:29PM by PIB Mumbai
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज 3.5 फुटाच्या स्टीलच्या चरख्याचे अनावरण करण्यात आले. आज गांधी जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनई कुमार सक्सेना यांनी वेब- काॅन्फरन्सच्या माध्यमातून या चरख्याचे अनावरण केले. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले, भारताच्या स्वदेशी चळवळीचे चरखा हा एक प्रतीक आहे. आता स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य यांच्या मार्गाने वाटचाल करतानाही हेच प्रतीक ठेवले असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर अव्वल बनविण्यासाठी दूरदृष्टीने सामाजिक विण घालण्याचे साधन स्वीकारले आहे. समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी या विभागाच्या वतीने अनेक योजना सुरू करून त्यांनी गरीबातल्या गरीब लोकांना आशेचा किरण दाखवला आहे. विशेषतः कोविड-19 महामारीच्या काळामध्ये तर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने देश निर्माणासाठी अतिशय महत्वाची भूमि बजावली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये खादी आणि ग्रामोद्योगाने आर्थिक उलाढालीमध्ये 6.28 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. सरकारने खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातल्या कारागिरांच्या सशक्तीकरणाचे काम हाती घेवून या व्यवसायांना गौरवशाली काळ प्राप्त करून दिला आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज पुन्हा एकदा चरख्याची स्थापना करण्यात येत आहे, ही एक प्रकारे ज्यांनी गांधींजीच्या वारशाचे अनुसरण केले आणि आपले जीवन समर्पित केले, त्यांना आदरांजली आहे. गेल्या चार वर्षात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने देशात विविध ठिकाणी भव्य चरखे बसविण्यात आले आहेत. यामध्ये नवी दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तर जगातला सर्वात मोठा असा अतिशय भव्य चरखा बसविण्यात आला आहे. तसेच दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस भागात राजीव चौकामध्येही स्टीलचा चरखा बसविण्यात आला आहे. मोतिहारी येथे गांधी संग्रहालया समोरच्या चरखा उद्यानामध्येही स्टीलचा चरखा बसविण्यात आला आहे. तसेच साबरमती नदीकिनारी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्व पटवून देण्यासाठी चरखा बसविण्यात आला आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला- काल देशभरामध्ये विविध 150 उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये खादी विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले तसेच कारागिरांच्या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. कुंभारांना चाक देणे, मधमाशी पालनासाठी खोक्यांचे वितरण करण्यात आले, तसेच स्फूर्ती आणि पीएमईजीपी विभागांचे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीता वर्मा यांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. त्या म्हणाल्या, गांधीजींचा चरखा म्हणजे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कारण ही संघटनाच मुळात गांधींच्या विचारसरणीच्या आधारे स्थापने झाली असून तळागाळातल्या कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना एक मजबूत-सशक्त ग्रामीण समुदाय निर्माण करण्याची भावना त्यामागे आहे. आता खादी आणि ग्रामोद्योग आयोग नवनवीन मार्गांचा शोध घेवून काम करीत आहे, असेही वर्मा यांनी सांगितले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने देशातल्या सर्व विक्री केंद्रांवर उत्पादनांवर काही काळासाठी 20 टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच स्वच्छता अभियानातून मोठ्या प्रमाणावर श्रमदान करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासठी केलेले प्रयत्न सर्वांना प्रेरणादायक ठरणार आहेत.
*****
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661065)
Visitor Counter : 135