सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

दिव्यांग व्यक्तींना फिरत्या विक्री केंद्राचे वितरण


दिव्यांग बंधू-भगिनींच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपक्रम: नितीन गडकरी

Posted On: 02 OCT 2020 5:50PM by PIB Mumbai

अमरावती, 2 ऑक्टोबर 2020

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर आज पाच दिव्यांग बंधू-भगिनींना राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते इलेक्ट्रिक सायकल वरील फिरते विक्री केंद्र वितरित करण्यात आले.

खादी व ग्रामोद्योग विकास आयोगाच्या सहकार्याने दिव्यांग बंधू-भगिनींना फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा उपक्रम आर्थिक स्वावलंबन मिळवून देईल, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.

श्री. गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक सायकलवरील फिरत्या खादी व ग्रामोद्योग  विक्री केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. या उपक्रमातून दिव्यांग व्यक्ती त्यांच्या गावातच इलेक्ट्रिक सायकलवर खादीचे साहित्य विकून रोजगार मिळवू शकतील.  खादी व ग्रामोद्योग आयोगाने अशा प्रकारचे स्वयंरोजगाराचे साधन निर्माण करणाऱ्या योजना राबवाव्यात. अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात व नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये वस्त्रोद्योग व्यवसाय भरभराटीसाठी खूप मोठा वाव आहे, या अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोगाने दिव्यांग तसेच होतकरू व्यक्तींसाठी खादीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्यावर भर देऊन अधिक प्रमाणात योजनांची माहिती व जनजागृती करावी असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बंधू-भगिनींना इलेक्ट्रिक सायकलवरील फिरत्या विक्री केंद्राच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्णामाय अपंग निराधार मदत केंद्र, टोंगलाबाद (ता.चांदूर बाजार ) येथे झाला.  केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नयना कडू, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे निदेशक सी. पी. कापसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी टोंगलाबाद येथे उपस्थित होते.

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून फिरते साहित्य विक्री केंद्र आज पाच दिव्यांग बांधवांना वितरित करण्यात आले. या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती खादी व ग्रामोद्योग आयोगाचे निर्मित साहित्य गावोगावी विकून रोजगार मिळवतील यातून त्यांना  पैशाची आवक होईल.

यापुढेही जिल्ह्यातील इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी सायकलच्या माध्यमातून साहित्य विक्री केंद्र मिळवण्यासाठी मागणी नोंदवावी. त्यांना फिरते विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती नयना कडू म्हणाल्या की, दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे, यासाठी फिरते विक्री केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून त्यांना गावोगावी जाऊन खादी साहित्य विकता येईल. दिव्यांग बांधवांना या उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करता येणार आहे. तसेच  खादी उत्पादनांचा प्रचार-प्रसार होण्यासाठीही मदत होणार आहे.

***

RT/MC/DGIPR/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661047) Visitor Counter : 228


Read this release in: English