आयुष मंत्रालय

भारताच्या सर्वांगीण विकासात आदिवासींच्या सहभागाला महत्त्वाचे स्थान: श्रीपाद नाईक


पुण्यामध्ये आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र संस्था व आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या आदिवासी प्रकल्पाचे उद्घाटन

आदिवासी युवक-युवतींना आत्मनिर्भर करण्याचा करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प काम करणार

Posted On: 02 OCT 2020 5:09PM by PIB Mumbai

पुणे, 2 ऑक्टोबर 2020

 

गांधी जयंतीच्या निमित्ताने आज आयुष मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे (एनआयएन) व आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुण्यातील आंबेगाव तालुक्यामधील गोहे बुद्रुक येथे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या आदिवासी प्रकल्प (चिकित्सालय)चे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक व महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री के सी पडवी यांच्या उपस्थितीत वेबिनार द्वारे या प्रकल्पाचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (महाराष्ट्र आणि गोवा राज्य), पुणे; पत्र सूचना कार्यालय, मुंबई; राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे आणि आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रणजीत कुमार, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणेच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी, तसेच आदिवासी विकास विभाग, नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, हे सर्व उपस्थित होते.

प्रकल्पाचे औपचारीक उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘एनआयएन’ व महाराष्ट्र शासनाने एकत्र येऊन आदिवासींसाठी असा प्रकल्प उभा केल्याबद्दल अभिनंदन केले; आणि इतर ठिकाणीही असे प्रकल्प, चिकित्सालये उभी रहावी; त्यासोबतच आदिवासी युवांना काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पुढे आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, भारताच्या सर्वांगीण विकासात आदिवासींच्या सहभागाला महत्त्वपूर्ण स्थान आहे; पण अशिक्षा, कुपोषण, प्रथिनांची कमी, विभिन्न रोग संक्रमण आदिवासींमध्ये दिसून येते, हे लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने या चिकित्सालयाची स्थापना करू शकले याचा खूप आनंद आहे. हे चिकित्सालय स्त्री-पुरुष यांच्यासाठी असून वीस खाटाचे आहे, शिवाय योग सभागृह, निवास, परामर्श कक्ष, प्राकृतिक आहार केंद्र, फिजिओथेरपी, बाह्य रुग्ण विभाग, अंतर्गत रुग्ण विभाग, या सर्व सुविधा आदिवासींना नि:शुल्क उपलब्ध असतील, अशीही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. स्थानिक संसाधनांतून आपले आरोग्य आदिवासींनी राखावे, यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाईल; सोबतच आदिवासी युवांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल, त्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांनी आत्मनिर्भर होणे, निसर्गोपचाराचा प्रसार आणि पंचतत्वाचा उपयोग कसा करावा याचे शिक्षण, या गोष्टी साध्य केल्या जाणार आहेत. पैसे न देता स्थानिक आदिवासी नागरिकांना आपले स्वास्थ राखण्यास मदत होईल. चिकित्सालय सुविधापूर्ण असून नवी दिशा देणारे व देशासाठी हे एक आदर्श केंद्र ठरेल, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. औषधी वनस्पती मार्फत आदिवासींना रोजगार मिळवून देण्याचा भविष्यात प्रयत्न आहे, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभाग मंत्री के सी पडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काही अनुभव सांगितले. महात्मा गांधींच्या तत्वाला धरून प्रकल्प सुरु केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. निसर्गाची ताकद फार मोठी आहे, त्यामुळेच सर्व जग चालत आहे, असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी भागातील नागरिकांना निसर्गाचा आणि वनस्पतींचा परिचय असतो, त्यांना केवळ शास्त्रीय ज्ञान आणि प्रशिक्षण दिल्यास समाजाला त्याचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आयुष मंत्रालयाचे संयुक्त सचिव रणजीत कुमार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले, महात्मा गांधींनी समाजातील दुर्बल घटकासाठी काम झाले पाहिजे, हा आग्रह आयुष्यभर धरला; त्याच आधारावर आज ही योजना पुढे येत आहे. आदिवासींच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून दुर्गम भागातील आर्थिक सुबत्ता नसलेल्या नागरिकांसाठी हे एकक काम करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. सोबतच महाराष्ट्र शासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी ‘एनआयएनला शुभेच्छा दिल्या.

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, नाशिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर ही योजना प्रत्यक्षात यशस्वीपणे सुरू झाली आहे. राज्यातील सुमारे पाचशे आश्रमशाळांमध्ये स्वास्थ्य जपण्यासाठी निसर्गोपचार शिक्षण मुलांना देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आणखी चार प्रकल्प येथे उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले, ज्यामध्ये मसाज प्रशिक्षण, पाककला, योग इत्यादी गोष्टींचा समावेश आहे; ज्याद्वारे चारशे ते पाचशे आदिवासी मुलांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त झाला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. भविष्यात नाशिक मधील दीड ते दोन हजार वैदूना एकत्रित आणून त्यांच्याकडे असलेले औषधी वनस्पतींचे पारंपारिक ज्ञान आणि त्यांना देता असे आधुनिक ज्ञान यांचे आदान-प्रदान करण्यासाठी संमेलन करण्याची योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणेच्या संचालिका डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी केले; तर सूत्रसंचालन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या सोनल तुपे यांनी केले.

*****

S.Pophale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661021) Visitor Counter : 137


Read this release in: English