संरक्षण मंत्रालय

193 वा गनर्स डे 28 सप्टेंबर 2020 रोजी

Posted On: 27 SEP 2020 7:11PM by PIB Mumbai

पुणे,  27 सप्टेंबर  2020

दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस गनर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी 1827 साली 2.5 इंचांच्या तोफांसह फाईव्ह(बॉम्बे) माउंटन बॅटरी या तोफखाना दळाच्या तुकडीची स्थापना करण्यात आली होती. सध्या ती 57 फिल्ड रेजिमेंटचा भाग आहे. दर वर्षागणिक तोफखाना दळाचे सामर्थ्य आणि क्षमतेमध्ये वाढ होत आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, मल्टी बॅरल रॉकेट लाँचर्स, हाय मोबिलिटी गन्स, शत्रूचे रडार उद्ध्वस्त करणारी मॉर्टर्स प्रिसिजन गायडेड म्युनिशन्स, यूएव्ही आणि लक्ष्याचा वेध घेणारी आणि त्यानंतर उद्ध्वस्त ठिकाणांच्या हानीचे मूल्यमापन करणारी इलेक्ट्रो ऑप्टिक उपकरणे अशा साधनसामग्रीमुळे तोफखाना दळाची ताकद वाढली आहे. तोफखाना नेहमीच युद्ध जिंकून देणारा घटक राहिला आहे आणि नव्या युगातील युद्धनीतीमुळे( थेट संपर्काविना युद्ध) भविष्यात या दळाची भूमिका आणि महत्त्व कैक पटीने वाढणार आहे.

तोफखाना रेजिमेंटला समृद्ध परंपरांनी युक्त अशा आपल्या वैभवशाली इतिहासाचा आणि युद्धातील कामगिरीचा अभिमान आहे. ज्या ज्या वेळी देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला त्या त्या वेळी तोफखाना रेजिमेंटने युद्ध जिंकून देण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. या रेजिमेटने अनेक संकटे आणि नैसर्गिक आपत्ती तसेच विपरित परिस्थितीमध्ये देशात मानवतेची सेवा केली आहे. या रेजिमेंटला स्वातंत्र्यपूर्व काळात एक व्हिक्टोरिया क्रॉस, एक उल्लेखनीय सेवा आदेश, 15 मिलिटरी क्रॉस आणि त्यानंतर एक अशोक चक्र, सात महावीर चक्र, नऊ किर्ती चक्र, 101 वीर चक्र, 63 शौर्य चक्र, सहा सेना पदक दंड, 485 सेना पदके आणि इतर अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. कारगील युद्धात बोफोर्स तोफांनी केलेल्या कामगिरीमुळे आधुनिक युद्धभूमीवर तोफखाना दळाची मारक क्षमता निर्णायक भूमिका बजावत असते हे सिद्ध झाले. कारगील युद्धामध्ये शत्रूच्या ठिकाणांचा अचूक वेध घेण्याचे आणि त्यांच्या संरक्षक स्थानांना उद्ध्वस्त करून त्यांची युद्ध करण्याची क्षमता नष्ट करण्याचे काम तोफखाना दळाने केले होते.

अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या समावेशाने भारतीय तोफखाना दळाचे जलदगतीने अतिशय आधुनिक दळामध्ये परिवर्तन होत असल्याने त्यांच्या गनर्सना( गोलंदाजांना) सर्वत्र इज्जत- ओ- इक्बाल – म्हणजे सर्वत्र सन्मान आणि वैभव या घोषवाक्याला साजेशी कामगिरी करण्याचे बळ मिळेल. उपकरणे आणि पूरक प्रणालीच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक होत चाललेल्या प्रमुख शाखांमध्ये तोफखाना दळाचा समावेश होतो. या सर्व आधुनिकीकरण कार्यक्रमांमुळे आणि  मेक इन इंडिया या सरकारच्या उपक्रमांतर्गत तोफखाना दळाचा पल्ला आणि अचूक मारक क्षमता यामध्ये वाढ होणार आहे आणि शत्रूला धडा शिकवण्याच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

गनर्स डे च्या निमित्ताने सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक यांनी तोफखाना रेजिमेंटच्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि भारतीय लष्कर आणि देशासाठी निस्वार्थपणे झोकून देत आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीची प्रशंसा केली आहे. 

 

M.Iyengar/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659618) Visitor Counter : 109


Read this release in: English