आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मुंबई महानगरपालिकेच्या 'मिशन सेव्ह लाईव्हज' मुळे कोविड मृत्यूदर कमी करण्यास मदत

Posted On: 25 SEP 2020 3:13PM by PIB Mumbai

मुंबई, 25 सप्‍टेंबर 2020

 

मुंबईत कोविड 19 च्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी गेल्या दोन महिन्यात मृत्यू दरात मात्र घट दिसून येत आहे. जून महिन्यात 5.8 टक्के असलेल्या कोविड मृत्यूदरात घट होऊन तो आता 4.5 टक्के इतका झाला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी ‘मिशन सेव्ह लाईव्ह्ज’ मुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे.

'मिशन सेव्ह लाईव्हज' अंतर्गत प्रत्येक रुग्णालयातील गंभीर रुग्णांची एक स्वतंत्र यादी तयार केली जाते आणि त्यांच्या उपचारावर सातत्याने लक्ष ठेवले जाते असे काकाणी यांनी सांगितले. दररोज, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टरांशी दोनदा सल्लामसलत केली जाते, टास्क फोर्सच्या सदस्यांमार्फत तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो आणि गंभीर रुग्णांची सतत व्हिडिओच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या मोहिमेचा एक भाग म्हणून, प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या सेवांसह अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले,  त्यांनी मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली" असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त पालिका आयुक्त पुढे म्हणाले की, मुंबईत कोविड रुग्णांच्या घटना मोठ्या प्रमाणात नोंदविल्या जात असल्या तरी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स तसेच शाळा व महाविद्यालये वगळता आता अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे बहुतेक सेवा व व्यवसाय संस्था सुरू झाल्या असून लोकांची वर्दळ वाढली आहे. बीएमसीने चाचणीत 90 टक्के वाढ केली असून त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील बेडची उपलब्धता समाधानकारक असून 17,500 कोविड बेडपैकी जवळपास 5500 बेड रिक्त आहेत. तसेच मुंबईत 8,800 ऑक्सिजन बेड आणि 1,100 व्हेंटिलेटर बेडपैकी जवळपास 10% बेड रिक्त आहेत, असे काकाणी यांनी नमूद केले.

सुरुवातीच्या काही महिन्यांत गंभीर आव्हान निर्माण झालेल्या मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील कोविड रुग्णांचे प्रमाण पालिकेने यशस्वीरित्या कमी केले आहे, असे अतिरिक्त पालिका आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या नोंदवलेल्या सर्व प्रकरणांपैकी 70% रुग्ण हे अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत.  कोविड नियंत्रित करण्यासाठी जनजागृती महत्वाची भूमिका निभावते असे स्पष्ट करत काकाणी यांनी सर्व नागरिकांना कोविड योग्य वागणूक विकसित करण्याचे आवाहन केले.

कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा शिकविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हे थेट संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा सुरू असून दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.

या अभियानांतर्गत कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यविषयक बाबींची माहिती घेऊन त्यानंतर त्यावर उपचार केले जाणार आहेत. यामध्ये कोविड रुग्णांव्यतिरिक्त किडनी संबंधातील तक्रारी, हायपर टेन्शन, मधुमेह अशा इतर आजारांवरही रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार देता यावेत आणि भविष्यातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची तसेच उपचारांसंदर्भातील धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करता यावेत हा या योजनेचा उद्देश आहे असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

या अभियानाच्या कार्यान्वयनासाठी 5700 पथक तयार करण्यात आले आहेत. एका पथकात तीन स्वयंसेवक राहणार असून त्यामध्ये महानगरपालिका कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत दिलेली व्यक्ती, आणि स्वयंसेवी संस्थेचे सदस्य यांचा समावेश असेल असे काकाणी यांनी सांगितले. साधारण 17 हजार जणांचा यात सहभागी असणार असून प्रत्येक पथकाला जिओ टॅगिंग सह एक अँप उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून भेट दिलेल्या घराचे ठिकाण डाउनलोड होऊन त्या घरातील व्यक्तींची माहिती त्यात भरली जाईल आणि घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे उद्दिष्ट साध्य होईलअसे काकाणी यांनी नमूद केले.

 

* * *

R.Tidke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658973) Visitor Counter : 107


Read this release in: English