आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

प्रमुख 10 राज्यांना 'लक्ष्यित कोविड 19 संपर्क अभियान' राबविण्याच्या केंद्राच्या सूचना


प्रमुख भागांमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांचा समावेश

‘कोविड उचित वर्तन’ प्रवृत्त करण्यावर अभियानाचा भर

Posted On: 23 SEP 2020 1:35PM by PIB Mumbai


मुंबई | 23 सप्टेंबर 2020

एकूण कोविड 19 रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण आढळणाऱ्या प्रमुख दहा राज्यांमध्ये 'कोविड19 संपर्क अभियान' राबविण्याच्या सूचना केंद्राने या राज्यांना दिल्या आहेत. हे एक जन संपर्क अभियान असून याद्वारे समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांना कोविडविरुद्धच्या लढ्यात उचित वर्तन करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, ओडिशा, केरळ, तेलंगणा आणि दिल्ली अशी ही 10 राज्ये असून यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत.

तज्ज्ञांशी झालेल्या संवाद आणि मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने संपर्कासाठी प्रमुख मुद्द्यांची यादी केली आहे. या प्रमुख मुद्द्यांमध्ये हाताची स्वच्छता, मास्क घालणे, आणि सुरक्षित अंतर राखणे, गृह विलगिकरणासंदर्भात मार्गदर्शन आदींचा समावेश आहे.

या अभियानाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला जिल्हा स्तरीय संपर्क व्यवस्थापन पथक तयार करण्यास सांगण्यात आले आहे. या संपूर्ण पथकावर जिल्हाधिकारी लक्ष ठेवून असतील. तसेच जिल्हा निरीक्षण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा प्रतिनिधी व इतर तज्ञ या पथकाचे सदस्य असतील. जिल्हा निरीक्षण अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिल.

विशिष्ट उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या अभियानात अन लॉक च्या टप्प्यात कोविड 19 सोबत कसं जगायचं याबाबत लोकांना शिक्षित करणे आणि या साठीच्या आजारात उचित वर्तन राखण्यासंदर्भात प्रवृत्त करणे यावर भर असेल. हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडिया, लोककला आदींचा वापर केला जाणार आहे. डीडी सह्याद्री आणि ऑल इंडिया रेडिओ कोविडसंदर्भातील संपर्काच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सादर करतील, तर एफएम रेडिओ चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सचीही मदत घेतली जाईल.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे जसे की पी आय बी अर्थात पत्र सूचना कार्यालय, ब्युरो ऑफ आऊट्रीच कम्युनिकेशन, सॉंग अँड ड्रामा ट्रायप्स हे विभाग राज्य सरकारच्या संस्थाशी जवळून समन्वयाने कार्य करतील आणि त्यांच्या प्रयत्नांना साहाय्य करतील. राज्यस्तरावर, या मोहिमेचे पर्यवेक्षण महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे महासंचालक करतील.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' 

दरम्यान, कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा शिकविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  ही थेट संपर्क मोहीम सुरू केली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे  2.25 कोटी कुटुंबांपर्यंत दोनदा पोहोचण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. कोविड 19 बद्दल जनजागृती करण्याबरोबरच, मोहिमेतील पथके कोविड19 लक्षणांसंदर्भात प्राथमिक आरोग्य तपासणी देखील करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

R.Tidke/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658105) Visitor Counter : 114