माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन
विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्याप्ती वाढवणार
Posted On:
05 SEP 2020 8:27PM by PIB Mumbai
पुणे दि. ५ सप्टेंबर २०२०
पुढील काही महिने पुण्यातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्या च्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच 'काळजी करू नका काळजी घ्या ' याऐवजी "सावधगिरी बाळगा" असे आवाहन करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, "पुण्यात कोविड19च्या प्रसारावर नजर ठेवण्यासाठी आज तीन बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत राज्य सरकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि इतर अधिकारी होते. दुसऱ्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी सहभागी होते, आणि तिसरी बैठक वर्तमानपत्रांच्या संपादकांसमवेत होती. या बैठकांमध्ये ब-याच सूचना मिळाल्या असून, त्याद्वारे आम्ही काही विशिष्ट कृती योजना तयार केल्या आहेत, अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बाधित व्यक्ती ओळखली जावी व प्रसार थांबावा यासाठी लवकरच सेरो सर्व्हेच्या दुसऱ्या फेरीलाही प्रारंभ करू आणि यावेळी नमुना मोठा असेल, असेही त्यांनी नमूद केले. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मास्क न घालणे यासाठी 500 रुपये तर, सार्वजनिक स्थानी थुंकणे यासाठी 1000 रुपये अशी दंडात्मक कारवाई काटेकोरपणे केली जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. प्रसाराची साखळी तोडण्याची गरज आहे आणि या कामात माध्यमांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे, ते माध्यमांनी करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी यावेळी केले. वेगवेगळ्या एजन्सींमध्ये सर्वांचे समन्वय असणे, हा एक महत्त्वाचा भाग आहे, जो अत्यंत आवश्यक आहे, सोबतच माध्यमांना अद्ययावत माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी साधारण दिवसाआड पत्रकार परिषद संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल, असे आश्वासनही जावडेकर यांनी दिले. शहरातील जंबो हॉस्पिटलसाठी नव्याने कृती योजना आराखडा तयार होईल, जो एक किंवा दोन दिवसात सामायिक केला जाईल. जंबो हॉस्पिटलमध्ये अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक बाधित भरती झाल्याने तिथली व्यवस्था कोलमडली, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत सादरीकरण केले.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि बधितांवर उपचारासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत, याचा आढावा यावेळी सादर केला.
वर्तमानपत्राच्या संपादकांनी आणि प्रतिनिधींनी कोरोनाच्या नियंत्रणासाठी विविध सूचना दिल्या यावेळी केल्या. खाटा व रुग्णवाहिका यांच्या उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी एक ॲप असावे, अशीही एक सूचना यावेळी करण्यात आली. ज्याला केंद्रीय मंत्री तसेच राज्य सरकारचे उपस्थित मंत्री व पुण्याचे अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते, त्यांनी देखील सर्व बैठकांमध्ये सहभागी होऊन, माध्यमांशी संवाद साधला. ऑक्सिजन च्या सुरळीत पुरवठ्यासाठी त्याच्या अधिक उत्पादनाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोना मुळे नुकत्याच झालेल्या पुण्यातील एका पत्रकाराच्या दुःखद निधनाबद्दल चौकशीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा रोकडविरहित सुविधेचा लाभ सर्वांनी नक्की घ्यावा, यासाठी माध्यमांनी अधिकाधिक जागृती करावी, असे आवाहन केले. माहिती, संज्ञापन व शिक्षण या गोष्टींचा वापर करून कोरोना विषयी काम करायला हवे, असे ते म्हणाले.
M.Iyangar/S.Pophale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651657)
Visitor Counter : 134