शिक्षण मंत्रालय
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी स्कॅनिंग ॲपसाठी भारतीय पर्याय विकसित केला
Posted On:
30 AUG 2020 4:50PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने 59 चीनी मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कॅनिंगसाठी आयआयटी मुंबईच्या रोहित कुमार चौधरी, केविन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी ॲप तयार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आव्हानातून प्रेरणा घेऊन या विद्यार्थ्यांनी हे मोफत ॲप तयार केले आहे.
एआयआर स्कॅनर (AIR Scanner) असे मोबाईल ॲपचे नाव असून, 15 ऑगस्ट 2020 रोजी, म्हणजेच स्वातंत्र्यदिनी, त्याचा शुभारंभ करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (Artificial Intelligence) ॲप कागदपत्रं स्कॅन करण्याबरोबरच ज्यांना इंग्रजी वाचनात अडचण आहे, त्यांच्यासाठी कागदपत्रांचे वाचन करेल.
या ॲपविषयी सांगताना रोहित कुमार चौधरी म्हणाले, “सुरुवातीला आम्ही ज्यांना इंग्रजी वाचन कठीण जाते, त्यांच्यासाठी ॲप तयार करण्यावर काम करत होतो. त्याच दरम्यान सरकारने मोबाईल स्कॅनरसह चिनी कंपन्यांच्या ॲपवर बंदी घातली. कॅम स्कॅनर या ॲपवर बंदी घातल्यानंतर आम्ही सर्वेक्षण केले की, लोकांना मोबाईल फोनच्या माध्यमातून कागदपत्रं स्कॅन करण्यास अडचणी येत आहेत. त्यानंतर आम्ही आमच्या एआयआर ॲपमध्ये स्कॅनिंग जोडण्याचा निर्णय घेतला”.
या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरक्षितता आहे. तुम्ही मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन केलेली कागदपत्रं पीडीएफ स्वरुपात जतन केली जातात. एआयर स्कॅनर ॲप वापरकर्त्यांची कोणतीही माहिती गोळा करत नाही आणि सर्व कागदपत्रे फोनच्या लोकल स्टोअरेजमध्ये साठवली जातात. यासाठी आम्ही क्लाऊड स्टोअरेजचा वापर करत नाही. त्यामुळे यात वापरकर्त्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी आहे, असे रोहित कुमार म्हणाले.
प्ले स्टोअरवर आतापर्यंत 1500 जणांनी हा ॲप डाऊनलोड केला आहे. सध्या ॲप अँड्रॉईड फोनधारकांसाठी उपलब्ध आहे, लवकरच तो आयओएस वापरकर्त्यांनाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.hind.airscanner या संकेतस्थळाला भेट द्यावी.
***
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649794)
Visitor Counter : 426