आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लस विकसित करणाऱ्या संस्थांची प्रगती समाधानकारक, आम्ही त्यांना गती वाढवण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवत आहोत- डॉ व्ही के पॉल


कोविडच्या लसीची अंदाजे किंमत सांगण्याची केंद्र सरकारची उत्पादक कंपन्यांना विनंती- डॉ व्ही के पॉल

कोविडनंतर काही रूग्णांना इतर सह-आजार होत असल्याची माहिती, मात्र धोकादायक स्थितीत नाही : डॉ व्ही के पॉल

Posted On: 18 AUG 2020 10:30PM by PIB Mumbai

 

आतापर्यंत देशात 3 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत 8,99,864 चाचण्या करण्यात आल्या. एका दिवसात करण्यात आलेल्या चाचण्यांचा हा आजवरचा विक्रम आहे. त्याचवेळी बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील 19.70 लाखांपर्यंत वाढली आहे (सक्रीय रुग्णांपेक्षा 2.93 पट अधिक), तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या तुलनेत, 25% इतकी झाली आहे.बरे झालेल्या रुग्णांचा दररोजचा सरासरी आकडा 55,000 पेक्षा अधिक आहे, तर रुग्णांचा मृत्यूदर 1.92% इतका आहे. कोविड संदर्भातली गेल्या आठवड्याभरातील ही ठळक माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज सांगितली. नवी दिल्लीत, कोविड विरोधात केलेली कामे, तयारी आणि ताजी स्थिती याविषयी माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चाचण्यांची संख्या वाढत असतांनाही लोक पॉझिटिव्ह निघण्याचा दररोजचा सरासरी दर कमीच आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 10.03 %टक्के असलेला हा दर, गेल्या सात दिवसात 7.72%पर्यंत कमी झाला आहे. रोजचा पॉझिटिव्ह रुग्ण निघण्याचा दर आजकाल 7 ते 8% च्या दरम्यान असतो. तर आतापर्यंत 73.18% रुग्ण या आजारातून बरे झाले असून त्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. वाढत्या चाचण्या, ज्यात RT-PCR आणि  रॅपिड अँटीजेन टेस्ट या दोन्हीचा समावेश आहे  यामुळेही कोविडचा संसर्ग नियंत्रणात येतो आहे. या चाचण्यांमुळे रुग्ण लवकर लक्षात येऊन, त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु होऊ शकतात. कोविडच्या  रुग्णांच्या  सरासरी साप्ताहिक मृत्यूदराचे गुणोत्तर पाहिल्यास, जुलैच्या पहिल्या आठवड्यात 2.89% असलेला हा दर सध्या 1.94% इतका आहे. मात्र हा मृत्यूदर एक टक्याच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे भूषण यांनी संगीतले.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल, यांनी यावेळी सांगितले की, कोविडविषयक साप्ताहिक ठळक आकडेवारी दिलासादायक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढतो आहे, मृत्यूदर स्थिर आहे आणि तो कमीही होतो आहे. मात्र सर्वात महत्वाची उपलब्धी म्हणजे, देशातील एकूण चाचण्यांची दररोजची संख्या आता 9 लाखांपर्यंत पोहोचली आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी, मृत्यू कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे, असं ते म्हणाले. देशाच्या कानाकोपऱ्यात या चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे श्रेय केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, आयसीएमआर, प्रयोगशाळा आणि उद्योग क्षेत्रालाही आहे, असे डॉ पॉल यांनी सांगितले. मात्र, कोविड पासून बचाव करण्यासाठी मास्क, शारीरिक अंतर स्वच्छता इत्यादी उपाय यापुढेही सुरु ठेवाब्वेच लागणार आहेत. त्याबाबत बेफिकीर होऊन चालणार नाही, असंही डॉ पॉल यांनी स्पष्ट केले. याशिवाय सर्वेक्षण आणि प्रतिबंधक धोरणे हा कोविद विरोधातला दुसरा स्तंभही सुरूच ठेवावा लागणार आहे. तिसरा स्तंभ म्हणजे काहीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरु करणे.

लसीविषयी माहिती देतांना डॉ पॉल यांनी सांगितलं की एक लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे, तर इतर दोन लसींची प्रगतीही समाधानकारक असून त्या चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत. आम्ही या सर्व लस विकसित करणाऱ्या संस्थांकडून आढावा घेतला असून, त्यांची प्रगती समाधानकारक आहे, असं त्यांनी सांगितलं. लसीकरण विषयक बाबी आणि पुरवठा साखळीची संपूर्ण तयारी झाली आहे. जेंव्हा केंव्हा गरज लागेल तेंव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारावर लसीकरण विषयक तयारीचे सूक्ष्मपातळीवरील नियोजन लगेच अमलात आणले जाईल असंही ते म्हणाले.

लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरु असून त्यांना सरकारकडून काय सुविधा अपेक्षित आहेत याविषयी बोलणं झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. या लसीची अंदाजे किंमत किती असेल ते सांगण्याची विनंतीही आम्ही उत्पादकांना केली आहे, असं डॉ पॉल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. मात्र यातल्या काही लसींच्या चाचण्या प्राथमिक स्तरावर असल्यामुळे आत्ताच त्याचं मूल्य ठरवणं कठीण आहे. साधारण किंमत किती असू शकेल याचा आम्हाला अंडज आहे, मात्र जसजशी प्रगती होईल तशीच याबद्दल निश्चित माहिती देता येईल. प्रत्येक उत्पादक कंपन्यांना त्यांच्या लस उत्पादन क्षमतेविषयीची आकडेवारी आणि क्षमता वाढविण्यासाठीचाही अंदाज देण्यास सांगितलं आहे, असंही डॉ पॉल म्हणाले.

कोविड नंतरच्या लक्षणांविषयी बोलताना त्यांनी सांगीतल की काही रुग्णांमध्ये कोविड होऊन गेल्यानंतर इतर आजार जसे की, श्वसनाच्या तक्रारी, प्रतिकारशक्तीविषयक तक्रारी, फुफ्फुसांमध्ये गाठी असे आजार आढळले आहेत. शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्राचं या आजारांकडे लक्ष असून, त्याची सविस्तर नोंद ठेवली जात आहे. त्यानुसार उपचारांमध्येही बदल केले जात आहेत. काही प्रमाणात हे आजार आढळत आहेत, मात्र धोकादायक स्तरावर नाही, असंही त्यांनी सांगितलं. मात्र कोरोना विषाणू रुग्ण बारा झाल्या नंतरही त्याला अपाय करू शकतो हे लक्षात घेऊन, आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असंही डॉ पॉल म्हणले.

पीपीई सूटच्या निर्यातीवर संख्यात्मक निर्बंध आहेत. मात्र व्हेंटीलेटरच्या निर्यातीवर असे काही निर्बंध नाहीत, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

कोविड19 चाचण्यांच्या किमतीविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भूषण यांनी सांगितलं की, या चाचण्यांची किंमत आता आणखी कमी झाली आहे. सुरवातीला या किट्स आपण आयात करत होतो त्यामुळे त्यांची किंमत अधिक होती. मात्र, आता या चाचण्यांच्या किट्स सरकारच्या ई-मार्केट प्लेस या पोर्टलवर उपलब्ध आहेत. तसेच किमतीही सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. तसंच किट्स वाजवी दरात मिळविण्यासाठी वाटाघाटी करण्याचे अधिकार राज्य सरकारांनाही देण्यात आले आहेत.

आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना भूषण यांनी सांगितलं की या सर्व उपाय योजनांचे समाधानकारक परिणाम दिसत असले तरीही या लाधैतले शास्त्र खाली ठेवण्याचे वेळ अद्याप आली नाही. कोविड विषयक साप्ताहिक आढाव्यानंतर स्थिती आश्वासक असली तरीही हे आव्हान अजून संपलेलं नाही, असं डॉ पॉल यांनी सांगितलं. अद्यापही हा विषाणू आपल्याला इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे या लढाईत आपले प्रयत्न पुढेही सुरूच ठेवायचे आहेत.

कोविड19च्या आजारातून बरे झालेल्यांची अनेक राज्यात स्वयंसेवक म्हणून मदत घेतली जात आहे. ते कोविड विषयी जागृती करण्यासठी काम करत असून, शहरी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याची विनंती करत आहेत.

कोविड19 महत्वाच्या बाबींविषयक आरोग्य सचिवांनी केलेलं सादरीकरण बघण्यासाठी इथे क्लिक करा.

*****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646847) Visitor Counter : 200


Read this release in: English