संरक्षण मंत्रालय
महाराष्ट्रातल्या संस्थांनी तयार केलेल्या आयुर्वेदिक “पवित्रपाती” या फेस मास्कचे आणि “ औषध तारा” या जीवाणू प्रतिबंधक पोशाखाचे प्रारंभिक वितरण
Posted On:
13 AUG 2020 8:10PM by PIB Mumbai
पुणे, 13 ऑगस्ट 2020
पुण्याच्या डीआयएटी अर्थात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने आयुर्वेदावर आधारित बायोडिग्रेडेबल फेस मास्कचे नॅनोफायबर्स विकसित केले असून ते जिवाणू/ विषाणूंना प्रतिबंध करत विषाणूंना निष्क्रिय करण्याचे कार्य करतात. त्यांना पवित्रपाती असे नाव देण्यात आले आहे.
कोविड 19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष निर्मिती करण्यासाठी पुण्याची डीआयएटी आणि कोल्हापूरच्या सिद्धेश्वर टेक्स्टाईल्स प्रा. लि. या कंपनीदरम्यान जून 2020 मध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला. या कंपनीने आता पवित्रपाती नावाचा आपला पहिला आयुर्वेदिक बायोडिग्रेडेबल फेस मास्क बाजारात विक्रीसाठी आणला आहे. महाराष्ट्रातील मेसर्स सिद्धेश्वर टेक्स्टाईल्स प्रा. लि. या कंपनीने सुरुवातीला 10,000 मास्क तयार केले असून वितरक, विक्री प्रतिनिधी आणि औषधनिर्मिती कंपन्यांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच हे मास्क आता ऍमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध होणार आहेत.
या दोन कंपन्यांमध्ये औषध तारा नावाच्या जीवाणूप्रतिबंधक बॉडीसूटच्या निर्मितीसाठी देखील तंत्रज्ञान हस्तांतरण करार करण्यात आला आहे. हा सूट सुपरहायड्रोफोबिक, जीवाणू प्रतिबंधक आणि आरामदायी आहे. या सूटचे कापड कोविड-19 प्रतिबंधक असल्याची मान्यता मिळाली आहे. या सूटच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या असून तो स्प्लाश रेझिस्टंट आणि कोणत्याही द्रव किंवा तत्सम पदार्थांना पृष्ठभागावर प्रतिबंध करणारा असल्याचे दिसून आले आहे. या सूटला रुग्णालये, खाजगी कंपन्या, विमान कंपन्या आणि सरकारी संस्थांमध्ये मागणी मिळू शकते. या सूटचे उत्पादन सुरू झाले असून त्यासाठी प्रारंभिक मागणी नोंदवण्यात येऊन तिची पूर्तता देखील झाली आहे. ही दोन्ही उत्पादने डीआयएटी(डीयू)ची ट्रेडमार्कप्राप्त उत्पादने आहेत.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645604)
Visitor Counter : 238