सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

विदर्भ आणि मराठवाड्यात श्वेतक्रांती आणण्यासाठी NDDB आणि पशुपालन विभागाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज- केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी


नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास बोर्डाची (NDDB) आढावा बैठक

Posted On: 11 AUG 2020 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

विदर्भ आणि मराठवाड्यात श्वेतक्रांती आणायची असेल तर, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) आणि महाराष्ट्रातील पशुपालन विभागाने एकत्रित काम करणे गरजेचे आहे, असे मत, केंद्रीय  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी व्यक्त केले. या दोन्ही विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून दरोजचे दुग्ध उत्पादन वाढवता येईल, असे ते म्हणाले. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या नागपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत ते गुगल मीटच्या माध्यमातून बोलत होते. केंद्रीय पशुपालक आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंह, महाराष्ट्राचे पशुधन विकास मंत्री सुनील केदार आणि NDDB चे अध्यक्ष दिलीप रथ या बैठकीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात दररोज सुमारे 20 ते 30 लाख लिटर्स दूधखरेदी होते. मात्र विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये NDDB च्या संकलन केंद्रांवर केवळ 2.16 लाख लिटर्स दुग्धखरेदी होते. या दुधखरेदीत वाढ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशी वाणाच्या गाईंची पैदास वाढवण्यासाठी ग्रामीण पातळीवर कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा, हे ही त्यांनी अधोरेखित केले. जरसी गाईंपेक्षा सहिवाल, गीर अशा देशी गाईंच्या विकासावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केंद्रीय आणि राज्याच्या पशुविकास विभागांना केली. नागपुरात असलेल्या महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने कृत्रिम रेतन केंद्र सुरु केले जावे, असा सल्ला त्यांनी राज्याच्या पशुविकास विभागाला दिला . विदर्भातील दुभत्या जनावरांच्या वाणात सुधारणा करण्यासाठी पशुपालन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत,  असेही गडकरी म्हणाले. नागपूर जिल्हा अधिकारी आणि पशुपालन विभागाने केंद्राकडून मिळणाऱ्या 106 कोटी रुपयांच्या निधीचा वापर करुन दुग्धविकास,चाराविकास आणि लसीकरण करावे  अशी सूचना त्यांनी दिली . गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात दुग्ध संकलन वाढवले जाण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावे, असे ते म्हणाले.

भविष्यातील योजना प्रत्यक्षात अंमलात आणाव्यात, असा सल्ला केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी NDDB आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांना दिला. NDDB च्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत निधी वितरणाच्या पद्धतीविषयी नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. राज्यातील पशुपालन विभागाने ‘लिंगनिश्चित वीर्याचा वाजवी दर निश्चित करावा, आणि त्यासाठी MAFSUची तांत्रिक मदत घ्यावी असा सल्ला गिरीराज सिंह यांनी दिला. राज्यातील पशुंना पाय आणि तोंडाच्या (फूट ,माउथ) आजार प्रतिबंधक लसीकरणाचे काम वेगाने सुरु आहे अशी माहिती सचिव डॉ अनुप कुमार यांनी दिली.  

शेतकरी आणि पशुधन विकास राज्य सरकारच्या केंद्रस्थानी आहे, अशी माहिती राज्याचे पशुधनविकास मंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिली. NDDB आणि केंद्र सरकारशी यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील, नागपूर संत्रा उत्पादक संस्था NOGA ची उत्पादने नागपूरच्या मदर डेअरीच्या विक्रीकेंद्रांवर ठेवल्या जाव्यात,  अशी सूचना गडकरी यांनी केली.

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1645049) Visitor Counter : 184


Read this release in: English