शिक्षण मंत्रालय

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020 सॉफ्टवेअर आवृत्तीचे होणार उद्घाटन

Posted On: 30 JUL 2020 6:52PM by PIB Mumbai

नागपूर 30 जुलै 2020

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन या सॉफ्टवेअर निर्मितीच्या स्पर्धेद्वारे नागरी समस्यांवर विद्यार्थ्यांद्वारे समाधान शोधले जाते. यावर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या  सॉफ्टवेयर आवृत्तीचे उद्‌घाटन जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर  येथे होणार आहे . या महाविद्यालयाची सदर स्पर्धेसाठी एक नोडल केंद्र म्हणून निवड झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास अंतर्गत नवोन्मेष सेल कडुन 3  समस्यांसाठी 106 स्पर्धक असलेले एकूण 16 संघ सदर स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी 1 लाख रुपयांचे बक्षिस राहणार आहे. 1 ऑगस्ट 2020 रोजी जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणा-या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष जी.एच.आर.सी. शैक्षणिक संस्थे चे अध्यक्ष सुनील रायसोनी राहणार आहेत तर संस्थेचे संचालक डॉ. सचिन उंटवले हे स्वागत भाषण करतील. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एंजल इन्व्हेस्टरचे प्रमुख शशिकांत चौधरी, तर विशेष अतिथी म्हणून महिंद्रा कंपनीचे नागपूर प्रकल्प प्रमुख  श्रीकांत दुबे राहणार आहेत.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून होईल. दरवर्षीप्रमाणेच, पंतप्रधान दुरचित्रवाणीद्वारे 1 ऑगस्ट 2020 रोजी विद्यार्थ्यांशी संध्याकाळी 7 वाजता संवाद साधतील.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत  स्मार्ट इंडिया हॅकाथॉन(एस.आय.एच.) हा आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही समस्या उद्भवतात त्या सोडवण्यासाठी  विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा उपक्रम आहे .याद्वारे उत्पादनातील नाविन्यपूर्ण संस्कृती आणि समस्येचे निराकरण करण्याची मानसिकता निर्माण होते. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हे  2017 पासून दरवर्षी दोन स्वरूपात म्हणजेच एस.आय.एच. सॉफ्टवेयर आणि एस.आय.एच. हार्डवेअर संस्करणांमध्ये आयोजित केले जाते.

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन दरवर्षी देशभरातील  विविध नोडल सेंटरमध्ये घेण्यात येत असे, ज्यामध्ये निवडक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थी सहभागी, उद्योग प्रतिनिधी आणि शिक्षक नेमलेल्या नोडल सेंटरमध्ये  प्रत्यक्षरित्या एकत्र येत असत.

यावर्षी, कोविड-19 च्या साथीमुळे सदर स्पर्धेचे सॉफ्टवेयर संस्करण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे.  

यावर्षी एस.आय.एच. टीम आणि सहभागी मंत्रालये,  कंपन्या, संघटनांचे तज्ञ या स्पर्धेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कामगिरीचे निरीक्षण करतील आणि त्यांच्या नावीन्यपुर्ण संशोधनाला वित्तपुरवठा करण्यास आणि त्यांच्या संस्थेत इंटर्नशिप किंवा नोकरीची संधी देण्यावर निर्णयही घेणार आहेत .

 

* * *

S.Rai/D.Wankhede/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642398) Visitor Counter : 104