रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गडकरी यांच्या हस्ते नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या हरियाणातल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि शिलान्यास


उदयोन्मुख भारताच्या महामार्ग प्रकल्पांमुळे हरियाणाच्या कानाकोपऱ्याचा विकास शक्य

सरकार पहिल्या दोन वर्षात दोन लाख कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करणार

चंदिगड ते दिल्ली विमानतळ प्रवासाचा वेळ चार तासांऐवजी दोन तासांचा होणार

गेल्या पाच वर्षात राज्यात 29406 किलोमीटर रस्त्यांचा विकास - हरियाणा मुख्यमंत्री मनोहर लाल

दिल्ली- मुंबई द्रूतगती महामार्गावर एमएसएमईसह औद्योगिक क्लस्टर विकसित करण्याच्या कार्यात सहभागी होण्याचे गडकरी यांचे हरियाणा मुख्यमंत्र्यांना आवाहन

Posted On: 14 JUL 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणामध्ये 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध नवीन महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि शिलान्यास आज करण्यात आला.  आभासी- वेबच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला. आज उद्‌घाटन आणि शिलान्यास झालेले हे महामार्ग नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल होते.

ज्या महामार्ग प्रकल्पांचे आज उद्‌घाटन झाले, त्यामध्ये 35.45 किलोमीटरच्या रोहना- हसनगड ते झज्जर विभागातल्या एनएच 334बी या चौपदरी मार्गाचा समावेश आहे. या मार्गासाठी 1183 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच पंजाब आणि हरियाणा सीमेवरच्या जिंद विभागातल्या एनएच 71 वरील 70 किलोमीटर लांबीच्या चौपदरी रस्त्यासाठी 875 कोटी, आणि एनएच 709 वर 85.36 किलोमीटर लांबीच्या जिंद-कर्नाल महामार्गासाठी आणि त्याच्या बाजूला पेव्हिंगसाठी 200 कोटी रूपये खर्च झाला आहे.

रस्ते आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी ज्या प्रकल्पांचा शिलान्यास केला, त्यामध्ये एनएच 153 डी इसमाईलपूर ते नारनौल या 227 किलोमीटरचा सहा पदरी हरित द्रूतगती मार्गाचा समावेश आहे. हे काम ‘आठ पॅकेज’चे होणार असून त्यासाठी 8650 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच 46 किलोमीटरचा चौपदरी मार्ग आहे. हा मार्ग गुरूग्राम पटौदी- रेवारी विभागातल्या एनएच 352डब्ल्यू मध्ये येतो. त्यासाठी 1524 कोटी रूपये खर्च येणार आहे. 14.4 किलोमीटरच्या चौपदरी रेवारी बायपाससाठी 928 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. तसेच एनएच 11 महामार्गावरच्या रेवारी- अटेली मंडी या चौपदरी रस्त्यासाठी 1057 कोटी रुपये खर्च येणार आहे. एनएच 148 एच वरच्या 40.8 किलोमीटरच्या चौपदरी नारनौल बायपाससाठी तसेच नारनौल ते अटेली मंडी एनएच 11 विभागाच्या महामार्गासाठी 1380 कोटी खर्च येणार आहे. एनएच 352ए जिंद-गोहाना (एक पॅकेज, हरितमार्ग समांतरण) या 40.6 किलोमीटर चौपदरी महामार्गासाठी 1207 कोटी खर्च येणार आहे. एनएच 352ए महामार्गावरच्या गोहाना- सोनिपत या 38.23 किलोमीटरच्या चौपदरी मार्गासाठी 1502 कोटी खर्च येणार आहे. आणि उत्तर प्रदेश -हरियाणा सीमा ते रोहा या एनएच 334बी या 40.47 किलामीटरच्या चौपदरी महामार्गाच्या बांधणीसाठी 1509 कोटी रूपर्य खर्च येणार आहे.

या उद्‌घाटन, शिलान्यास कार्यक्रमाच्यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, या प्रकल्पांमुळे या महामार्ग प्रकल्पांचा हरियाणातल्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांशी संपर्क साधणे सुकर, सोपे जाणार आहे. या प्रकल्पांमुळे जनतेचा वेळ, इंधन आणि प्रवास खर्च यांच्या बचत होऊ शकणार आहे. या महामार्गांमुळे चंदिगड येथून दिल्ली विमानतळावर चार तासांच्याऐवजी अवघ्या दोन तासांमध्ये पोहोचता येणार आहे. त्यामुळे पैशाची, वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर राज्यातल्या मागास भागाच्या विकासाला चालना मिळू शकणार आहे. ते म्हणाले, देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सरकार वचनबद्ध आहे. पहिल्या दोन वर्षांमध्ये सरकार दोन लाख कोटी रूपये खर्चांची कामे पूर्ण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी 100 लाख कोटी रुपयांची पायाभूत विकासाची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळेच हरियाणाच्या कानाकोप-याच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. आता काळाची गरज ओळखून लोकांनी जैव इंधनांचा विचार करून त्यासाठी आवश्यक पिकांची लागवड करावी, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. अशा गोष्टींमुळे सर्वांगीण जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकणार आहेत. आपल्या गावामध्येच काम मिळाले तर, रोजगाराच्या शोधात होणारे मोठ्या प्रमाणावरचे स्थलांतर कमी होण्यास मदत मिळेल. प्रस्तावित दिल्ली ते मुंबई हा द्रूतगती मार्ग हा ट्रान्स हरियाणा इकॉनॉमी कॉरिडॉर- गुरूग्राम- रेवारी- अटेली- नारनौल महामार्ग म्हणजे नवीन उदयोन्मुख भारताचा महत्वपूर्ण मार्ग असणार आहे. यामुळे हरियाणाचा विकास होणार आहे.

या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने व्हावे, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर करण्याची विनंती नितीन गडकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांना केली. तसेच यासंदर्भात जे काही प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या महामार्गावर असलेल्या गावांना आणि शहरांना स्मार्ट बनविण्यासाठी औद्योगिक क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. तसेच महामार्गांवर खादी आणि ग्रामीण उद्योग विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना यावेळी गडकरी यांनी केले. स्मार्ट गावे तयार करण्यासाठी आणि या गावांमध्येच आगामी पाच वर्षात एमएसएमईच्या माध्यमातून पाच कोटीजणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. यामुळे या भागामधून वार्षिक उत्पन्न 8800 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या महामार्गाचे काम करण्याची विनंती मान्य केल्याबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी गडकरी यांचे आभार मानले. या प्रकल्पांमुळे राज्यातल्या उद्योग आणि व्यवसायांवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतील. राज्याच्या विकासाचे श्रेय रस्त्यांचे विशाल जाळे, वाहतूक सुविधा यांनाच दिले जाते. गेल्या पाच वर्षांमध्ये 29406 किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात आले, तर यापैकी काही रस्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मनोहर लाल यांनी यावेळी दिली. तसेच अपघात टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर रस्त्यांचे, पुलांचे काम करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे, असेही मनोहर लाल यांनी सांगितले.

 

S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638633) Visitor Counter : 180