आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
संख्या वाढल्यामुळे घाबरून जाऊ नका, पण मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या : केंद्रीय पथकाच्या ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना सूचना
Posted On:
27 JUN 2020 6:41PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जून 2020
कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही पण त्या रूग्णांवर वेळेत उपचार करणे आणि एकूणच मृत्यूदर कमी करणे याला प्राधान्य द्या अशा सूचना केंद्रीय पथकाने ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना दिल्या. त्याचबरोबर चाचण्यांची संख्या जास्तीत जास्त वाढवा जेणेकरून रूग्णांना वेळेत उपचार देता येणे शक्य होईल असेही या पथकाने सर्व महापालिका आयुक्तांना सूचित केले.
प्रतिबंधित क्षेत्राची कडक अंमलबजावणी करणे, रोजच्या रोज रूग्णालयामध्ये दाखल झालेल्या आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा रूग्णांचा आढावा घेणे आणि त्यांच्यावर उपचार करताना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणे आदी गोष्टींनाही प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी क्वारंटाईन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात काॅन्टॅक्ट ट्रेसींग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखविली.
याआधी, आज सकाळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक(आरोग्य) डॉ. ई. रविंद्रन आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोवीड हॉस्पीटलला भेट देवून डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1000 बेडचे ठाणे कोवीड हॉस्पीटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
पाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला.
सद्यस्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे घाबरून न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन करून मृत्यू दर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे चाचण्यांची क्षमता वाढवावी जेणेकरून बाधित लोकांना वेळेवर उपचार देता येतील. त्याचप्रमाणे कोवीडची चाचणी करणा-या प्रयोगशाळांशी समन्वय साधून त्यांना मदत करा असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले.
सुरूवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणे जिल्हा, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आदी महापालिकेचाही आढावा घेतला. यावेळी ठाणे पोलिस सह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त श्री. दयानिधी आदी उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai/MD/RT/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634799)
Visitor Counter : 275