पर्यटन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यासाठी ‘इंडिया टुरिझम मुंबई’च्या वतीने 15-21 जून कार्यक्रम
Posted On:
15 JUN 2020 7:01PM by PIB Mumbai
मुंबई, 15 जून 2020
‘‘योगाचा प्रारंभच सदासर्वकाळ निरोगी आणि आनंदी राहता यावे, अशी इच्छा असलेल्या पहिल्या व्यक्तीकडून झाला आहे’’ - श्री स्वामी सच्चिदानंद - ‘द योग सूत्र’
स्वतःवर प्रेम करण्याची कृती ही एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यापासून सुरू होते. योग आणि निरोगी शरीर हा असाच एक स्वप्रेमाचा दृष्टिकोन आहे आणि तो शरीर, मन आणि आत्मा या तीन्हींच्या एकत्रीकरणाने प्राप्त होऊ शकतो.
हा संदेश देशाच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंडिया टुरिझम मुंबई’ कार्यालयाच्यावतीने आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
देशभरात झालेल्या कोविड-19 महामारीचा प्रसार लक्षात घेऊन या कार्यालयाने ‘‘सेल्फ-लव्ह’’ या विषयी केंद्रीत योग कार्यक्रम करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार सर्वांनी घरामध्येच आपल्या कुटुंबियांसमवेत योगदिन साजरा करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. यानुसार “Yoga @ home & Yoga with family” असे नाव या संकल्पनेला देण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये दि.15 जूनपासून 21 जूनपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सध्याच्या काळात निरोगी मन आणि सुदृढ शरीर राहणे गरजेचे आहे. तसेच आत्म-जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध आभासी माध्यमांचा वापर करून कार्यक्रम बनवण्यात आले आहेत.
दि. 15 जूनपासून आयोजित करण्यात आलेले उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:-
- इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट (आयआयटीटीएम) च्या विद्यार्थी वर्गासाठी ‘वेलनेस टुरिझम पोस्टर डिझाईन’ स्पर्धा.
- पश्चिम आणि मध्य विभागातल्या इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थी वर्गासाठी योग दिन पारंपरिक भारतीय आरोग्यदायी पाककला स्पर्धा
- निरोगी शरीर आणि योगामुळे होणारे कल्याण याविषयी पश्चिम आणि मध्य विभागामध्ये दि.15 ते 21 जून दरम्यान ‘इंडिया टुरिझम मुंबई’ झूम रूमच्या माध्यमातून वेबिनार्सचे आयोजन.
- ‘इंडिया टुरिझम मुंबई’ च्या फेसबूक आणि इन्स्टाग्रॅम पेजवर प्रारंभीच्या शिकावू लोकांसाठी सहा दिवसांच्या योग वर्गाचे थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि ‘एन्टे योग’चे संस्थापक सीथू टी जे लोकांना योग शिकवणार आहेत.
- भारताच्या पश्चिमेकडील विभागामध्ये योगविषयक विविध कल्याण केंद्रांना आणि संस्थांना समाज माध्यमांतून जाहिरात करणे.
‘इंडिया टुरिझम मुंबई’ने पोस्टर डिझाईन स्पर्धा आणि भारतीय पारंपरिक आरोग्यदायी खाद्य पदार्थ बनवण्याची स्पर्धा आयोजित करून इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट (आयआयटीटीएम) च्या विद्यार्थ्यांच्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यामुळे नवीन पिढीचा योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष, सक्रिय सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
‘इंडिया टुरिझम मुंबई’च्या कार्यालयीन झूम रूमची क्षमता ‘500 पॅक्स’ आहे. या माध्यमातून दररोज प्रादेशिक वेबिनारव्दारे,"निरोगी काया आणि योग "यांच्याविषयी तज्ञांची चर्चा आयोजित करून विविध कल्याणकारी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येत आहे. या आयोजनामागे सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे. हे कार्यक्रम दि. 15 ते 22 जून दरम्यान रोज सायंकाळी 5.00 वाजता असतील. या कार्यक्रमामध्ये हरिश शेट्टी, रंजना बाल्यन, गौरव गुरगुटे, डॉ. बाती पांडे यांची निरोगी मन, आरोग्य कल्याण, आयुर्वेद, मनाचे आरोग्य, योग, वेदांत यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा सार, तसेच शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, हे सांगण्यात येणार आहे. याचबरोबर ‘ब्रेथ ड्रीम गो’चे संस्थापक मरिएलन वार्ड हे योग या विषयासाठी खास भारत प्रवास करण्याविषयी बोलणार आहेत.
या योग कार्यक्रमाच्या सप्ताहामध्ये आणखी एक अतिशय महत्वाचा उपक्रम आयोजित केला आहे. तो म्हणजे ‘इंडिया टुरिझम मुंबई’ च्या फेसबूक आणि इन्स्टाग्रॅम पेजवर प्रारंभीच्या शिकावू लोकांसाठी सहा दिवसांच्या योग वर्गाचे थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आणि उदयपूरच्या ‘एन्टे योग’चे संस्थापक सीथू टी जे 15 ते 21 जून या काळात दररोज सकाळी 6.30 वाजता मार्गदर्शन करणार आहेत. हा योग प्रशिक्षण वर्ग आभासी असून सर्वांसाठी समाज माध्यमांवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना योग करणे सुलभ जावे आणि त्यांना नियमित योग करण्यासाठी मानसिक तयारी करता यावी, यापुढे नियमित योग करणे त्यांच्या नियमित जीवनाचा भाग बनावा यासाठी हे वर्ग घेण्यात येणार आहे. (Facebook : @touristofficemumbai and Instagram : indiatourism_mumbai)
‘इंडिया टुरिझम मुंबई’च्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्टिटर हँडलवरही कार्यक्रम सर्वांना पाहता येणार आहेत.
‘इंडिया टुरिझम मुंबई’च्या नवीन अधिकृत ब्लॉगवर योग आणि निरोगीपणा याविषयी अतिशय उपयुक्त माहिती, लेख देण्यात येत आहेत. याची माहिती जाणून घेण्यासाठी https://indiatourismmumbai.wordpress.com/ वर लॉग ऑन होऊ शकता
सर्वांकडे निरोगी काया आणि निरोगी मन असावे, यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारताच्या समृद्ध परंपरा आणि वारसा यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत सरकारच्यावतीने विविध कार्यक्रमांना आकार देण्यात येत आहे.
‘इंडिया टुरिझम मुंबई’ कार्यालयाच्यावतीने पश्चिम आणि मध्य प्रदेशातल्या पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय येते. भारत सरकारच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना राज्य पर्यटन विभाग आणि इतर सहभागिदार यांच्या समन्वयाने कार्य केले जात आहे.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631731)
Visitor Counter : 194