सांस्कृतिक मंत्रालय

मानव आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी आंतरशाखीय संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचा अंगिकार आणि दृढ सहकार्याची गरज – एस रामादोराई


पद्मभूषण एस रामादोराई यांचे,विनाश, उलथापालथ, डीजीटलीकरण, मागणी आणि विविधता यांच्यातील परस्परसबंध सांगणारे व्याख्यान

Posted On: 09 JUN 2020 6:19PM by PIB Mumbai

मुंबई, 8 जून 2020 


आज जेव्हा देश आणि संपूर्ण जगच एका नव्या जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी तयार होत आहे, अशावेळी टीसीएसचे माजी उपाध्यक्ष, पद्मभूषण एस रामादोराई यांनी मुंबईत “उलथापालथ, डिजिटलीकरण आणि मागणी’या विषयावर बोलतांना, कोरोना आजारामुळे जगभर झालेले फेरफार आणि त्यातच दडलेल्या संधी यावर भाष्य केले. लॉकडाऊनच्या काळात नेहरू विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या विशेष आभासी व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

उलथापालथ :

कोविड-19 आणि त्याचे संक्रमण रोखण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना यामुळे देशातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात अनेक उलथापालथी झाल्या. मग ते उद्योगक्षेत्र असो किंवा वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत.यावेळी, त्यांनी पाच डी म्हणजे डिझास्टर(विनाश), डिसरप्शन(उलथापालथ), डिजिटायझेशन (डिजिटलीकरण, डिमांड(मागणी) आणि डायव्हरसिटी( विविधता) या पैलूंवर भर दिला. “ आपल्या विविधतेच्या सखोल संस्कृतीतून आपण योग्य तो दृष्टीकोन आणि प्रेरणा घेतली, तर आपण नव्या शक्यता आणि संधींच्या दिशेने मार्ग काढू शकू” असे रामदोराई यावेळी म्हणाले.  

याआधी जगात आलेल्या अशा महामारीच्या किंवा मानवी हस्तक्षेपामुळे आलेल्या मोठ्या नैसर्गिक संकटांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. 1885 साली आलेली प्लेगच्या   साथी पासून ते सार्सच्या संकटांचा त्यांनी उल्लेख केला. या आठवणी म्हणजे आपल्याला संदेश आहे की महामारीसारखी संकटे आपल्या आयुष्याचा भाग असणार आहेत. त्यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करत यावेळी कसे सर्व मुंबईकर एकत्र आले होते, याची आठवण केली. अशा संकटाच्या वेळी लोकांनी एकमेकांना दिलेला आधार आणि मदत कौतुकास्पद होती, असे त्यांनी सांगितले.जनसमुदायाच्या या सहकार्याच्या प्रवृत्ती वाढवण्यावर भर द्यायला हवा, असे ते म्हणाले.

“या जागतिक आजारामुळे सर्वात जास्त फटका स्थलांतरित मजुरांना बसला.शेतमजूर आणि बांधकाम मजूरांनाही या महामारीचा त्रास झाला. स्थलांतरीत मजुरांच्या स्थलांतरामुळे त्यांची वैयक्तिक हानी तर झालीच शिवाय त्यांची कुटुंबे आणि गावांनाही आर्थिक फटका बसला. आपल्या आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हानांमुळे, त्यांना आपल्या गावी सुरक्षित राहू अशी भावना निर्माण झाल्यामुळेच ते परत गेले,” असे रामादोराई यावेळी म्हणाले.शहरात राहणे ही तात्पुरती व्यवस्था आणि गावे आपला कायमस्वरुपी निवारा आहे, अशीच त्यांची समजूत असल्याचे त्यांनी सांगितले.   

मनरेगामुळे मजुरांना काही अंशी मदत मिळू शकली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींची रोजंदारी 202 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात देशातील 11 कोटी कामगार आहेत. एकूण उद्योगक्षेत्रापैकी 90 टक्के एमएसएमई क्षेत्रात असून एकूण उद्योगमूल्यापैकी त्याचा वाटा 45% इतका आहे.त्याशिवाय, दरवर्षी, सुमारे पाच ते 10 दशलक्ष कामगार उद्योग क्षेत्रांकडे वळत असून, त्यातले बहुतांश एमएसएमई क्षेत्रात रोजगार शोधतात.  

अशा उलथापालथीचा परिणाम होऊ न शकणारी एक शाश्वत संरचना तयार करण्यासाठी दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण उपाययोजनांची गरज असल्याचे अधोरेखित करत, त्यांनी या महामारीशी लढतांना केरळने केलेल्या उपायांची माहिती दिली. “शाश्वत उत्कृष्टता साध्य करणे एका रात्रीत होऊ शकणारे काम नाही. आज केरळ राज्याने कोरोनाचा सामना करतांना इतर राज्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी का केली आहे? कारण,या राज्याने आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचे काम खूप आधीच म्हणजे1964 पासून सुरु केले आहे. केरळच्या क्षमता बांधणी आणि त्याची अंमलबजावणी, सामुदायिक आरोग्य केंद्रांची संपर्क यंत्रणा, पंचायत आणि जिल्हा स्तरावर सक्षमीकरण या सर्व गोष्टींमुळेच केरळ या महामारीचा सामना करण्यात यशस्वी ठरले आहे.


डिजिटलीकरण :

अशा संहारक संकटांचा सामना करण्यासाठी डिजिटलीकरण आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा अत्यंत प्रभावी वापर होऊ शकतो, असे रामादोराई म्हणाले. “ केंद्र सरकार डिजिटलीकरणाला प्रोत्साहन देत आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे नागरिक केवळ स्मार्ट फोन आणि परवडणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या नागरिकांशी संपर्क होऊ शकतो. थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत सरकार जनतेला आवश्यक त्या सामाजिक सेवा पुरवू शकते. डिजिटलीकरणामुळे आपल्या कारागिरांनाही या महामारीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक हातमाग कामगार, इंटरनेटच्या माध्यमातून आपली उत्तम वस्त्रे विकत आहेत. सुमारे ३० लाख कामगारांना यामुळे लाभ होतो आहे.

रामादोराई यांनी यावेळी काही अशा क्रांतिकारक संशोधनांचा मानवतेला लाभ झाला आहे, हे सांगताना जयपूर फूट या कृत्रिम पायाच्या संशोधनाचे उदाहरण दिले.

या महामारीमुळे आपल्या देशाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. “भारतात सध्या PPE, व्हेंटीलेटर्स,मास्क अशा सर्व उपकरणांचे देशातच उत्पादन सुरु झाले आहे. या संकटातून आपल्या मिळालेली ही संधीच आहे.”

आरोग्य क्षेत्रातही डिजिटलीकारणाचा मोठा उपयोग होत आहे, असे सांगत रामादोराई यांनी त्याची उदाहरणे दिली. आपण आरोग्य क्षेत्रातील नवनव्या संधींचा शोध घ्यायला हवा, त्यादृष्टीने पुढच्या संकटाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढवायला हव्यात असे ते म्हणाले. डिजिटलीकरणाचा कला आणि संस्कृती या क्षेत्रानांही लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

 

विविधता :

या महामारीमुळे मानवतेतील भिंती नष्ट झाल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. गरीब विरुद्ध श्रीमंत असा भेद नष्ट झाला आहे, असे ते म्हणाले. कोविड सारखा आजार कोणालाही होऊ शकतो, हे आपल्याला जाणवले आहे. तसेच निसर्ग अत्यंत महत्वाचा असल्याची शिकवण देखील या संकटाने आपल्याला दिली असून आपण यापुढे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करायला हवे, असे रामादोराई यावेळी म्हणाले.

आता आपल्याला जर स्वतःचे आणि पृथ्वीचे रक्षण करायचे असेल, आंतर-शाखीय संस्कृतीचा अंगीकार, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि दृढ सहकार्य याशिवाय पर्याय नाही, असे रामादोराई यांनी सांगितले.


* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630488) Visitor Counter : 217


Read this release in: English