भूविज्ञान मंत्रालय
निसर्ग चक्रीवादळाने दुपारी महाराष्ट्र किनारपट्टी ओलांडली
मुंबईत वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना वगळता गंभीर नुकसान झाले नाही
Posted On:
03 JUN 2020 8:31PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2020
अतितीव्र निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी 12.30 – 2.30 दरम्यान मुंबईच्या आग्नेय दिशेला 75 कि.मी अंतरावर रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकले. मुरुड-जंजिरा शहराच्या उत्तरेस, अक्षांश 18.5 एन आणि रेखांश 73.2 ई येथे हे वादळ जमिनीवर धडकले. उत्तर-पूर्व दिशेकडे झालेल्या थोड्या बदलामुळे मुंबईवर चक्रीवादळाचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूप कमी झाला.

मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशा हवामानाचा सामना करावा लागला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागांमध्ये 6-8 फूट उंच लाटा उसळल्या. रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी निवासी इमारतींच्या गच्चीवर उभारण्यात आलेले पत्र्याचे छप्पर उडून गेले. अलिबागमध्ये ताशी 120-130 किमी वेगाने वारे वाहत होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीज कंपन्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवला होता. रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवेवर परिणाम झाला. अलिबाग येथे 45 मिमी (दुपारी 4 वाजेपर्यंत) तर रत्नागिरी येथे 38 मिमी (दुपारी 4 वाजेपर्यंत) पावसाची नोंद झाली. एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव म्हणाले, रोहा, रेवदंडा आणि श्रीवर्धन भागात अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या मात्र वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

मुंबईत गंभीर हानी टळली
दुपारपर्यंत मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. वाऱ्याचा वेग ताशी 26 किमी होता. कुलाबा येथे 23 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 12 मिमी पावसाची (संध्याकाळी 4 पर्यंत) नोंद झाली. संध्याकाळी आकाश निरभ्र होऊ लागले. मुंबईतही वृक्ष उन्मळून पडल्याची नोंद झाली, काही ठिकाणी झाडांखाली उभ्या केलेल्या वाहनांवर झाडे पडून वाहनांचे नुकसान झाले.
सावधगिरीचा उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची उड्डाणे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. केरळला मुंबई आणि नवी दिल्लीशी जोडणार्या कोकण रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या चार गाड्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मडगाव - बेळगवी - मिरज मार्गे वळवण्यात आल्या.
चक्रीवादळामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली होती. एनडीआरएफने महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत 43 तुकड्या तैनात केल्या होत्या. चक्रीवादळ सज्जतेचा नवी दिल्लीत पंतप्रधानांकडून उच्च स्तरावर आढावा घेतला गेला. महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून बोलताना पंतप्रधानांनी केंद्राकडून सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली होती.
निसर्ग चक्रीवादळ उत्तर पूर्व दिशेने जाईल आणि त्यानंतर आज रात्री चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
* * *
R.Tidke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629160)
Visitor Counter : 269