जलशक्ती मंत्रालय
स्वच्छ भारत क्रांतीवरील नेट जिओ चित्रपटाचा प्रीमियर आभासी पद्धतीने
Posted On:
29 MAY 2020 8:25PM by PIB Mumbai
कोविड-19 चा सामना करण्यासाठी ‘आपले हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवा, वारंवार स्पर्श होणारा पृष्ठभाग आणि वस्तू स्वच्छ करा’ असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. थोडक्यात, या साथीच्या आजारावर मात करण्याचा महत्वपूर्ण मार्ग म्हणजे स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाने काही वर्षापूर्वीच तळागाळातील लोकांसह देशभरातील नागरिकांच्या कल्याणासाठी या अनुषंगाने काम सुरू केले आहे.
देश हागणदारीमुक्त करणे आणि शहरी आणि ग्रामीण भारतात योग्य पद्धतीने घन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्दिष्टाने वर्ष 2014 मध्ये संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान (एसबीएम) सुरु केले. बाह्य जगाला जे काम अशक्य वाटत होते ते भारतीय लोकांच्या सक्रीय सहभागाने आणि ही मोठी कामगिरी साध्य करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे सहज शक्य झाले.
साथीच्या आजाराच्या या काळात एसबीएम अत्यंत निर्णायक बनले आहे आणि या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्य किती आवश्यक आहे याचे सगळ्यांना स्मरण करून देत आहे. त्याचवेळी प्रत्येक गावाने आणि नागरिकाने ज्या आवेषाने हे अभियान यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे ही देखील एक लोकक्रांतीच आहे जी आपल्याला स्मरण करून देत आहे की, लोकांनी जर एखाद्या सामायिक कारणासाठी एकत्रितपणे लढा दिल्यास काहीही अशक्य नाही.
स्वच्छ भारत अभियानाच्या शुभारंभानंतर भारताचा चेहरा बदलून तो उघड्यावर शौचास बसणाऱ्या सर्वाधिक लोकांचा देश ते 6 लाखांहून अधिक गावे हागणदारीमुक्त होणारा देश असा झाला आहे. या अभियानाच्या यशामागील आधारस्तंभ म्हणजे त्याचे 6,50,000 स्वयंसेवक किंवा स्वच्छग्रहि, जे बहुतांश तरूण आणि स्त्रिया आहेत ज्यांनी गाव पातळीवर या अभियानाला प्रोत्साहन दिले आणि याला लोकचळवळीचे स्वरूप दिले.
अशा लोक चळवळीचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी, नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने राष्ट्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सहकार्याने ‘स्वच्छ भारत: भारताची स्वच्छता क्रांती’ नावाचा चित्रपट बनवण्यासाठी एकत्र आले. यावर्षी मार्च महिन्यात राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसाठी विशेष शो आयोजित करून या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. नेटजीओ वाहिनीवर देखील हे प्रदर्शित केले होते. हे आता स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, जिचा आभासी प्रीमियर 27 मे 2020 रोजी झाला आहे.
या चित्रपटात केवळ अभियानाचे यशच नाही तर ग्रामीण भारताला शौचालयांच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यासाठी केलेला संघर्ष, लढा आणि नवकल्पना यांचे चित्रण केले आहे. स्वच्छाग्रही किंवा ‘स्वच्छतेचे राजदूत’ या बहुतांश महिला आहेत, तळागाळात हे अभियान राबविण्यासाठी त्यांच्या प्रवासातील अनुभव त्यांनी सामायिक केले आहेत. एखाद्या गृहिणीसाठी, स्वछाग्रहीसाठी गावाला वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दल शिक्षण देणे किती कठीण असेल? शाळेत जाणारी मुले ज्यांना आपले गाव हागणदारीमुक्त व्हावे असे वाटते त्यांनी आपल्या वडिलधाऱ्या व्यक्तींना शौचालय वापरण्यास कसे पटवून दिले असेल? या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप देण्यासाठी सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या? या सर्व प्रश्नांची तसेच इतर अनेक गोष्टींचा उलगडा या चित्रपटात केला आहे.
हा चित्रपट प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक समुदायासाठी एक स्मरणपत्र आहे की एकत्र काम करण्याचा निर्धार आपल्याला नेहमीच यशाकडे नेतो. देशातील जनतेने हाती घेतलेल्या कोणत्याही अभियानामुळे केवळ व्यक्ती किंवा समाजालाच नाही तर राष्ट्रालाही याचा नक्कीच फायदा मिळतो. आता, जेव्हा प्रत्येक देश आपल्या नागरिकांना या साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी एकत्र लढा देत आहे, तेव्हा चला आपण भारताच्या सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमेपासून प्रेरणा घेऊया ज्या मोहिमेने अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला आहे आणि लोकांचे चेहऱ्यावर हसू आणले आणि त्यांना चांगले आरोग्य प्रदान केले आहे.
चला हे देखील जिंकू!
***
M.Jaitly/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627734)
Visitor Counter : 117