विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 पासून बचावासाठी ट्रॅक्टरवर चालणारे निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र विकसित करणा-या नाशिककराची यशोगाथा

Posted On: 26 MAY 2020 12:51PM by PIB Mumbai

 

जगभरात कोविड-19 महामारी व या महामारी प्रसारासाठी कारणीभूत ठरलेला कोरोना विषाणू याच्याविषयी गेल्या काही महिन्यांपासून सर्व स्तरातून बातम्या येत आहेत. सातत्याने याविषयावर चर्चा सुरू आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबतही खूप काही बोलले जात आहे. कोरोना विषाणूमुळे पायाभूत सुविधांबरोबरच सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. दुस-या ठिकाणाहून कोरोनाग्रस्त व्यक्ती गावात आली, तर या विषाणूचा आपल्याही गावात प्रवेश होणार व इथल्या ग्रामस्थांनाही त्याची लागण होणार, हे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा या गावातल्या राजेंद्र जाधव यांच्याही लक्षात आले.

‘Yashwant’ santization sprayer has been identified as a potential S&T based innovative solution in Challenge COVID-19 Competition (C3) organised by the National Innovation Foundation

कोविड-19चा संसर्ग कसा होऊ शकतो, याची माहिती रेडिओ, टी.व्ही. व व्हॉटसअप यासारख्या माध्यमातून प्रसारित होत आहेतच. त्याचबरोबर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छताविषयक आवश्यकतेसाठी जनजागृतीचे संदेशही सातत्याने दिले जात आहेत. प्रत्येक गावाने आपल्या गावात व तहसीलामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबवणे गरजेचे आहे, हेही सर्वांच्या आता लक्षात आले आहे.

 

‘Yashwant’ Sanitization sprayer has been deputed to disinfect areas under Satana Municipality 

शेती करताना शेतकरी बांधव स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार आपल्या शेतीच्या साधनांमध्ये व यंत्रसामुग्रीमध्ये बदल करत असतात. हे तांत्रिक ज्ञान ते आपल्या दैनंदिन अनुभवातून विकसित करत असतात. यामुळे त्यांना यंत्रसामुग्री वापरणे अधिक सोईचे, सुविधाजनक होत असते. असेच अभियांत्रिकी शिक्षण देणारे राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्थानांची स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून एक यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणा-या यंत्रसामुग्रीचा प्राधान्याने विचार केला.

अवघ्या 25 दिवसांमध्ये राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असा नाविन्यपूर्ण फवारा यंत्रणा विकसित केली. या फवाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे.

या फवाऱ्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला अॅल्युमिनियमची दोन पाती बसवण्यात आली आहेत. दोन्ही पाती विरुद्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझल (छिद्र) मधून उच्च दाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना करतात. ही पाती 180 अंशाच्या कोनामध्ये फिरतात. तसेच जमिनीपासून 15 फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत. या फवाऱ्याव्दारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी 15 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो. 

या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस 600 लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या फवाऱ्याने कुंपणाच्या भिंती, दारे यांची स्वच्छता करणे सोईचे आहे.

या फवाऱ्याच्या मदतीने निर्जंतुकीकरणाच्या कामाचा आणखी एक फायदा म्हणजे, या कामामध्ये मानवी हस्तक्षेपाची फार कमी आवश्यकता भासते. त्यामुळे विषाणूंचा मानवाशी संपर्क येण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त एकच व्यक्ती म्हणजे, जी ट्रॅक्टर चालक आहे, ती व्यक्ती हे यंत्र संचलित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करू शकते, अशी माहिती यंत्राचे विकासक राजेंद्र जाधव यांनी दिली.

या यंत्राच्या विकासासाठी सुमारे 1.75 लाख रूपये खर्च आला आहे, असेही जाधव यांनी सांगितले. या फवाऱ्याचा वापर सटाणा नगरपालिकेच्यावतीने सटाणा गावात जवळपास 30 किलोमीटर क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी केला जात आहे.

ट्रॅक्टरवर बसवण्यात आलेल्या या फवारा यंत्राची उपयुक्तता लक्षात घेवून जाधव यांच्या धुळे जिल्ह्यातल्या एका मित्राने आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठीही असेच आणखी एक यंत्र तयार करण्याची विनंती केली. त्यांनी मित्रासाठी तयार केलेले यंत्र धुळे जिल्ह्यातील त्यांच्या गावी, स्वच्छतेसाठी पाठवण्यात आले आहे.

कोविड-19 वर विजय मिळवून देणारे हे अभिनव फवारणी यंत्र असल्याने राजेंद्र जाधव यांनी आपल्या या यंत्राला ‘यशवंत’ असे नाव दिले आहे. त्यांना आपल्या या अनोख्या फवाऱ्याच्या पेटंटसाठी म्हणजेच बौद्धिक स्वामित्वासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच (एनआयएफ) ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’कडेही त्याचे डिझाईन पाठवले आहे. कोरोना प्रसाराविरुद्धच्या लढाईमध्ये भारतातल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षमतेचे दर्शन देणारे हे अभिनव यंत्र आहे, असे म्हणता येईल.

Rajendra Jadhav with the tractor mounted sanitization sprayer he has developed to disinfect large areas in the wake of COVID-19. The sexagenarian is engaged in further improving the sprayer machine.

नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’विषयी माहिती

एनआयएफ’ म्हणजेच ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने समाजाच्या तळागाळामध्ये निर्माण होणा-या तांत्रिक नवकल्पना व पारंपरिक ज्ञान यांचा चांगला उपयोग करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. अशा तंत्रज्ञानाला चांगले पाठबळ देण्यासाठी व शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी अहमदाबाद येथे सन 2000 मध्ये ‘एनआयएफ’ची स्थापना करण्यात आली आहे.

*****

S.Pophale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626878) Visitor Counter : 381


Read this release in: English