PIB Headquarters

वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबईत आतापर्यंत परतले 2 हजार 423 भारतीय


मुंबईतील अलगीकरण व्यवस्थेमध्ये सध्या 1 हजार 128 नागरिक वास्तव्यास

Posted On: 23 MAY 2020 8:15PM by PIB Mumbai

 

वंदे भारत अभियान अंतर्गत मुंबई विमानतळावर 17 विमानांतून 2 हजार 423 भारतीय नागरिक काल (दिनांक 22 मे 2020) पर्यंत विदेशातून परतले आहेत. यापैकी 906 प्रवासी हे मुंबईतील रहिवासी आहेत तर उर्वरित महाराष्ट्रातील 1 हजार 139 आणि इतर राज्यातील 378  प्रवासी आहेत.

दि. 7 जूनपर्यंत आणखी 13 विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत.

दरम्यान, परतलेल्या नागरिकांपैकी मुंबईतील विविध 43 हॉटेल्स्‌मध्ये मिळून सुमारे 1 हजार 128 नागरिकांना अलगीकरण व्‍यवस्थेत ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियान अंतर्गत भारतात परत आणण्यात येत आहे. मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱया नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने सर्व कार्यवाही आखली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणाऱया नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (quarantine) केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.  इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत अलगीकरण (कॉरंटाईन) केले जाणार आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत अलगीकरण व्यवस्थेमध्ये पाठवले जाते. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते.

            बृहन्मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन) ची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने 88 हॉटेलमध्ये मिळून 3343 कक्ष आरक्षित केले आहेत.

प्रारंभी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना (ट्रॅव्हल पास) दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक 4 येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेसमार्फत रवाना केले जाते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळदेखील बसेस पुरवत आहे.

दि. 10 मे रोजी लंडन येथून 326, सिंगापूरहून 243  आणि मनिला येथून 150  नागरिक परतले.

11 मे रोजी सॅनफ्रान्सिको येथून 107 आणि ढाका येथून 107 जण आले.

दि. 12 मे रोजी न्यू यॉर्क येथून 208 तर क्वालालम्पूर येथून 201 नागरिक परतले.

दि. 13 मे रोजी शिकागो येथून 195, लंडन येथून 327 तर कुवेत मधून 2 जण आले.

दि. 17 मे रोजी अदिस अबाबाहून 78 तसेच काबूल येथून 12 जणांचे आगमन झाले.

दि. 18 मे रोजी मस्कत येथून 16 जण,

दि. 19 मे रोजी मनिला येथून 41 जण मुंबईत आले.

दि. 20 मे रोजी मनिला येथून 29 प्रवासी,

दि. 21 मे रोजी जकार्ता येथून 185 प्रवासी तर काल 22 मे रोजी जोहान्सबर्गमधून 196  जण मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

यापुढे दि. 7 जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.   

*****

(स्रोत: बृहन्मुंबई महानगरपालिका-जनसंपर्क विभाग)

 

R.Tidke/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626460) Visitor Counter : 125