माहिती आणि प्रसारण मंत्रालय

देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर


कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव

Posted On: 23 MAY 2020 2:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/ मुंबई, 23 मे 2020

 

देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

सामुदायिक रेडिओ म्हणजे ‘परिवर्तनाचे पाईक' आहेत असे जावडेकर म्हणाले. या केंद्रांपर्यंत संपर्क अभियानांतर्गत पोहोचण्याच्या एक विशेष भाग म्हणून जवळपास 300 सामुदायिक रेडिओ केंद्रांना संबोधित करताना ते बोलत होते. सरकार लवकरच अशा स्थानकांची संख्या वाढविण्याची योजना घेऊन येईल असे त्यांनी सांगितले.

कम्युनिटी रेडिओ केंद्रे स्वयं-शाश्वत व्हावीत म्हणून त्यांचा जाहिरात प्रसारण कालावधी वाढविण्यासाठी सरकार उत्सुक आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटे आहे तर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी तो 12 मिनिटे आहे. सर्व रेडिओ केंद्रांना समान वेळ देण्यास उत्सुक आहोत जेणेकरुन त्यांना निधी मिळविण्याची गरज भासू नये.

जावडेकर म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू करताना 75% खर्च मंत्रालयाकडून केला जातो जो निश्चित खर्चाचा मोठा हिस्सा असतो. जाहिरात प्रसारणाच्या वेळेत बदल केल्यामुळे कम्युनिटी रेडिओ केंद्रांना त्यांच्या परिचालन खर्चात मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

कम्युनिटी रेडिओला सहकार्य करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय  “भारतातील कम्युनिटी रेडिओ चळवळीला समर्थन” नावाची योजना राबवित असून त्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

बातम्या प्रसारित करायला देण्याविषयीच्या कम्युनिटी रेडिओच्या केंद्रांच्या मुख्य मागणीवर मंत्र्यांनी भाष्य केले. एफएम रेडिओ वाहिन्यांवरून ज्या प्रकारे बातम्या दिल्या जातात त्याच प्रकारे कम्युनिटी रेडिओवर बातम्या प्रसारित करण्यासंबंधी आपण विचार करू असे आश्वासन त्यांनी दिले.

बनावट बातम्यांचा धोका ओळखून बातम्या प्रसारित करण्यापूर्वी स्थानिक स्रोतांच्या माध्यमातून त्या बातम्यांची सत्यासत्यता पडताळून मोलाची भूमिका बजावावी असे आग्रही प्रतिपादन जावडेकर यांनी  केले. त्या बातम्या ऑल इंडिया रेडिओलाही पाठवाव्या जेणेकरून सत्य पडताळणीला अधिक बळ मिळेल असा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले की, मंत्रालयाने पत्र सूचना कार्यालयांतर्गत एक सत्यासत्यता पडताळणी विभाग अर्थात फॅक्ट चेक सेल तयार केला आहे आणि कम्युनिटी रेडिओ हे या फॅक्ट चेक सेलच्या भूमिकेस पूरक ठरू शकतात.

 

भारतातील कम्युनिटी रेडिओ केंद्र

भारतात 290 कम्युनिटी रेडिओ केंद्र असून त्यातील 130 शैक्षणिक संस्थांद्वारे,143 सामाजिक संस्थांद्वारे तर 17 कृषी विज्ञान केंद्रांद्वारे चालविली जातात. ही कमी शक्तीची एफएम रेडिओ केंद्र असून  10-15 किलोमीटरच्या परिघात त्याचे प्रसारण ऐकता येते. तळागाळातील लोकांसाठीच्या संप्रेषणात बर्‍याचदा या केंद्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

***

R.Tidke/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626352) Visitor Counter : 113


Read this release in: English