गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ भारतला डिजीटल इंडियाचे बळ : कचरा संकलनात तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नवी मुंबईला कचरामुक्त शहरासाठी फाईव्ह स्टार दर्जा मिळवणे झाले शक्य

Posted On: 22 MAY 2020 2:33PM by PIB Mumbai

मुंबई, 22 मे 2020

 

गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालयाच्या स्टार रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत 2019-20 या मुल्यांकन वर्षासाठी नवी मुंबईला कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीत फाईव्ह स्टार रेटींग देण्यात आले. नवी मुंबईला हा पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेला महत्वपूर्ण घटक म्हणजे कचरा संकलन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, यामुळे 100 टक्के कचरा उचलण्यात शहर सक्षम झाले. 

कचरा संकलनाचे काम सोपे नाही, कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या (एनएमएमसी) म्हणण्यानुसार, शहरात दररोज सुमारे 700 मेट्रीक टन कचरा तयार होतो.

कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कचरा वेळेवर उचलणे सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे महानगरपालिका उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी सांगितले. “एनएमएमसी कडे शहरातील प्रत्येक कचरा पेटीवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. प्रत्येक कचरा पेटीला मायक्रोचिप्स बसवल्या असून कचरा संकलनावर लक्ष ठेवण्यासाठी नागरी संस्था जीपीएस यंत्रणेचा वापर करते” असे ते म्हणाले.

  

एनएमएमसीचे कचऱ्याचे ट्रक दर आठ तासांनी फेरी मारतात. हे सर्व ट्रक रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) चिप्स, जीपीएस आणि जीपीआरएससह सुसज्ज आहेत आणि त्यांची हालचाल, मार्ग आणि स्थानावर अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवले जाते.

नवी मुंबईतील रहिवाशांनी सांगितले की, त्यांना कधीच कचरा उचलला गेला नाही या समस्येचा सामना करावा लागत नाही. नवी मुंबई, खारघर येथील रहिवासी रजनीकांत राजू म्हणाले की, “आम्हाला या कचरा मुक्त शहराच्या उपाधीचा अभिमान आहे, ही एक चांगली बाब आहे आणि यामुळे या शहरातील स्वच्छता अशीच कायम राखण्यास अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करेल”.

 

आणखी एक रहिवासी संदीप नाईक म्हणाले की, “कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर कचरा मुक्त शहर हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे”. इतर काही रहिवाशांना असे वाटते की, नवी मुंबईला जरी 5 स्टार दर्जा मिळाला असला तरीदेखील आंतराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या इंदूर शहरासारखी ओळख निर्माण करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत.

कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगच्या निकालात महाराष्ट्राची एकूण कामगिरी उल्लेखनीय आहे. देशातील 65 पैकी 34 शहरांना 3 स्टार आणि 70 पैकी 41 शहरांना 1 स्टार दर्जा मिळालेली शहरे राज्यातील आहेत. चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यासह राज्यातील 34 शहरांना 3 स्टार रेटिंग देण्यात आले आहे, तर अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली यासह 41 शहरांना वन स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाले व जलसाठ्यांची स्वच्छता, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पडलेल्या ढिगाऱ्याचे व्यवस्थापन इत्यादी महत्वपूर्ण निकषांवर ही स्टार रेटिंग नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचा मुख्य भर घनकचरा व्यवस्थापनावर असला तरी, त्या चौकटीत परिभाषित केलेल्या पूर्वतयारींच्या संचाच्या माध्यमातून स्वच्छतेची काही विशिष्ट मानके सुनिश्चित करण्याची काळजी यात घेण्यात आली आहे.

एकत्रितपणे 1,435 शहरे / नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्टार रेटिंग मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. मूल्यांकनादरम्यान, 1.19 कोटी नागरिकांचे अभिप्राय आणि 10 लाखांपेक्षा जास्त जिओ-टॅग चित्रे संग्रहित केली गेली आणि 5175 घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना, 1210 प्रत्यक्ष स्थळाला मूल्यांकनकर्त्यांनी भेट दिली. तर 88 शहरांनी डेस्कटॉप मूल्यांकन निश्चित केले, तर फील्ड मूल्यांकन दरम्यान 141 शहरे स्टार रेटिंगसह प्रमाणित करण्यात आली.

 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626037) Visitor Counter : 193


Read this release in: English