आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी


महाराष्ट्रातही ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी पूर्णपणे सुरू - राज्य आरोग्य मंत्री

Posted On: 12 MAY 2020 8:06PM by PIB Mumbai

मुंबई, 12  मे 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायद्वारे ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा आता पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे, असे आज राज्य आरोग्य मंत्री यांनी माहिती दिली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

देशातील जनतेच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायाच्या नॅशनल टेली कन्सलटेशन च्या वतीने प्रथमच अशा प्रकारची सेवा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे डॉक्टर रुग्णालयात आणि रुग्ण घरी राहून व्हिडीओच्या माध्यमातून आरोग्य विषयक सल्ला देऊ शकतात.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध असणार असून रविवारी ही सेवा उपलब्ध असणार नाही. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील, नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील 16 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता राज्यभर सर्वत्र ही सेवा सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे 400 हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत.

या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्ला मसलत करू शकतो. थेट व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.

*कशी वापरता येईल सेवा*

1. *नोंदणी करून टोकन घेणे*- त्यासाठी मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी करता येईल. त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.

2. लॉगईन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकच्या आधारे लॉगईन करता येईल.

3. वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टीवेट) होईल. त्यानंतर व्हीडओ कॉल करता येईल.

4. तुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.

स्रोत: DGIPR

R.Tidke/S.Tupe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623366) Visitor Counter : 230