संरक्षण मंत्रालय

लष्कराच्या दक्षिण विभागाकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना

Posted On: 03 MAY 2020 7:40PM by PIB Mumbai

पुणे, 3 मे 2020

कोविड-19 चा प्रसार रोखण्यात सर्व देश एकवटून काम करत असून, लॉकडाऊनचे पालन करत गेल्या 39 दिवसांपासून देशातले सगळे लोक घरात राहत आहेत. त्यासोबतच, संपूर्ण मानवतेच्या हितासाठी ,कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता, पहिल्या फळीत भक्कमपणे उभे राहून लढा देत आहेत. या सर्व योद्ध्यांचे साहस, निस्वार्थ त्याग आणि कोरोनाच्या कर्तव्याप्रती समर्पण भावना, या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी मानवंदना अर्पण केली. जगभरात कोरोनाविरुद्ध सुरु असलेली ही लढाई आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या लढाईत आघाडीवर असलेले डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, सध्या अविरत काम करत असून, या कसोटीच्या काळात, देशातील नागरिक सुरक्षित राहावेत आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात, याची दक्षता घेत आहेत. त्यांचे श्रम आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळेच आपण कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले आहे. आता जेव्हा देश काही निर्बंध शिथिल करण्याची तयारी करत आहे, त्याचवेळी, या युद्धात लढणाऱ्या कोरोना योध्यांचे आभार मानून यापुढेही मानवी आयुष्य वाचवण्यासाठी अशीच सेवा द्यावी, अशी प्रेरणा दक्षिण विभागाने या कृतीतून दिली आहे.

दक्षिण विभाग कमांडर यांचे निवेदन

कोविड-19 चा प्रसार रोखण्याचे आव्हान कोरोना योद्ध्यांनी स्वीकारले असून, त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरतो आहोत. या सर्व पुरुष/महिलांनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून ते संपूर्ण देशवासियांच्या अभिनंदनास पात्र आहेत. या कोरोना योध्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेसाठी, आम्ही, दक्षिण लष्करी दलाचे सर्व सदस्य त्यांना सलाम करतो.

कोविड-19 च्या लढ्यात सहभागी असलेल्या योध्यांचा आज लष्कराच्या वतीने सन्मान करण्यात आला. यात सफाई कर्मचारी, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयातील आणि इतर कर्मचाऱ्यांचा पुण्यात विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 



(Release ID: 1620746) Visitor Counter : 156


Read this release in: English