पंचायती राज मंत्रालय
महाराष्ट्रातील शेतकी उत्पादक संघटना योजनेच्या कामाचे पंतप्रधानांकडून कौतुक
शेतकरी आणि बचतगटांना लाभ होण्यासाठी मेदनकरवाडीच्या सरपंचांना तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची, पंतप्रधानांची सूचना
Posted On:
24 APR 2020 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, मुंबई 24 एप्रिल 2020
राष्ट्रीय ग्रामपंचायत दिवसानिमित्त पंतप्रधानांनी आज सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधला.
पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी या गावातल्या सरपंच प्रियंका रामदास मेदनकर यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावकऱ्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली तसेच लॉकडाऊनच्या काळात सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठीची व्यवस्था कशाप्रकारे करण्यात आली आहे, याचीही माहिती घेतली.
सरपंच श्रीमती मेदनकर यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांच्या ग्रामपंचायतीत नियमांचे पालन करण्यासाठी सुरुवातीपासून अनेक पावले उचलण्यात आली. लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 मार्च, 2020 ला संपूर्ण गावात हायपो-सोडियम क्लोराईडचा फवारा करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याशिवाय ग्रामपंचायतीने दोन निर्जंतुकीकरण बोगदे उभारले असून घरोघरी साबणाचे वाटप देखील केले आहे.
घरांमध्येच 5,000 पेक्षा जास्त मास्क तयार करण्यात आले असून, ते गावातल्या लोकांना वाटण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणे टाळण्यासाठी शिधा/किराणा आणि भाजीपाल्याच्या दुकानामध्ये सम-विषम धोरण अवलंबले जात आहे, त्यामुळे ही दुकाने एकदिवसाआड सुरु असतात. तसेच स्वयंसेवकांची मदत घेऊन भाज्यांचे घरपोच वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक महिलेचे आरोग्य सांभाळण्यासाठी तिला सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. घरात विलगीकरण करण्याच्या सुविधादेखील निर्माण केल्या गेल्या.
मेदनकरवाडी ग्रामपंचायत लॉकडाऊन बाबत करत असलेल्या उपाययोजनांविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. शेतकी उत्पादक संघटनेचे महाराष्ट्रात उत्तम काम सुरु असल्याचेही सांगत, याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सरपंचांनी ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली, हे देशव्यापी कृषी व्यापार पोर्टल असून, यावर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकतो. महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने GeM या सरकारी ई-बाजार पोर्टलच्या माध्यमातून थेट सरकारला विकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पंतप्रधानांनी सरपंचांना केले.
पंतप्रधानांचा सरपंचांशी संवाद इथे पहा
MD/RT/MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617766)
Visitor Counter : 147