PIB Headquarters
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे डायलिसिस केंद्रांसाठी विशेष निर्देश जारी
Posted On:
11 APR 2020 3:30PM by PIB Mumbai
मुंबई, 11 एप्रिल 2020
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डायलिसिस केंद्रांसाठी विशेष निर्देश जारी केले असून त्यामध्ये कोविड-19ची लक्षणे दिसणाऱ्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या रुग्णांना डायलिसिस उपचार देण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
मुंबईत मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस केंद्रांकडून नियमितपणे मेंटेनन्स डायलिसिस केले जाते. यापैकी काही केंद्रे कोविड-19ची लक्षणे असलेल्या रुग्णांचे डायलिसीस करत असल्याने त्यातून या रोगाचा प्रसार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या डायलिसिस केंद्रांना निर्देश देण्यात येत आहेत कि त्यांनी रुग्णांना डायलिसिसवर ठेवण्यापूर्वी कोविड-19 ची लक्षणे (खोकला, सर्दी, ताप वगैरे) आहेत का याची तपासणी करावी. त्याचप्रमाणे अशी डायलिसिस केंद्रे अन्य रुग्णांचे डायलिसीस करण्याबरोबरच कोविड-19 रुग्णांसाठी डायलिसिसची स्वतंत्र सुविधा निर्माण करू शकतात.
दुसरा पर्याय म्हणून डायलिसिसची गरज असलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांना पुढील रुग्णालयांमध्ये पाठवता येईल-
- कस्तुरबा रुग्णालय
- के. ई. एम रुग्णालय
- सैफी रुग्णालय
- सेव्हन हिल्स रुग्णालय
- नानावटी रुग्णालय
वरील रुग्णालयांमध्ये कोविड-19 बाधित रुग्णांसाठी राखीव वेळ आणि खाटा उपलब्ध आहेत का याची खातरजमा केल्यानंतर डायलिसिस आवश्यक असलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांना या रुग्णालयांमध्ये पाठवता येईल.
डायलिसिस झाल्यानंतर या रुग्णांना पुन्हा त्यांच्या मूळ रुग्णालयात परत नेता येईल.
जर कोणतेही केंद्र या शर्तींचे उल्लंघन करताना आढळले तर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
***
Source : सुरेश काकाणी
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)
R.Tidke/M.Chopade/S.Kane/P.Kor
(Release ID: 1613274)
Visitor Counter : 115