संरक्षण मंत्रालय
कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज
या कठीण प्रसंगी स्वतःहून सेवा देण्याचे सेवानिवृत्तांचे उद्दिष्ट
Posted On:
02 APR 2020 12:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020
कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना राष्ट्र करीत असताना, संरक्षण मंत्रालयाच्या (एएसएम) माजी सैनिक कल्याण विभागाने (ईएसडब्ल्यू),आवश्यक तेथे मनुष्यबळ वाढवून राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन किंवा त्यांना नेमून दिलेले कोणतेही सार्वजनिक उपक्रम राबविण्यात राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी जास्तीत जास्त सेवानिवृत्त स्वयंसेवकांची ओळख पटवून त्यांना एकत्रित करण्यात राज्य सैनिक मंडळे आणि जिल्हा सैनिक मंडळे महत्वाची भूमिका बजावत आहेत.
या आव्हानात्मक परिस्थितीत देशाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वतःहून सेवा देण्याची सेवानिवृत्तांची तयारी खरोखर वाखाणण्याजोगी आहे.माजी सैनिक हे अतिशय शिस्तप्रिय, ध्येयाने प्रेरित असतात तसेच प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले असते. देशातील प्रत्येक जिल्ह्यात आणि खेड्यात कार्य करण्यासाठी ते उपलब्ध आहेत.
पंजाब राज्यात, 4,200 माजी सैनिकांचा समावेश असलेल्या ‘गार्डियन्स ऑफ गव्हर्नन्स’ नावाची संस्था, सर्व खेड्यांतील माहिती संकलन करण्यास मदत करीत आहे. छत्तीसगड सरकारने पोलिसांना मदत करण्यासाठी काही माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सैनिक स्वयंसेवकांची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये, सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहेत आणि सेवानिवृत्त लष्करी वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती मिळवून त्यांना तयारीत ठेवले आहे. याव्यतिरिक्त, उत्तराखंडमध्ये गरज पडल्यास सैनिक विश्रामगृहे ही अलगीकरण/विलगीकरण कक्ष म्हणून तयार केली जात आहेत. गोव्यात, एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि स्थानिक प्रशासनाला कोणत्याही सहकार्यासाठी गरज पडल्यास माजी सैनिकांना तैनात रहाण्यास सांगितले गेले आहे.
U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1610195)
Visitor Counter : 209