शिक्षण मंत्रालय

कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सज्जतेबाबत केंदीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी 23 आयआयटी संचालकांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा


कोविड-19 वर अधिकाधिक संशोधन करण्याच्या निशंक यांनी आयआयटीना दिल्या सूचना

Posted On: 01 APR 2020 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2020


केंदीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज नवी दिल्ली इथून  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील 23आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या सर्व संचालकांची बैठक घेतली. सर्व विद्यार्थी, अध्यापक, त्यांचे कुटुंबीय तसेच संस्थेच्या आवारात काम करणाऱ्या सर्व हंगामी कर्मचाऱ्यांची काळजी संस्थांनी घ्यावी आणि त्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नसल्याची खातरजमा करावी, असे निर्देश निशंक यांनी या बैठकीत उपस्थित संस्था संचालकांना दिले. 

जास्तीत जास्त विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. संस्थांनी  स्वयं/ स्वयंप्रभा यावर अभ्यासक्रम टाकून क्रेडिट ट्रान्सफर प्रणालीचा (श्रेयांक पद्धत) अवलंब करावा. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांकडे (लॉकडाउन काळात) सर्व संस्थांनी लक्ष द्यावे आणि त्यासाठी हेल्पलाईन सुरु करावी असे त्यांनी सांगितले. प्रत्येक संस्थेने मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी मानसशास्त्रज्ञांचा समावेश असलेले एक कृतीदल स्थापन करावे. अध्यापकांचा पगार, त्यांचे निवृत्तीवेतन तसेच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम वेळेवर देण्यात यावी आणि यात कोणतीच अडचण असता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले. हंगामी कर्मचारी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे 30एप्रिलपर्यंतचे संपूर्ण वेतन त्यांना देण्यात यावे तसेच त्यांना कोणतीही अडचण भासू देऊ नये असेही निर्देश निशंक यांनी दिले.

 

सर्व संस्थांनी पंतप्रधान काळजीवाहू मदत निधीत योगदान देण्याचे आवाहन निशंक यांनी केले. संस्थांनी कोविड-19 संदर्भात सक्रिय संशोधन करावे तसेच जे संशोधन आधीच झाले आहे त्याचा विस्तृत प्रचार-प्रसार सामाजिक माध्यमातून तसेच अन्य माध्यमातून करावा, असे त्यांनी पुढे सांगितले. 

सध्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी अशा सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिल्या. परस्परांमधील सुरक्षित अंतर, अन्न वितरण यात विशेष काजी घ्यावी. संस्थांनी त्यांची वार्षिक दिनदर्शिका बनविताना विद्यार्थ्यांची उन्हाळी आणि हिवाळी अंतर्वासिता चुकणार नाही याची काळजी घ्यावी. विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी संस्थांनी कृती दल स्थापन करून मागील वर्षांपेक्षा कमी प्लेसमेंट होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

आयआयटी मुंबईने सुरु केलेल्या 'इन्क्युबेशन' सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व आयआयटीनी पुढे यावे असे निर्देश त्यांनी दिले.

सर्व विद्याशाखा सदस्य, अध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच सर्व उपलब्ध हंगामी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती या बैठकीदरम्यान सर्व संस्था संचालकांनी दिली. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या मदतीसाठी संस्था संचालक, सर्व अध्यापक, कर्मचारी त्यांच्या सतत संपर्कात असतात असे या संस्थांनी सांगितले.  संशोधनाच्या क्षेत्रात संस्थांनी केलेल्या विशेष कामगिरीवर संचालकांनी यावेळी  प्रकाश टाकला, खासकरुन कोविड -19 विरुद्धच्या लढाईत  मास्क, कमी किमतीचे व्हेंटिलेटर, सॅनिटायझर, टेस्टिंग किट्स इत्यादी संरक्षणात्मक उपाययोजनांची माहिती दिली. या संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी केले आणि या संस्थांमध्ये आणखी संशोधन व्हावे. अशी इच्छा व्यक्त केली तसेच याकामी सरकार प्रोत्साहन देईल असे सांगितले.

आयआयटीच्या संचालकांनी आश्वासन / माहिती दिली आहे की: -  

  • आयआयटीचे बरेचसे विद्यार्थी सध्या संस्थेच्या आवारात नाहीत. जे आहेत त्यांना अन्न, सुरक्षा इत्यादी शक्य ती सर्व मदत दिली जात असून त्यांच्यात सुरक्षित अंतर राखले जाईल, याची काळजी घेतली जात आहे. 
  • सर्व संस्था या सुरक्षित अंतराचे पालन करीत असून विद्यार्थी, विद्याशाखा सदस्य, अध्यापक, त्यांचे कुटुंबीय तसेच आवारातील सर्व हंगामी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.
  • जे विद्यार्थी नियमित वर्गात येऊ शकत नाहीत त्यांना योग्य वेळ मिळावी यासाठी संस्था ऑनलाईन अभ्यासक्रम देत आहेत.
  • सध्या ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा नाही अशा विद्यार्थ्यांनी ती नंतर वापरु शकतील यासाठी ऑनलाईन सामग्री तयार व जतन करण्याचे निर्देश विद्याशाखा सदस्यांना देण्यात आले आहेत.
  • सध्याच्या लॉकडाउन काळात विद्यार्थी शैक्षणिक कामांपासून वंचित राहू शकणार नाहीत या उद्देशाने आयआयटी, सुधारित शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) तयार करण्याच्या दिशेने काम करीत आहेत.
  • जिथे विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटनंतर नोकर्‍या मागे घेण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी जुलै / ऑगस्टमध्ये विशेष मोहीम राबविली जाईल.
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणात / प्रेरक हेतूमध्ये सातत्य राखण्यासाठी संस्था सतत कार्य करीत आहेत. कोविड -19 वर संशोधन करण्यासाठी काही आयआयटी विविध रोख पुरस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत.

 

 

 

U.Ujgare/V.Joshi/D.Rane


(Release ID: 1610116) Visitor Counter : 189


Read this release in: English