रेल्वे मंत्रालय
कोविड-19 मुळे झालेल्या संपूर्ण संचारबंदी काळात भारतीय रेल्वेकडून गरजूंना अन्न पुरवठा सुरु; शनिवारपर्यंत शिजविलेल्या अन्नाच्या 1 लाख 40 हजार पाकिटांचे केले वाटप
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाच्या स्वयंपाकघरात बनविली गेली 1 लाखांपेक्षा जास्त पाकिटे
रेल्वे संरक्षण पोलीस दलाची देखील मदत, अन्न वितरणात मुख्य भूमिका निभावण्यासोबतच स्वतःच्या स्रोतांद्वारे पुरविली 38,600 अन्न पाकिटे
Posted On:
01 APR 2020 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020
कोविड-19 संसर्गामुळे देशभर लागू असलेल्या संपूर्ण संचारबंदीमुळे रेल्वे स्थानक आणि परिसरातील अनेक गरजूंना अन्न मिळणे कठीण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. आयआरसीटीसी अर्थात भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने रेल्वे संरक्षण दल आणि विविध क्षेत्रांमधील रेल्वेच्या इतर व्यापारी विभाग, राज्य सरकार तसेच अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने शिजविलेल्या अन्नाच्या पाकिटांचे वितरण सुरु केले आहे. या उपक्रमाद्वारे कागदाच्या ताटांमध्ये शिजविलेले अन्न तसेच अन्नाची पाकिटे यांचे वाटप केले जात आहे. अर्थात यावेळी, स्वच्छता आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेल्वे स्थानकासोबतच लगतच्या परिसरातील गरजू भुकेल्या व्यक्तींना देखील अन्नाच्या पाकिटांचे वितरण केले जावे यासाठी रेल्वेच्या विविध क्षेत्रांचे महाव्यवस्थापक तसेच विभागीय व्यवस्थापक संबधित क्षेत्रांमधील आणि विभागांमधील आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. आयआरसीटीसीने शनिवारपासून गरीब आणि गरजू व्यक्तींना अशा 1 लाख 2937 जेवणाच्या पाकिटांचे वाटप केले आहे.
रेल्वेच्या या उपक्रमात रेल्वे संरक्षण दलाने सक्रीय सहभाग घेतला असून आयआरसीटीसीने तयार केलेल्या जेवणाचे वितरण करण्यासोबतच रेल्वे संरक्षण दलाने स्वतःच्या अंतर्गत स्रोतांद्वारे 38,600 व्यक्तींना जेवण पुरविले आहे.
रेल्वे स्थानक आणि परिसरातील गरीब तसेच गरजू व्यक्तींना अन्न आणि इतर आवश्यक गोष्टी पुरविण्यासाठी शक्य असलेले सर्व स्रोत वापरून संपूर्ण क्षमतेने त्यांना सर्व मदत करावी असे निर्देश रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेल्वे स्थानक परिसराच्या बाहेरील भागातील गरजूंना देखील ही मदत पोहोचवायला हवी असे ते म्हणाले. देशातील संपूर्ण संचारबंदीमुळे, भविष्यात होऊ शकणाऱ्या अन्नाच्या वाढत्या मागणीचा विचार करून रेल्वे विभागाने अन्नधान्य आणि इतर आवश्यक पदार्थांचा पुरेसा साठा करून ठेवला असून कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्याची तयारी विभागाने करून ठेवली आहे.
G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
(Release ID: 1610080)
Visitor Counter : 157