रेल्वे मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रीय लढ्याला पाठबळ देण्यासाठी रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वेच्या तयारीचा घेतला आढावा


इतिहासात पहिल्यांदाच, मागील 12 महिन्यांमध्ये रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही; भारतावर कोविड-19 चा किमान परिणाम व्हावा हे सुनिश्चित करण्यासाठी आता आम्ही काम करत आहोत : रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल

गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि इतर मदत पोहोचवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

Posted On: 01 APR 2020 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020

 

रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारतीय रेल्वेच्या  अधिकाऱ्यांना मनुष्यबळ क्षमता आणि स्रोतांचा सर्वोत्तम वापर करून गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि इतर मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. आयआरसीटीसी आणि आरपीएफ सारख्या रेल्वे संघटना आधीपासूनच गरजू व्यक्तींना मोफत अन्न वितरणाचे काम करत आहेत. मंत्री पुढे म्हणाले की, रेल्वेने आपल्या प्रयत्नांना अधिक विस्तारित करत जिल्हा अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाशी सल्लामसलत करून रेल्वे स्थानकांच्या पुढे जाऊन मदत करावी. या बैठकीला रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, रेल्वे बोर्डाचे सदस्य, जीएम आणि देशभरातील पीएसयू प्रमुख उपस्थित होते, जे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

कोरोना विरुद्धच्या लढयात आतापर्यंत रेल्वेने केलेल्या असामान्य कामाची आणि प्रवासी डब्यांचे  रुपांतर अलगीकरण कोचमध्ये करण्यासारख्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांची प्रशंसा करताना पियुष गोयल यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, सर्व क्षेत्र हे आव्हान पूर्ण करतील आणि लवकरात लवकर सर्व वैद्यकीय सुविधांनी हे डब्बे सज्ज होतील. पहिल्या टप्प्यात 5000 प्रवासी डब्ब्यांच्या रूपांतराचे काम आधीच सुरु झाले आहे याची नोंद घेतली पाहिजे.

पंतप्रधानांनी देशाला मदतीची हाक दिल्यानंतर रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी, पंतप्रधान केअर फंडात 151 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी सांगितले की भारतीय रेल्वे आणि रेल्वे पीएसयूच्या कर्मचार्‍यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार पंतप्रधान केअर निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक रेल्वे पीएसयू देखील राष्ट्रीय प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी या निधीत योगदान देण्याची योजना आखत आहेत. 

महत्वाच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष पार्सल गाड्यांचा आढावा घेताना पियुष गोयल यांनी अधिकाऱ्यांना ही सेवा अधिक मार्गांवर उपलब्ध करून देण्यास सांगितले जेणेकरून संपूर्ण देशभरात औषधे, आवश्यक उपकरणे, खाद्यपदार्थांचा पुरवठा जलद गतीने करणे शक्य होईल. ई-कॉमर्स कंपन्या आणि इतर महत्त्वपूर्ण वस्तूंच्या पुरवठा करणाऱ्यांना पार्सल गाड्यांचा फायदा होणार आहे. पार्सल विशेष गाड्या आधीच 8 मार्गांवर धावत असून 20 अधिक वेगवेगळ्या झोनमध्ये सुरु होण्याच्या मार्गावर आहेत.

पीयूष गोयल म्हणाले की कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यातील पुढील काही आठवडे गंभीर आहेत आणि आपण सर्व करत असलेल्या दृढ प्रयत्नांमुळे ही लढाई आपण नक्की जिंकू ही खात्री आहे.

इतिहासात पहिल्यांदाच, मागील 12 महिन्यांमध्ये रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही. आता आम्ही भारतावर कोविड-19 चा किमान परिणाम व्हावा हे सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत असंही गोयल म्हणाले.

 

 


B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 



(Release ID: 1609957) Visitor Counter : 168


Read this release in: English