आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
31 MAR 2020 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
देशात कोविड -19 ला प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यावर उच्च स्तरावर देखरेख ठेवली जात आहे आणि राज्यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. माननीय पंतप्रधान संबंधित मंत्रालये / विभाग आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर परिस्थितीवर देखरेख करीत असून आढावा घेत आहेत.
जनजागृती करणे, सामाजिक सुरक्षित अंतर राखण्यावर भर देणे, गरीबांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी व्यवस्था करण्याबरोबरच कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी समाज कल्याण संघटनांचे प्रतिनिधी करत असलेल्या प्रयत्नांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांनी जगभरातील सर्व दूतावासांचे प्रमुख आणि उच्चायुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून कोविड 19 रोगाबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली आणि चर्चा केली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिगटाची (जीओएम) दहावी बैठक पार पडली. नागरी उड्डाण मंत्री हरदीप एस. पुरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, नौवहन, रसायन व खते मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री मनसुख मांडवीय , आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, मंत्रिगटाचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. लॉकडाउनची अंमलबजावणी, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, नवीन हॉटस्पॉट्स रोखण्याचे उपाय, पीपीई, मास्क , व्हेन्टिलेटर इत्यादी आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा सुनिश्चित करणे आदी मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
कोविड- 19 संदर्भात वैज्ञानिक संस्था, उद्योग आणि नियामक संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य प्रा विनोद पॉल आणि केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांच्याबरोबर काम करून कोविड -19 या रोगाची चाचणी सुविधा वाढवण्याची महत्वपूर्ण गरज लक्षात घेऊन संशोधन आणि विकासाबाबत जलद निर्णय.घेईल.
वस्त्रोद्योग, औषधनिर्माण संस्था आणि राज्य मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पीपीई, मास्क आणि व्हेन्टिलेटरची गरज, , आवश्यक वस्तू तयार करणारे कारखाने यांच्यावर देखरेख ठेवत असून कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेण्यासाठी सर्व राज्यांशी समन्वय साधत आहे, जेणेकरून कुणीही/काहीही दुर्लक्षिले जाणार नाही
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एएनएम, आशा, अंगणवाडी कामगार, आयुष डॉक्टर्स, डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य व्यावसायिकांसाठी संबंधित क्षेत्रात देखरेख ठेवणे, निरीक्षण, प्रयोगशाळेतीळ चाचणी, क्लिनिकल व्यवस्थापन, अलगीकरण सुविधा व्यवस्थापन, अतिदक्षता सेवा, संसर्ग नियंत्रण व्यवस्थापन आणि कोविड - 19 व्यवस्थापनासाठी विलगीकरण सुविधा व्यवस्थापन यासाठी संकेतस्थळावर प्रशिक्षण संसाधने अपलोड केली आहेत. 30 मार्च रोजी आरोग्य मंत्रालयामार्फत दोन वेबिनार घेण्यात आले, ज्यामध्ये 15,000 परिचारिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.
आत्तापर्यंत कोविड प्रादुर्भाव झालेले 1251 रुग्ण असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 227 नवीन रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(Release ID: 1609686)
Visitor Counter : 212