पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 चा सामना करण्यासाठी ‘सामाजिक अंतर” हाच सर्वाधिक प्रभावी उपाय असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन; देशवासियांना स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन


‘मन की बात’ कार्यक्रमात आपले विचार मांडतांना, भारत कोरोनाविरुद्धची लढाई जिंकेल असा पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

जागतिक साथीचा आजार रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक; कोरोनाच्या उच्चाटनासाठी जागतिक समुदायाने एकत्र येण्याचे आवाहन

कोरोना आजारातून बरे झालेले रुग्ण आणि डॉक्टरांशी पंतप्रधानांनी साधला संवाद; त्यांच्या सकारात्मकता आणि निश्चयाचे केले कौतुक

जे अलगीकरण आणि स्वयं-विलगीकरण कक्षात आहेत, त्यांच्याविषयी सहानुभूती आणि सहकार्याची भावना दाखवण्याचे आवाहन

Posted On: 29 MAR 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020

 

“कोरोना विषाणूशी लढणारे अनेक सैनिक आपापल्या घरात बसलेले नाहीत, ते आपल्या घराबाहेर पडून काम करत आहेत. हे सगळे पहिल्या फळीतले सैनिक असून, विशेषतः परिचारिका, डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी, जे अविरत कार्यरत आहेत, ते सगळे आपले लढवय्ये आहेत. मी त्यांच्यापैकी काही लोकांशी बोललो आणि त्यांच्या या सेवेबद्दल आणि आपला उत्साह टिकवून ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कामाप्रती असलेली त्यांची कळकळ आणि बांधिलकी माझेही मनोधैर्ये वाढवणारे आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

‘सामाजिक अंतर’ पाळणे हा कोरोनाविरुध्द लढा देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, आणि म्हणूनच लॉकडाऊनचा निर्णय घेऊन, जास्तीत जास्त लोकांना या आजारापासून संरक्षित ठेवतो आहोत, असेही ते म्हणाले.

'मन की बात'च्या 10 व्या भागात त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. ‘प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची येणारे अनेक दिवस काळजी घ्यायची आहे आखून दिलेली लक्ष्मणरेषा, प्रत्येकाला पाळावीच लागणार आहे. प्रत्येक भारतीयाचा निश्चय आणि संयमचा आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार आहे,” असे मोदी यांनी सांगितले. 

संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वासाठीच धोकादायक ठरलेल्या या विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी, जागतिक समुदायाने एकत्र यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

“कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला बंदिवान केलेलं आहे. आपले ज्ञान, विज्ञान, श्रीमंत आणि गरीब, सशक्त आणि अशक्त अशा सर्वांनाच या विषाणूने आव्हान दिले आहे. हा कोणत्याही एका देशाच्या सीमेत अडकलेला नाही, ऋतू आणि प्रदेश यातही काही फरक न करता तो सगळीकडे पसरतो आहे. या विषाणूने संपूर्ण मानवजातीच्या गळयाभोवती फास आवळला आहे. आणि म्हणूनच मानवजातीला याचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावेच लागणार आहे, याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित उभे राहावे लागणार आहे’. असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, ‘130 कोटी लोकांच्या देशात, कोरोना विषाणूविरुध्द लढा द्यायचा तर लॉकडाऊन शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोरोनाविरुद्धचा लढा हा जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढा आहे, आणि म्हणूनच अशा कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात झालेली स्थिती बघता, हा एकमेव उपाय होता. संपूर्ण जनतेची सुरक्षितता जपली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

कोविड-19 च्या काळात, जे लोक लॉकडाऊन चे नियम मोडत आहेत, ते स्वतःच्याच जीवाशी खेळत आहेत. ज्यांना लॉकडाऊन चे नियम पाळण्याची इच्छा नाही, त्यांनी हे समजून घ्यावे की अशा वागण्यामुळे आपल्याला कोरोनाच्या संसर्गापासून कोणीही वाचवू शकणार नाही.

जगभरात, अनेक लोकांनी आधी या आजाराला गांभीर्याने घेतले नाही, आणि आता मात्र त्यांना पश्चात्ताप होतो आहे. कोरोनाविरुद्धचा हा लढा अभूतपूर्व आणि आव्हानात्मक असल्याने, त्याचा सामना करण्यासाठी देखील ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागले आहेत. असे पंतप्रधान म्हणाले

या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय लोक जे प्रयत्न करत आहेत, आणि जी पावले उचलली जात आहेत, त्यामुळे आपण नक्कीच या लढाईत विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अशा स्थितीत, गरिबांप्रती आपल्या मनात अधिकच सहानुभूतीची भावना असायला हवी.  या कठीण काळात, आपल्याला जिथे कुठे कोणी गरीब किंवा उपाशी व्यक्ती दिसेल, तिथे आपण त्यांना खायला द्यायला हवे, हाच मानवतेचा धर्म आहे, असे त्यांनी सांगितले.

आपण आधी त्यांच्या गरजांचा विचार करायला हवा, भारताची मूल्ये आणि संस्कृती देखील आपल्याला हेच शिकवणारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानानी एका म्हणीचा दाखला दिला. यानुसार, एखादे आजारपण किंवा अरिष्ट त्याच्या पहिल्या पातळीवरच, त्याच्या कोवळेपणातच खुडून नष्ट केले जावे. एकदा ते आजारपण वाढले, तर त्यावरचा उपचार कठीण होऊन बसतो. त्यामुळे, आपण सर्व भारतीय आज तेच करतो आहोत. 

देशभरात असा लॉक डाऊन केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांची माफी मागितली. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असला, तरीही या निर्णयामागची भावना समजून घेत जनता त्यांना क्षमा करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. विशेषतः देशातील वंचित आणि गरीब बंधू-भगिनिंना, या निर्णयामुळे किती त्रास होत असेल याची आपल्याला जाणीव आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आणखी एक सुविचार सांगत, मोदी म्हणाले की उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे भाग्य आहे आणि आरोग्य हीच जगातील आनंदाची किल्ली आहे.

कोरोना विषाणूच्या युद्धात लढणारे अनेक सैनिक आपापल्या घरात बसलेले नाहीत, ते आपल्या घराबाहेर पडून काम करत आहेत. हे सगळे पहिल्या फळीतले सैनिक असून, विशेषतः परिचारिका, डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचारी, जे अविरत कार्यरत आहेत, ते सगळे आपले लढवय्ये आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

कोविड-19 शी लढा देण्याच्या या युद्धात, सेवेत कार्यरत असलेल्या काही लोकांशी आपण दूरध्वनी वरुन संवाद साधला, त्यांचा उत्साह वाढवला आणि त्यांच्याशी बोलून आपलेही मनोधेर्य वाढले,  असे पंतप्रधान म्हणाले.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळे लढवय्ये प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत, असेही ते म्हणाले.

‘हे सगळे लोक आपल्याला जे सांगतात, ते केवळ आपल्याला केवळ ऐकण्यासाठी नव्हे तर आयुष्यात अंगीकारण्यासाठी देखील प्रेरणादायी आहे,’ असे पंतप्रधान म्हणाले. 

“भारत या लढाईत इतक्या व्यापक प्रमाणात लढतो आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे या आघाडीच्या सैनिकांची लढण्याची जिद्द, उत्साह आणि दुर्दम्य इच्छाशक्ती! यात डॉक्टर्स, परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, एएनएम कार्यकर्त्या, स्वच्छता कर्मचारी अशा सगळ्यांचा समावेश आहे. देशाला त्यांच्याही आरोग्याची आणि जीविताची काळजी आहे. त्यामुळेच सरकारने अशा 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला आहे, जेणेकरून ते अधिक आत्मविश्वासाने या लढ्यात उतरू शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या आसपास असलेले किरकोळ किराणा दुकानदार, ड्रायव्हर्स आणि कर्मचारी जे सध्या अविरत काम करत आहेत, त्यांचे ही पंतप्रधानांनी कौतुक केले. देशात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहावा, ती साखळी मोडली जाऊ नये, यासाठी हे सगळे लोक काम करत आहेत. त्याशिवाय, बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक, ई-कॉमर्सची सेवा देणारे लोक, मालाची वाहतूक करणारे, घरपोच सेवा देणारी माणसे, हे सगळे आपल्यासाठी या कठीण काळात सेवा देत आहेत, त्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले. या सगळ्यांनी देखील आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सध्याच्या स्थितीत लोकांनी केवळ सामाजिक आणि भौतिक अंतर राखायचे आहे, मानवी किंवा भावनिक अंतर नाही, हे समजून घ्यावे, असे पंतप्रधान म्हणाले. 

जे लोक सध्या विलगीकरण कक्षात आहेत, त्यांच्याशी इतर लोक चांगले वागत नसल्याचे  ऐकून आपल्याला अत्यंत दुःख झाले असे पंतप्रधान म्हणाले. सर्व जनतेचे संसर्गापासून संरक्षण व्हावे, यासाठी ज्यांनी स्वतःला विलगीकरण कक्षात कोंडून घेतले आहे, हे ही देशसेवाच करत असून त्यांचेही पंतप्रधानानी कौतुक केले.

कोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. या लॉकडाऊनच्या काळात सर्वांनी घरीच राहावे, काळजी घ्यावी, सुरक्षित राहावे आणि हा लढा जिंकावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

 

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1609083) Visitor Counter : 269


Read this release in: English