वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एक आठवड्यात बिझनेस इम्युनिटी प्लॅटफॉर्म संकेतस्थळाला 1 लाख 75 हजाराहून अधिक लोकांनी दिली भेट;


कोविड-19 बाबत भारताच्या उपाययोजनांविषयी उद्योजकांना वेळोवेळी अद्ययावत करण्यात हा मंच उपयोगी

Posted On: 29 MAR 2020 3:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020
 

कोविड-19 बाबत भारताच्या उपाययोजनांविषयी उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना दररोज 24 तास   अद्ययावत करण्यासाठीचा समग्र स्रोत म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत, भारताची राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा संस्था 'इन्व्हेस्ट इंडिया'ने त्यांच्या संकेतस्थळावर 'द इन्व्हेस्ट इंडिया बिझनेस इम्युनिटी प्लॅटफॉर्म' (https://www.investindia.gov.in/bip?utm_source=popup) उपलब्ध करून दिला आहे. 21 मार्च 2020 रोजी स्थापन झालेल्या या मंचावर आज सकाळी 10 वाजेपर्यंत 50 हून अधिक देशांमधील 1 लाख 75 हजाराहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. यावर 203 ब्लॉग्ज, इन्फोग्राफिक्स, व्हिडीओ आणि संसाधनांसह 423 शासकीय मार्गदर्शक सूचना आहेत. या संकेतस्थळावर सर्वाधिक शोधला गेलेला शब्द म्हणजे 'कोविडसाठी देणगी'.

 बिझनेस इम्युनिटी प्लॅटफॉर्म' (बीआयपी) म्हणजे व्यवसायातील अडचणींचे निराकरण करण्याचे सक्रिय व्यासपीठ असून त्या त्या क्षेत्राला वाहिलेली तज्ज्ञ मंडळी लवकरात लवकर समस्यांचे निरसन करतात. एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी 'इन्व्हेस्ट इंडियाने' सीडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेशी भागीदारी करण्याची घोषणा केली आहे.

गतिशील आणि सतत अद्ययावत करणारे हे व्यासपीठ कोरोना विषाणू प्रादुर्भावाबाबतच्या घडामोडींचा नियमित आढावा घेण्याबरोबरच या विषाणू संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती पुरवित आहे तसेच विशेष तरतुदीना मार्ग दाखवून ई मेल आणि व्हाट्स अँप वर उत्तरे देऊन शंकांचे निरसन करीत आहे. आत्तापर्यंत या व्यासपीठावर व्यवसायाशी निगडित 845 प्रश्न विचारण्यात आले असून त्यातील 614 प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. यातील बहुतेक प्रश्न हे लॉजिस्टिक, अधिसूचना, सीमाशुल्क तसेच उद्योग  बंद पडणे आणि स्पष्टीकरण इत्यादीबाबत होते.

बीआयपीने आवश्यक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 'जॉइनिंग द डॉट्स' ही मोहीम सुरु केली आहे. कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची मागणी-पुरवठा टंचाई भरून काढण्यासाठी मॅचमेकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. उद्योजकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत सुमारे 2000 जागतिक आणि देशांतर्गत व्यवसाय आणि उद्योजकांशी संपर्क साधला आहे. 'कोविड-19 आव्हानांवर स्टार्ट अप ची उत्तरे' याविषयी या संकेतस्थळावर 17 राज्यांमधून 120 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. देशातील लॉकडाउन परिस्थितीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील निराकरण यासाठी या संकेतस्थळाद्वारे अमेरिकेतील वित्तीय सेवा कंपन्यांबरोबर कॉन्फरन्स कॉल करण्यात आला. उद्योग प्रमुख आणि इतर हितसंबंधी पॅनलसह कोविड-19 चा मुकाबला करताना  स्टार्ट अप नी उद्योग कसे सुरु ठेवावे याविषयी वेबिनारचे आयोजन केले होते. संभाव्य निधी आणि समर्थन यावर चर्चा झाली: कोविड-१९ दरम्यान स्टार्टअप्सची संधी आणि वर्क फ्रॉम होम वर चर्चा झाली तसेच लॉकडाऊन दरम्यान त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे निराकरण कसे करावे याविषयी चर्चा करण्यासाठी अमेरिकन लाइफ सायन्सेस कंपन्यांसमवेत खास कॉन्फरन्स कॉल घेण्यात आला.

 


B.Gokhale/V.Joshi/D.Rane


(Release ID: 1609003) Visitor Counter : 146


Read this release in: English