श्रम आणि रोजगार मंत्रालय

कामगार भविष्य निर्वाह निधीतून अनिवार्य परताव्याशिवाय आगाऊ रक्कम मिळण्याची सोय; कामगार मंत्रालयाकडून सुधारणा जारी


नवी सुधारणा लागू करण्याचे कामगार भविष्य निधी संघटनेचे सर्व प्रादेशिक कार्यालयांना आदेश

Posted On: 29 MAR 2020 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020

 

देशातील भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांना कोविड-19 या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनिवार्य परताव्याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ रक्कम मिळण्याची सोय करून देणारी नवी सुधारणा कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केली आहे. त्याकरिता कामगार भविष्य निर्वाह निधी योजना 1952 मध्ये आवश्यक सुधारणा करणारी अधिसूचना नुकतीच मंत्रालयाने जारी केली. देशभरातील आस्थापना आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि कामगार भविष्य निर्वाह निधी योजना 1952 चे सदस्य असलेल्या सर्व कामगारांसाठी ही सुधारणा कालपासून लागू झाली आहे. नव्या सुधारणेनुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम किंवा कामगाराच्या खात्यात एकूण जमा निधीच्या 75% पर्यंत यापैकी एक रक्कम त्या कामगाराला मिळू शकेल आणि ही रक्कम परत करणे अनिवार्य नसेल. 
कामगार मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केल्यानंतर, यासंदर्भात सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत. कोविड-19 महामारीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी सदस्यांच्या आगाऊ रक्कमेची मागणी करणाऱ्या अर्जांवर तातडीने पुढील प्रक्रिया सुरु करावी आणि सदस्य कामगार आणि त्याचे कुटुंब यांना दिलासा द्यावा, असे निर्देश संघटनेने सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला पाठविलेल्या सूचनेत दिले आहेत.

 

 

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane


(Release ID: 1608995) Visitor Counter : 222


Read this release in: English