संरक्षण मंत्रालय
कोविड – 19 च्या आव्हानांचा सामना करण्यासाठी छावणी दल (कॅन्टोमेंट बोर्ड) सक्षम
Posted On:
27 MAR 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2020
कोरोना विषाणू (कोविड-19) महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अंदाजे 21 लाख (लष्करी आणि नागरी लोकसंख्येसह) लोकसंख्या असलेले संपूर्ण देशभरातील 19 राज्य/केंद्रशाषित प्रदेशातील 62 छावणी दल सज्ज झाले आहेत. कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याच्या उद्देशाने सर्व छावणी मंडळांना रुग्णालये/आरोग्य सेवा केंद्र आणि अतिथी गृहांमधील खाटांची उपलब्धता तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
छावणी दलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आपापल्या विभागातील नागरी अधिकाऱ्यांशी निरंतर संपर्कात असून त्यांना गरज असेल तेव्हा आवश्यक ती मदत पुरवत आहेत. सर्व छावणी दल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.
छावणी क्षेत्रातील सर्व कार्यालयीन इमारती, रहिवासी विभाग, शाळा आणि आसपासचा परिसर, वाचनालये, उद्याने आणि बाजारपेठांमध्ये नियमित स्वच्छता केली जात आहे. छावणीमधील सगळ्या महत्वाच्या ठिकाणी, कार्यालये आणि बाजारपेठांमध्ये लाउड स्पीकर, माहिती फलक, होर्डिंग/पत्रके या सगळ्यांच्या माध्यमातून कोडीव-19 विषयी सामान्य नागरिकांना जागृत करण्यात येत आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना कोविड-19 चा प्रसार टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती देत आहेत आणि त्यासोबतच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी छावणी सामान्य रुग्णालये सज्ज करत आहेत. डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट (डीजीडीई) यांच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर कृती योजना तयार केल्या आहेत. आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी सर्व सीजीएचएस पूर्णवेळ कार्यरत आहेत. छावणी दलाने सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे, सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या आहेत. छावणी क्षेत्रातील सर्व हॉटेल आणि उपहारगृहांना मार्गदर्शक सल्ल्यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
छावणी भागात राहणाऱ्या विशेषतः गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आदी गोष्टींचा पुरवठा व्हावा यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली असून या दलात कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व किराणामाल दुकानांमध्ये काळा बाजार, गर्दीला प्रतिबंध करण्यात आला असून ही सर्व दुकाने लॉकडाऊनच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करतात. छावणी दल निरंतर आणि अबाधित पाणी पुरवठा व्यवस्था तसेच पथ दिवे सेवेची निश्चिती देते. बहुतांश छावण्यांमध्ये रहिवाश्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
छावणी क्षेत्रातील संपूर्ण नगरपालिका प्रशासन हे छावणी मंडळाच्या अंतर्गत येते. छावणी क्षेत्र हे प्रामुख्याने सैनिक आणि त्यांच्या आस्थापनांना सामावून घेण्यासाठी स्थापन करण्यात आले होते हे लक्षात ठेवून छावणी मंडळाची अद्वितीय रचना यशस्वीरीत्या कायम ठेवली जात आहे. छावणी क्षेत्र हे सैनिकी छावण्यांपेक्षा वेगळे आहे; सैनिक छावण्या ह्या संपुर्णपणे सैन्य दलाच्या वापरासाठी आणि राहण्यासाठी असून त्यांची स्थापना कार्यकारी आदेशानुसार करण्यात आली आहे तर छावणी क्षेत्रामध्ये सैनिक आणि सामान्य नागरिक दोन्ही आहेत.
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1608825)
Visitor Counter : 171