पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी साधला आयुष वैद्यकीय तज्ञांशी संवाद


देशाला निरोगी ठेवण्यात आयुष वैद्यकीय क्षेत्राची महत्वाची परंपरा; कोविड-19 चा प्रसार रोखण्यातही त्यांचे महत्वाचे योगदान : पंतप्रधान

आयुष वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित बनावट औषधोपचारांचे दावे आणि अफवा रोखून सत्य समोर आणणे महत्वाचे

जनतेपर्यंत पोचून आजाराबाबत सातत्याने जनजागृती करण्यासाठी टेलिमेडिसिन माध्यमाचा वापर करा-पंतप्रधान

‘घरात-योग’उपक्रमाचा प्रसार केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आयुष मंत्रालयाचे कौतुक

Posted On: 28 MAR 2020 3:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मार्च 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष अंतर्गतपाच वैद्यकीय शाखांमधील तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

देशातील जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-19 सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. या वैद्यकीय शाखांचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले असून, त्याचा यासाठी उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुसारे काम करत ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आणि वैद्यकीय काळजी घेण्याचा सल्ला जनतेला द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. ‘घरच्याघरी योगाभ्यास’ हा उपक्रम सुरु करुन, लोकांमधला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालयाचे कौतुक केले.

आयुषअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शाखांच्या नावाखाली बनावट औषधोपचार आणि सिद्ध न करता येणारे दावे ओळखून ते रोखण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आयुषचे शास्त्रज्ञ, ICMR, CSIR आणि इतर संशोधन संस्था यांनी एकत्र येऊन पुरावे आणि तथ्यांच्या आधारावर एकत्रित संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी,  देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व शक्तींनी सज्ज राहणे ही काळाची गरज आहे, आणि आवश्यकता भासल्यास, आयुष क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांची देखील मदत घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

आयुष क्षेत्रातील औषध उत्पादक कंपन्यांनी देखील आपली संसाधने वापरुन अत्यावश्यक वैद्यकीय साधने आणि औषध्ये तसेच सॅनिटायझरची अतिरिक्त निर्मिती करावी, असा सल्ला मोदी यांनी दिला. या आजाराबाबत आणि त्यापासून घ्यायच्या काळजीबाबत जनजागृती करण्यासाठी टेलीमेडीसिन चा वापर करावा,अशी सूचना त्यांनी केली. सामाजिक अंतर हाच या आजारावारील प्रभावी उपाय असून, त्याचा जोरदार आणि सातत्याने प्रसार-प्रचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

कोविड-19 चा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व म्हणून पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांचे आयुष तज्ञांनी कौतुक केले. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यात, आयुष शाखांचा कसा उपयोग होतो, याची माहिती त्यांनी यावेळी पंतप्रधानांना दिली. लक्षण आधारित उपचारांवर संशोधन करण्यासाठीचे प्रयत्न सांगून या कठीण काळात देशाची सेवा करण्याची इच्छा या तज्ञांनी व्यक्त केली.

भारताच्या पारंपरिक वैद्यकीय शास्त्रांचा जगभर प्रसार आणि उपयोग करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाची सेवा करण्यास सदैव तत्पर असलेल्या या डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी, आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट सचिव आणि आयुष विभागाचे सचिव उपस्थित होते. 

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor(Release ID: 1608820) Visitor Counter : 290


Read this release in: English