पंतप्रधान कार्यालय

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या लोकांशी संवाद साधला

Posted On: 25 MAR 2020 11:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

 

हर-हर महादेव !!

काशीच्या सर्व बंधू आणि भगिनींनो, माझा नमस्कार !

आज काबूलमधल्या गुरुव्दारामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मनाला खूप दुःख होत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व लोकांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो.

मित्रांनो,

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. चैत्र नवरात्रीच्या पवित्र दिवसाचा आज पहिला दिवस आहे. तुम्ही सगळेजण पूजा-अर्चना करण्यामध्ये व्यग्र असणार. त्यातूनही तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी खास वेळ काढलात, त्यासाठी मी आपला खूप- खूप आभारी आहे.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहिती आहे की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे स्वरूप आहे. या देवीला प्रकृतीची म्हणजेच निसर्गाची देवी असंही मानलं जातं.

आज देश ज्या संकटकाळातून जात आहे, त्यामध्ये माता शैलसुतेच्या आशीर्वादाची आपल्या सर्वांना खूप आवश्यकता आहे. माता शैलपुत्रीला मी प्रार्थना करतो आणि अशी इच्छा व्यक्त करतो की, कोरोना महामारीच्या विरोधात देशाने जे युद्ध सुरू केले आहे, त्यामध्ये हिंदुस्तानच्या एकशे तीस कोटी देशवासियांना विजय मिळावा.

काशी लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी अशा आपत्काळामध्ये आपल्यामध्ये हजर राहण्याची गरज आहे. मात्र सध्या इथं दिल्लीमध्ये ज्या घटना घडत आहेत, त्याविषयी आपल्या सर्वांनाच सर्वकाही माहिती आहे. इथल्या कामांमध्ये व्यग्र असलो तरीही मी वाराणसीविषयी सातत्याने आपल्या सहकारी मंडळींकडून अगदी ताजी माहिती घेत असतो.

मित्रांनो,

आपल्याला माहिती आहेच महाभारताचे युद्ध कुरूक्षेत्रावर 18 दिवस सुरू होते. आज कोरोनाच्या विरोधात संपूर्ण देशाने युद्ध पुकारले आहे. हे युद्ध 21 दिवस सुरू राहणार आहे. या 21 दिवसांमध्ये आपण ही कोरोनाविरुद्धची लढाई जिंकावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

महाभारतामध्ये युद्धाच्या काळात भगवान श्रीकृष्ण महारथी होते, सारथी होते. आज 130 कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासियांची खूप मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. 

काशीविषयी असं म्हटलं आहे की -

मुक्ति जन्म महि जानि, ज्ञान खानि अघ हानि कर ।

जहां बस संभु भवानि, सो कासी सेइअ कस न?

याचा अर्थ असा आहे की, काशी नगरी ही ज्ञानाची खाण-खजिना आहे. पाप आणि संकट यांचा नाश करणारी आहे.

संकटाच्या या काळामध्ये, काशी सर्वांना मार्गदर्शन करू शकते. सर्वांसाठी एक चांगला वस्तुपाठ घालून देवू शकते.

काशीचा अनुभव शाश्वत, सनातन आणि कालातीत आहे.

आणि म्हणूनच, आज लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये काशी देशाला संयम, समन्वय आणि संवेदनशीलता म्हणजे काय हे शिकवू शकते.

काशी देशाला सहयोग-सहकार्य, शांती, सहनशीलता म्हणजे काय हे शिकवू शकते.

काशी देशाला साधना, सेवा, समाधान म्हणजे काय हे शिकवू शकते.

मित्रांनो,

काशीचा तर अर्थच शिव असा आहे.

शिव म्हणजे कल्याण.

शिवाच्या या नगरीमध्ये महाकाल महादेवाच्या नगरीमध्ये संकटाशी सामना करण्याचा, सर्वांना मार्ग दाखवण्याचे सामथ्र्य असणार नाही तर, मग अशी शक्ती कोणामध्ये असणार आहे?

मित्रांनो,

कोरोना वैश्विक महामारी लक्षात घेता देशभरामध्ये खूप व्यापक प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे.

परंतु आपण सर्वांनी अगदी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीही  एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे , आपआपल्या घरामध्ये बंद राहणे हा या काळात एकमेव सर्वात चांगला उपाय या आजारावर आहे.

याविषयी आपल्या सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतील, याची मला चांगली कल्पना आहे. अनेक प्रकारच्या चिंतांनी तुम्ही ग्रासले असणार, त्याचबरोबर तुमच्याकडे मला सांगण्यासाठी काही सल्ले, काही माहितीही असणार, हे मी जाणून आहे.

चला तर मग, आपण संवाद साधू या! प्रारंभी तुमच्यापैकी कोणाच्या मनात काही प्रश्न असेल तर ते विचारा, त्यावर मी आपले मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.

नमस्कार पंतप्रधान जी!!

नमस्कार!

प्रश्न - मी प्राध्यापक कृष्णकांत बाजपेयी बोलतोय. मी वाराणसीमध्ये नॅशनल इंस्टिटयूट ऑफ डिजाइनिंग टेक्नॉलॉजी या संस्थेचा संचालक आहे. त्याच्याबरोबरच ब्लॉग लिहितो, लेखकही आहे. सध्याच्या काळात आपण कोरोनाच्या विरोधात जे युद्ध पुकारलं आहे, त्या युद्धातला मी एक सैनिक आहे. आणि सैनिकाच्या नात्याने आम्ही काही लोक मिळून थोडं काम करीत आहोत. कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करतो आहोत. आणि ते काम करत असतानाच अनेक लोकांशी बोलताना लक्षात आलं की, बरेचजण असं म्हणतात, आम्हाला हा आजार होवूच शकणार नाही. कारण आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आम्ही ज्या पद्धतीनं मोठे झालो, आमचे परंपरागत जे रितीरिवाज आहेत, आम्ही ज्याप्रमाणे परंपरांचे पालन करतो. तसेच आपल्या इथं किती गरम तापमान आहे. आता लवकरच इथल्या तापमानात तर वाढ होवू लागणार आहे. या अतिउष्म्यामुळे हा विषाणू तर पार संपुष्टात येईल. आपल्याला तर कोरोना आजार होणार नाही. मग कशाला काही करा? असा विचार करून ते सरकारच्या सूचना पाळण्याविषयी उदासिन आहेत. याबाबत पंतप्रधान जी तुम्ही काही मार्गदर्शन करावं.

- कृष्णकांत जी आपल्यासारख्ये प्रबुद्ध नागरिक आपलं व्यक्तिगत कार्य सांभाळत आणि आपला व्यवसाय सांभाळत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम करीत आहेत, याचा मला अभिमान वाटतो.

तुमच्याकडे असलेली ही सेवाभावी वृत्ती आणि समाजाविषयी असलेली संवेदना याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल. आपण कोरोनाच्या विरोधात सुरू केलेल्या लढाईत विजयी होवू.

तुम्ही आत्ता जे बोलला आहात, ते अगदी बरोबर आहे. काही लोकांच्या मनात अनेक गैरसमजुती अगदी पक्के घर करून बसल्या आहेत. आणि हा एक मनुष्य स्वभाव असतो. प्रत्येकजण आपल्याला जे सुकर, सरल वाटतं, आपल्याला करणं योग्य वाटतं, अनुकूल वाटतं, ते करण्यासाठी लागणारी गोष्ट लगोलग स्वीकारतो. जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली, ती करणं आपल्याला सोईचं वाटत असेल तर तीच गोष्ट करण्यासाठी आपण लगेच तयार होतो. असं अनेकदा घडत असतं. त्यामुळे एखादी गोष्ट जर महत्वाची, जरूरीची आणि प्रामाणिक, अधिकृत म्हणून करावी लागत असेल तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. त्यांचे लक्षच अजिबात अशा गोष्टींकडं जात नाही. आपल्याकडेही काही लोकांच्याबाबतीत असंच घडत आहे. माझा या लोकांना आग्रह आहे की, त्यांनी आपल्या मनात कोरोना आजाराविषयी ज्या काही गैरसमजुती आहेत, त्या शक्य तितक्या लवकर मनातून काढून टाकाव्यात. या आजाराविषयी नेमकी माहिती जाणून घ्यावी. सत्य काय आहे, हे समजून घ्यावे. यामध्ये सर्वात मोठी, महत्वाची सत्य गोष्ट अशी आहे की, हा आजार काही गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही. या आजारामुळं समृद्ध देशांवरही संकट आलं आहे आणि गरीबाच्या घरावर तसंच संकट येतं. इतकंच नाही तर जे लोक व्यायाम करतात, आपल्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांनाही हा विषाणू आपल्या जाळ्यात ओढू शकतो. म्हणूनच कोणी एखादा काय आहे, कोण आहे, काय काम करतो, काय करीत नाही, याला काहीही महत्व नाही. या असल्या गोष्टींकडे आपलं ध्यान देण्यापेक्षा हा आजार किती भयानक आहे, किती विक्राळ  रूप हा आजार घेवू शकतो, यावर आपण लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. या आजाराचं स्वरूप सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जी गोष्ट बोललात, ती अगदी खरी आहे. काही लोक सूचना या कानानं ऐकतात, आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांच्या बृद्धीलाही पटतं की, हे सगळं भयानक आहे. तरीही सूचनांची अंमलबजावणी ते करीत नाहीत. काही जणांना हा धोका किती गंभीर आहे, हे माहिती नसतं. आणि ते अगदी बेफिकीरीनं वागत असतात. सूचना या अंमलबजावणीसाठी असतात, हे त्यांच्या गावीही नसते. आता मला सांगा, सिगरेट ओढल्यामुळे कर्करोग होतो, गुटखा खाल्ल्यामुळे कर्करोग होतो, हे सर्वांनी कितीतरी वेळा टी.व्ही.वर पाहिलेले असते. तरीही अशी जाहिरात पहात पहात हे लोक सिगरेट ओढतात, गुटखा खातात. त्यांच्या मनावर कोणताही परिणाम जाहिरातीचा होत नसतो. हीच गोष्ट मी आज सांगतोय. लोकांना सगळं काही माहिती असूनही ते दक्षता घेत नाहीत, काळजी घेत नाहीत. परंतु नागरिक म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य करीत राहणं गरजेचं आहे. आपल्याला सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. आपण सर्वांनी अगदी ठरवून, निश्चयाने आपल्या घरामध्येच राहिलं पाहिजे. आणि एकमेकांमध्ये अंतर ठेवून राहिलं पाहिजे. कोरोनासारख्या महामारीवर एकमेव उपाय म्हणजे एकमेकांपासून लांब राहणे हाच आहे. तर व्यक्ती संयम दाखवेल आणि सूचनांचे पालन करेल तर या विषाणूंच्या प्रसाराची लागण होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की, कोरोनामुळे संक्रमित झालेले, ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ती जाणून घ्या. कोरोनाची लागण झालेले जगातले एक लाखांपेक्षा जास्त लोक अगदी ठणठणीत बरे झाले आहेत. आणि भारतामध्येही डझनभर लोक कोरोनाच्या जाळ्यातून आता बाहेर पडले आहेत.

कालच एक बातमी दाखवत होते की, इटालीमध्ये एक 90 पेक्षा जास्त वय असलेल्या आजीबाई अगदी चांगल्या, पूर्णपणे ब-या झाल्या आहेत.

आपल्याला मी माहिती देवू इच्छितो की, कोरोनाविषयीची अगदी अचूक माहिती लोकांना देण्यासाठी सरकारने व्हाॅटस् अॅपच्या सहकार्याने एक हेल्प डेस्क बनवला आहे. जर आपल्या मोबाईल फोनमध्ये व्हॉटस् अॅपची सुविधा असेल तर मी आत्ता आपल्याला एक नंबर सांगतो, तो तुम्ही लिहून घ्या. हा नंबर प्रत्येकाला उपयोगी पडेल. जर तुम्ही व्हॉटस् अॅपवर असाल तर या क्रमांकाचा उपयोग करू शकता. मी नंबर लिहून देतो. 9013515151. या क्रमांकावरून तुम्ही ही सेवा घेवू शकता. जर तुम्ही या क्रमांकावर नमस्ते असा संदेश पाठवला तर तुम्हाला कोरोनाविषयी योग्य ती उत्तरे येवू लागतील.

मित्रांनो, जे लोक आत्ता हे ऐकत आहेत, आमच्या काशीचे बंधू आणि भगिनींनो, त्याचबरोबर हिंदुस्तानमधले इतर कोणीही हे ऐकत असतील तर तुम्ही जरूर या व्हॉटस् अॅप क्रमांकावर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ‘नमस्ते’ लिहून संदेश पाठवा. आपल्याला लगेच उत्तर मिळेल. कृष्णकांत जी आपल्याला धन्यवाद. आपण आता कार्यक्रमात पुढे जावू या.

नमस्कार पंतप्रधान जी.

नमस्ते जी.

प्रश्न - माझं नाव मोहिनी झंवर आहे. मी सामाजिक कार्यकर्ती आहे. आणि महिलांसाठी काम करते. सर, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमकं काय हे आता सर्वांनाच माहिती झालं आहे. परंतु याविषयी माझ्या मनात काही आशंका निर्माण झाल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून समजलं की, देशामध्ये काही ठिकाणी डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला तसेच हवाई क्षेत्रात काम करणा-यांना कोरोना झाला असेल, अशी शंका व्यक्त करून त्यांच्याशी अयोग्य वर्तन केलं जात आहे. ही गोष्ट माहिती झाल्यावर माझ्या मनाला खूप यातना झाल्या. आता यावर उपाय म्हणून सरकार कोणती पावले उचलणार आहे, इतकंच मला जाणून घ्यायचं आहे.

मोहिनी जी, तुम्हाला ज्याप्रमाणे यातना झाल्या, तसाच त्रास मलासुद्धा होतोय. काल मी परिचारिकांबरोबर, डॉक्टर मंडळींबरोबर तसेच लॅब टेक्निशियन्स यांच्याबरोबर याविषयी अगदी सविस्तर चर्चा केली आहे. या देशाच्या सामान्य मानवीय मनाचा आपण सर्वसामान्यांप्रमाणे विचार केला पाहिजे. मी एक सामान्य जीवनाविषयी बोलतोय. योग्य वेळी योग्य काम करणे आणि आवश्यक ती पावले उचलण्याबद्दल सर्व लोक अगदी सर्व देशांचे लोक खूप विश्वास ठेवत आहेत. तुम्ही पाहिलंच असेल की, 22 मार्चला जनता संचार बंदीमध्ये लोकांनी कशाप्रकारे आपला सहभाग नोंदवला? जनतेने तर संपूर्ण दुनियेला आश्चर्यचकीत करून टाकलं इतकंच नाही तर सायंकाळी 5.00 वाजता पाच मिनिटे देशभरातल्या लोकांनी सेवा देणा-यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अभिवादन केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकाचवेळी अगदी एक मनानं कोरोनाच्या विरोधात आमच्या परिचारिका लढा देत आहेत. आमचे डॉक्टर लढत आहेत. लॅब टेक्निशियन लढत आहेत. निमवैद्यकीय कर्मचारी लढत आहेत. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना धन्यवाद म्हणून देशानं एक अभूतपूर्व दृश्य प्रस्तूत केलं. एक सन्मान व्यक्त करण्याचा तो प्रकार होता. परंतु फारच कमी लोकांना या गोष्टी समजू शकतात. अशा छोट्याशा गोष्टींमुळे आणखी बरंच काही साध्य झालं आहे. आपल्या अंतर्मनात असलेल्या गोष्टीही प्रकट झाल्या. आणि मोहिनी जी तुम्ही तर समाजसेवेच्या कामात गंतलेल्या आहात. त्यामुळे अशा भावना तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे समजू शकता. समाजाच्या मनामध्ये या सर्वांविषयी आदराचे, सन्मानाचे भाव असतातच. डॉक्टर जीवदान देतात. आणि आम्ही त्यांचे ऋण कधीही उतरू शकत नाही. ज्या लोकांनी वुहानमध्ये बचाव कार्य केले आहे, त्यांना मी पत्र लिहिले. माझ्यासाठी तो क्षण खूप भावुक बनवणारा होता. केवळ पत्र लिहायचं म्हणून ते पत्र लिहिलं गेलं नव्हतं. आत्तासुद्ध इटलीमधून लोकांना आणण्यात येत असलेल्या एअरइंडियाच्या कर्मचारी वर्गाचे- विशेष म्हणजे यामध्ये सर्व महिला होत्या. या सर्वांचे एक छायाचित्र मी सामाजिक माध्यमांवर शेअर केलं आहे. कदाचित तुम्ही लोकांनीही ते छायाचित्र पाहिलं असेल. हो, काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माझ्या मनालाही खूप वेदना झाल्या आहेत. या घटनेमुळे अगदी खोलवर दुःख झालं आहे. माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की, जर अशा प्रकारची घटना पुन्हा कुठंही घडल्याचं लक्षात आलं, आमच्या सेवेसाठी तसंच या महामारीतून आपल्याला वाचवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणा-या डॉक्टर, परिचारिका तसंच वैद्यकीय क्षेत्रातले इतर कर्मचारी, सफाई कामगार यांच्याबरोबर वाईट वर्तन केल्याची माहिती कुणाला समजली तर त्या लोकांना तुम्हीच इशारा द्या, त्यांना समजावून सांगा. अशा चुका कुणीही करू नयेत. हे सर्वांनाच समजलं पाहिजे. जे लोक सध्या आपल्यासाठी सेवा देत आहेत, त्यांना शक्य तितकी मदत करण्याची आवश्यकता आहे. काल मी डॉक्टरांच्या पथकाशी बोलत होतो, त्यावेळी अशा काही घटना घडल्याचं मला समजलं. घटनांची संख्या खूप नाही, तरीही माझ्यासाठी ही गोष्ट गंभीर आहे. म्हणून मी ताबडतोब गृह विभागाला आणि राज्यांच्या सर्व पोलिस महासंचालकांना अशा प्रकरणात सक्तीने, कठोरतेन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणाही व्यक्तीने डॉक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी, निमवैद्यकीय सेवेतले कर्मचारी यांच्याशी अयोग्य वर्तन केले तर त्यांना ते खूप महागात पडेल. सरकारही अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करेल. संकटाच्या या काळात देशवासियांना मला एक गोष्ट आवर्जुन सांगावशी वाटते की, या क्षणी सर्व रुग्णालयांमध्ये हे पांढरे कपडे घातलेली मंडळी तुम्हाला दिसत आहेत ना, ते सर्व डॉक्टर्स आणि परिचारिका ईश्वराचे रूप आहेत. आज हीच मंडळी आपल्याला मृत्यूपासून वाचवत आहेत. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून हे लोक आपल्याला जीवदान देण्याचं काम करीत आहेत.

मित्रांनो, आपल्या समाजामध्ये हा संस्कार दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. इथं आपल्या सर्वांच असं काही कर्तव्य, जबाबदारी आहे. जे लोक देशाची सेवा करतात, देशासाठी सर्वस्व अर्पण करतात, त्यांचा सार्वजनिक स्वरुपामध्ये सन्मान प्रत्येक क्षणी केला गेला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे एक परंपरा पाळली जात आहे. एखाद्याच्या सन्मानार्थ टाळ्याही वाजवल्या जात आहेत. कुणाविषयी आभार व्यक्त करण्याची पद्धत आपल्या संस्कारांमध्ये दिवसेंदिवस वाढली पाहिजे. ही चांगली गोष्ट वारंवार घडली पाहिजे. मोहिनी जी तुम्ही तर खूप चांगलं सेवाकार्य करीत आहात.  सध्याच्या परिस्थितीमध्येही तुम्ही नक्कीच काही ना काही करीत असणार. मी आपले एकदा आभार व्यक्त करतो. चला काशीच्या आणखी कोणाशी तरी बोलण्याची संधी मिळत आहे, त्यांच्याशी बोलूया.

प्रश्न - प्रणाम, मी अखिलेश प्रताप बोलतोय. मी कपड्यांचा व्यापारी आहे. आणि मी आपल्या कामाबरोबरच समाजसेवाही करतो. माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की, आजपासून जे ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे, त्यामुळे आमचे अनेक सहकारी लोक घरामध्येच अडकून पडणार आहेत. त्याचबरोबर जे लोक गरीब आहेत, ज्यांचं अगदी हातावरचं पोट आहे, रोजच्या रोज जे लोक परिश्रम, मजुरी करून कमावतात, त्या लोकांसमोर किती मोठी समस्या निर्माण झाली आहे. जर आमच्या बनारसच्या आणि संपूर्ण देशातल्या गरीब, कष्टकरी लोकांच्या या समस्येवर आपण सर्वांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की, आम्ही लोकांनी या गरीब कष्टकरी लोकांसाठी नेमकं काय करावं? देशातला जो युवा आहे, समाजातले जे लोक असहाय आहेत, त्यांना या संकटकाळात कशी मदत करता येईल, याचे मार्गदर्शन तुम्ही करावं, अशी विनंती आहे.

काशीमध्ये आणि या शहराविषयी चर्चा सुरू असताना कपड्यांविषयी बोललं जाणार नाही, असं तर होवूच शकत नाही. असं झालं तर संवादामध्ये काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं होईल. आणि अखिलेश जी मला आनंद होतोय की, तुम्ही व्यापारी आहात, मात्र तुम्ही गरीबांविषयी प्रश्न विचारला आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. कोरोना आजाराला पराजित करण्यासाठी एक रणनीती म्हणून काम केलं जात आहे. यामध्ये असलेल्या विशेषज्ञांनी  दिलेल्या दिशानिर्देशांनुसार असं सांगितलं जात आहे की, प्रत्येक व्यक्तीने दुस-या व्यक्तीपासून कमीत कमी एक ते दीड मीटर दूर अंतरावर राहिलं पाहिजे. ही कोरोनाच्या विरोधातली सैन्यनीती आहे. मी याला सैन्यनीती असं म्हणतो.

मित्रांनो, आम्ही असे लोक आहोत जे प्रत्येक मानवात ईश्वराचा अंश बघतो. हेच आमचे संस्कार आहेत, आमची संस्कृती आहे. कोरोन व्हायरस ना आमची संस्कृती मिटवू शकेल ना आमचे संस्कार. आणि म्हणून संकटकाळी आमच्या संवेदना जागृत होतात. करोनावर मात करण्याचा दुसरा एक शक्तिशाली मार्ग आहे, तो म्हणजे करुणा. करोनाचं उत्तर करूणेत आहे. आपण गरिबांना, गरजूंना करुणा दाखवून सुद्धा करोनाला पराजित करण्यासाठी पावलं उचलू शकतो. आपल्या परंपरेत दुसऱ्याला मदत करण्याचा समृद्ध वारसा आहे. आपल्यात तर असं म्हणतात की, साई, इतकं द्या, की ज्यात कुटुंब सामावेल, मी पण उपाशी राहणार नाही, साधू देखील उपाशी राहणार नाही.

आता नवरात्र सुरु झालं आहे, जर आपण पुढचे 21 दिवस आणि मी काशीतल्या प्रत्येक बंधू भगिनीला हे सांगू इच्छितो, ज्याची जितकी क्षमता आहे, देशात देखील ज्याची जितकी क्षमता आहे, त्यांना हेच सांगेन नवरात्र आता सुरु झालं आहे, तेंव्हा पुढचे 21 दिवस दर रोज 9 गरीब कुटुंबांचा सांभाळ करण्याची शपथ घ्या. 21 दिवस 9 गरीब कुटुंबांचा सांभाळ करा. मला असं वाटतं, इतकं जरी आपण केलं तरी देवीची ह्याहून मोठी आराधना काय असू शकते? हे खरं आणि भक्कम नवरात्र असेल याशिवाय आपल्या आसपास जे मुके प्राणी असतील त्यांचे देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मुक्या प्राण्यांना पोट भरण्याचं संकट भेडसावत आहे आणि माझी जनतेला विनंती आहे की आपल्या आसपासच्या मुक्या जनावरांची देखील काळजी घ्या. अखिलेशजी, जर मी असं म्हणालो, की सर्व काही ठीक आहे, सुरळीत आहे, तर मला असं वाटतं, की मी स्वतःची देखील फसवणूक करतो आहे.

सध्या केंद्र सरकार असो की राज्य सरकारं असोत. जास्तीत जास्त काम करण्याचा, जास्तीती जास्त चांगलं करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. मला राज्य सरकारांवर पूर्ण विश्वास आहे, ते आपल्या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या चिंता समजून घेऊन पूर्ण संवेदनशीलतेने त्यांची काळजी घेतील. पण आपल्याला हे देखील माहित आहे की सर्वसामान्य स्थितीत म्हणजे जेंव्हा काहीच त्रास नाही अशा वेळी कधी वीज जाते, पाणी येत नाही, कधी आपली मदत करणारे कर्मचारी मोठ्या सुट्टीवर जातात, अशा अनेक अडचणी असतात. या कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्या आयुष्यात येत असतात. हा आपणा सर्व भारतीयांचा अनुभव आहे. अशा स्थितीत, आणि मी तर संकटकाळी नाही, तर सर्वसामान्य परिस्थितीत देखील येतात, अशात जेंव्हा देशासमोर इतकं मोठं संकट असेल संपूर्ण जगासमोर इतकं मोठं आव्हान असेल तेंव्हा, अडचणी येणार नाही, सर्व की सुरळीत पार पडेल असं म्हणणं स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. मला असं वाटतं की हा महत्वाचा प्रश्न आहे की व्यवस्था ठीक आहे की नाही. सर्व व्यवस्थित होत आहे की नाही. होत नाही आहे. पण क्षणभर विचार करा. यापेक्षा देखील महत्वाचा प्रश्न आहे की कोरोना सारख्या संकटातून आपण अडचणींवर मात करून जिंकायचं आहे की नाही, जो त्रास आपण सहन करतो आहोत, ज्या अडचणी येत आहेत त्या फक्त 21 दिवसांच्याच आहेत. पण जर कोरोनाचं संकट टळलं नाही तर, याचा फैलाव थांबला नाही, तर मग या संकटामुळे, अडचणींमुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं, याचा विचार सुद्धा करू शकत नाही. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन, सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, राजकीय संघटना जे काम करत आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. जरा विचार करा, दवाखान्यांत लोक 18-18 तास काम करत आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सेवेत असलेल्या लोकांना 2 किंवा 3 तासांपेक्षा जास्त झोप मिळत नाही. समाजातले लोक आहेत जे गरिबांच्या मदतीसाठी दिवस रात्र झटत आहेत. अशा कठीण प्रसंगात आपण या लोकांना सलाम केला पाहिजे. हो, काही ठिकाणी त्रुटी असू शकतात. कुणी निष्काळजीपणा केलेला असू शकतो. पण अशा घटना शोधून शोधून, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी त्याच पसरवणे, त्या क्षेत्राला बदनाम करणे, त्यांना निराश करणे यातून अशा वेळेस काही हाती लागत नाही. मी तर अग्राहाची विनंती करतो की आपण लक्षात घ्या, नैराश्य पसरवण्याची अनेक करणे असू शकतात. माझं असं म्हणणं नाही की सगळेच चूक असतात. हजारो कारणं असू शकतात. पण आयुष्य तर आशा आणि विश्वास यावरच चालतं. नागरिक म्हणून प्रशासनाशी आणि कायद्याशी जितकं जास्त सहकार्य करू, तितकेच जास्त फायदे होतील.

आपण सगळ्यांनीच प्रशासनावर कमीत कमी ताण पडेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. इस्पितळात काम करणारे लोक, पोलीस, आत्ता जे लोक सरकारी कार्यालयांत काम करत आहेत, जे आपले पत्रकार आहेत, हे कुणी बाहेरून आलेले आहेत का, हे आपलेच लोक आहेत. त्यांच्यावर इतकं ओझं आलं आहे, ते आपण थोडं हलकं केलं पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. ते इतक्या गंभीर परिस्थितीत काम करत आहेत. अखिलेशजी, व्यापारी जगात असून देखील गरिबांची चिंता करण्याची आपली हि भावना, आणि देशात अनेक असे अखिलेश आहेत. असे अखिलेश काही कमी नाहीत देशात. चला आपण मिळून गरिबांचं देखील भलं करूया, जबाबदारी घ्या, आणि ही लढाई जिंका, चला आणखी अनेक प्रश्न असतील.

 

प्रश्न-  नमस्कार पंतप्रधान महोदय, मी डॉक्टर गोपाल नाथ, प्रोफेसर मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आयुर्विज्ञान संस्था बनारस हिंदू विद्यापीठातून.

 करोना रोगनिदान प्रयोगशाळेचा प्रभारी म्हणून माझ्याव 16 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्याबरोबरच गंगेच्या पाण्यातून bacteriophages... ज्या समस्येवर मी प्रश्न विचारणार आहे, त्याच्या पर्यायी व्यवस्थेवर संशोधन करत आहे. पंतप्रधान महोदय, सर्वसामान्यपणे आपल्याकडे लोकांना स्वतःचा डॉक्टर होण्याची सवय असते. ते कुठेतरी वाचतात, कुठूनतरी ऐकतात, आणि स्वतःच उपचार करू लागतात. जे अतिशय गांभीर बनते. हे मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून सांगू शकतो की करोनाच्या या गंभीर आजारात हे अतिशय गंभीर होतं, कारण आपल्याला माहित आहे की अजून ना कुठली लस बनवू शकलो आहोत, ना कुठलं विशिष्ट औषध तयार करू शकलो आहोत. तरी देखील समाजात विविध गैरसमज पसरले आहेत. आपण समाजात या विषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत  का ?

प्रोफेसर साहेब, आपण स्वतःच या क्षेत्रातले तज्ञ आहात. आणि म्हणूनच काय खरं काय खोटं हे नेमकं ओळखू शकता. या विषयाचं आपलं ज्ञान आमच्यापेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आपल्याकडे सर्दी, पडसं, तापाची औषधं डॉक्टरांना न विचारताच घेण्याची सवय आहे. जर आपण रेल्वेच्या डब्यात प्रवास करत असू, आणि एक बाळ रडू लागेल आणि खूप वेळ शांतच होत नसेल, तर सर्व डब्यातले लोक येऊन सल्ला देतात हे घ्या, ते द्या, हे खाऊ घाला, ते प्यायला द्या. हे आपण रेल्वे डब्यांत बघितलं असेल. मला वाटतं आपण या सवयींपासून दूर  राहिलं पाहिजे. कोरोनाच्या संसर्गाचा इलाज आपला आपण बिलकुल करता कामा नये. घरात राहायचं आणि जे काही करायचं ते फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं. आपल्या डॉक्टरांशी फोनवर बोला, त्यांना विचारा, आपल्याला होत असलेला त्रास सांगा कारण जवळपास सर्व कुटुंबांचा एक न एक परिचित डॉक्टर असतोच. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, अजून जगात कोरोनावर औषध नाही. कुठलीही लस नाही. यावर आपल्या देशातले आणि दुसऱ्या देशांतले वैज्ञानिक वेगाने संशोधन करत आहेत. काम सुरु आहे. म्हणून मी म्हणेन, देशवासियांनो, जर कुणीही कुठलेही औषध सुचवले तर कृपया, प्रथम आपल्या डॉक्टरशी बोला. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कुठलेही औषध घ्या. आपण बातम्यांमध्ये देखील बघितलं असेल, की जगातल्या काही देशांत आपल्या मनाप्रमाणे औषध घेण्याने अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. आपल्या सगळ्यांना प्रत्येक अफवा आणि अंधविश्वास यापासून दूर राहायचं आहे. डॉक्टर गोपाल जी, मी आपला आभारी आहे, कारण आपण विज्ञानाशी संलग्न आहात आणि गंगेची देखील काळजी करता. आणि समाजात जे सुरु आहे, त्याची देखील चिंता करता. जी तुमची चिंता, पण मला विश्वास आहे की आपल्याला जनतेला समजावून सांगावं लागेल. चला गोपालजींचे आभार मानूयात, आणि पुढचा प्रश्न घेऊ.

 प्रश्न - नमस्कार पंतप्रधान महोदय माझं नाव अंकिता खत्री आहे आणि मी एक गृहिणी आहे. त्यच बरोबर मी विविध रचनात्मक कामांत सक्रीय असते. या वेळी मी आपल्या प्रेरणेने समाज माध्यमांवर ‘कुछ क्रिएटिव करो ना ‘ या हैशटैग ने एक मोहीम सुरु केली आहे. ज्यात काशीच्या विविध कलाकारांना आवाहन करते आहे,

अच्छा आपण देखील माझ्याप्रमाणे पोस्टर दाखवलं.

सर्व आपल्या प्रेरणेतून होत आहे पंतप्रधान महोदय आणि आपल्यापासून प्रेरणा घेऊनच मी ही मोहीम सुरु केली आहे. कारण नेहमी सर्जनशीलताच कामी येते. आपण स्वतः इतके सर्जनशील, सकारात्मक आहात, अशा नकारात्मक परिस्थितीत देखील, मी कुठेतरी ऐकलं होतं. की जो रचता है, वही बचता है. आपल्यापासून प्रेरणा घेऊन मी ही मोहीम सुरु केली आहे. ह्यात काशीच्या विविध  रचनाकारांना, लेखकांना, कविना, चित्रकारांना आमंत्रित करत आहे. आणि 21 दिवसांचा हा जो काल आहे, त्यात त्यांच्या रचनांचं संकलन करून प्रकाशन करावं आणि काशी तर्फे आपल्याला समर्पित करावं हा प्रयत्न आहे. पण एक गृहिणी म्हणून माझा एक प्रश्न आहे आणि एक चिंता आहे, जी मला आपल्याला सांगायची आहे. लॉकडाउनच्या या काळात सर्व मुले घरी आहेत आणि मुलांना संभाळणं आम्हाला दुरापास्त होत आहे. हे एक आव्हानच आहे. यात अशी ही मुलं आहेत ज्यांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. माझा स्वतःचा मुलगा बारावीची बोर्ड परीक्षा देतो आहे, त्याचा एक पेपर स्थगित झाला आहे. त्यामुळे घरच्यांना थोडी काळजी वाटते आहे. तर काय करायला हवं.

अंकिताजी, पहिली गोष्ट ही, की तुम्ही सृजनात्मक काम उत्तम रीतीने करत आहात. आणि त्यामुळे आयुष्यात उर्जा राहते. पण आपण म्हणालात की सर्व रचनाकारांना एकत्र करत आहात. माझी विनंती आहे, की कुणालाच एकत्र करू नका. social distancing ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हो हो तुम्ही सर्वांना ऑनलाइन मागा, त्यांच्या कलेचं संकलन करा. चांगली कल्पना आहे. जे हे सर्जनशील लोक आहेत, त्यांची कला नक्कीच देशाच्या कमी येईल. आणि हे खरं आहे की हे संकट मोठं आहे, पण संकटातही संधी शोधणे हीच मानवाची खासियत आहे. आजकाल लॉकडाउनमुळे आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल. अनेक लोक आपल्या मुलांसोबत कसा जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत, हे ट्वीटरवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तपशीलवार सांगत आहे. हे खरं की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती तेंव्हा मुलांना सांभाळण्याचं काम आजी आजोबा करत असत. आज कुटुंब लहान झाली तर अडचणी येणं साहजिक आहे. पण आपण बघितलं असेल, टीव्हीवर, इलेक्ट्रोनिक मिडियामध्ये, रेडिओवर अनेक नवनवे कार्यक्रम बनत आहेत. आपल्या देशात मिडियामध्ये देखील सर्जनशीलता आहे. त्यांनी लोकांना व्यस्त ठेवण्यासाठी घरात आहेत तर काय केलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने इतका मोठा काळ जे केलं आणि या लॉकडाउनमध्ये ते नवनवीन गोष्टी शिकवत आहेत.

या सर्वात मला आणखी काही गोष्टींनी प्रभावित केलं आहे. मी बघतो आहे की संपूर्ण मानव जात कशी या जागतिक संकटाचा सामना करायला एकत्र आली आहे. आणि यातही सर्वात महत्वाची भूमिका आहे आमच्या बाल सेनेची, आपली बच्चा पार्टी. मी असे व्हिडीओ बघितले आहेत ज्यात चार पाच वर्षांची मुलं आई-वडलांना हात कसे धुवावे, बाहेर जाऊ नये, काय करावे, काय करू नये हे समजावून सांगत आहेत. लहान लहान मुलं आणि मुली या संकटावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. मी समाज माध्यमांवर अशा व्हिडिओमध्ये बराच व्यस्त असतो. कधी कधी मला चांगलं वाटतं की मी सर्वसामान्य लोकांशी जोडला जातो. तर, ह्या दिवसांत मी बघितलं अनेक कुटुंबांनी आपल्या मुलांच्या अनेक गोष्टी समाज माध्यमांवर ठेवल्या आहेत आणि घरात मुलांचे व्हिडीओ बनवून, आणि आता मोबाईल फोनवर बनतात व्हिडीओ. मी जो व्हिडीओ बघितला, जर तो अजून असेल तर मी ते एकत्र करून जरूर शेयर करीन. आज संधी मिळाली तर आजच करीन. आपण सर्वांनी ते जरूर बघा की मुलांनी काय कमाल केली आहे. तुम्हाला आठवत असेल जेंव्हा मी स्वच्छते विषयी बोललो होतो, स्वच्छ भारत अभियान सुरु केलं होतं, तेंव्हा तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक घरात मुलांनी या अभियानात पुढाकार घेतला होता. आजकालच्या मुलांची, युवकांची ही ताकद मला खूप प्रभावित करते. त्याचं कौशल्य, त्यांची विचार करण्याची पद्धत बघून मला खूप आनंद होतो. आणि काही माता पित्यांना ही चिंता सतावते की इतके दिवस घरात बसून मुलं त्यांनाच शिकवायला लागतील की काय. पण मला पूर्ण खात्री आहे या 21 दिवसांत मुलं आपल्या आई वडलांना काही न काही शिकवतीलच नव्हे, खूप काही शिकवतील.

मित्रांनो, नमो ऐपवर मी आपल्या सूचना आणि प्रतिसाद वाचत असतो. श्री ओम प्रकाश ठाकूरजी, मुकेश दासजी, प्रभांषुजी, अमित पांडेजी, कविताजी, देशाच्या वेग वेगळ्या भागांतून वेग वेगळ्या लोकांनी आपापल्या परीने लॉकडाउन अधिक कठोरतेने आणि दीर्घकाळ लागू केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत. केवळ आपणच नाही तर आपल्याप्रमाणे हजारो बुद्धीजीवी लोकांनी फेसबुक, ट्वीटर इंस्टाग्राम आणि यू ट्यूबवर या जागतिक साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी हाच सल्ला दिला आहे. आवाहन केलं आहे. जेंव्हा आपले देशवासीयांनीच स्वतःहून हा संकल्प केला आणि त्यांच्यात हे शहाणपण असेल, हे आव्हान पेलण्यासाठी दृढ इच्छाशक्ती असेल तर मला पूर्ण विश्वास आहे की देश या साठीच्या आजाराला नक्कीच हरवेल. 

शेवटी मी आपल्याला पुन्हा सांगतो, की तुम्ही सर्व, माझे काशीवासी, मी थोडा येऊ नाही शकलो तुमच्यात, मला माफ करा. पण तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवा, देशाला सुरक्षित ठेवा, एक मोठी लढाई आहे ज्यात बनारसच्या लोकांना आपलं पूर्ण सहकार्य द्यावं लागेल. पूर्ण देशाला मार्ग दाखवावा लागेल. सर्व काशीवासीयांना मी आज पुन्हा एकदा दिल्लीतून प्रणाम करतो. मला खात्री आहे तुम्ही नेहमी काशीची काळजी घेतली आहे, पुढे देखील घ्याल असा मला पूर्ण विश्वास आहे. आपले सर्वांचे अनेक अनेक धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Bedekar/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1608616) Visitor Counter : 569


Read this release in: English