आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड-19 ची सद्यस्थिती आणि व्यवस्थापनासाठीच्या कार्यवाहीचा आढावा
Posted On:
26 MAR 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव तसंच इतर संबधित अधिकाऱ्यांशी कोविड-19 ची सद्यस्थिती आणि व्यवस्थापन विषयक कार्यवाहीचा आढावा घेतला.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्रा सह देशातील सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव सहभागी झाले होते. त्याशिवाय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर डॉ हर्षवर्धन यांनी या बैठकीत उपस्थित राहू न शकलेल्या केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांच्याशीही वेगळा संवाद साधला.
या आजारावर मात करण्यासाठी सामाजिक अंतर हा एकमेव उपाय असल्याचे डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले.संक्रमणाची साखळी तोडण्याबद्दल सर्व राज्यांनी अधिक दक्ष राहावे आणि ही साखळी तोडण्यासाठी नवनव्या उपाययोजना शोधाव्यात, अशी सूचना हर्षवर्धन यांनी केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात यासाठी समर्पित रुग्णालयांच्या उभारणीवर भर द्यावा. सर्व कोरोना बाधित रुग्णांवर प्रोटोकॉलप्रमाणेच उपचार केले जावेत, यावरही आरोग्यमंत्र्यांनी भर दिला. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बाबतीत गेल्या एक महिन्यापासून भारताने खास लक्ष ठेवलं असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुढेही याबाबतीत दक्ष राहावे असे ते म्हणाले. त्याशिवाय, घरी विलगीकरण केलेल्या सर्व प्रवाशांच्या स्थितीवर लक्ष ठेवावे आणि एखाद्या व्यक्तीने त्याचे उल्लंघन केल्यास, त्यावर कारवाई करावी, असेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटावर मात करण्याच्या कामात सेवानिवृत्त डॉक्टरांची मदत घेता येईल का याचीही चाचपणी करावी अशी सूचना हर्षवर्धन यांनी केली. त्याशिवाय, रुग्णवाहिका वाहक, कॉल सेंटरचे कर्मचारी आणि इएमआर टीम या सर्वांना प्रशिक्षण द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असेही डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले. डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांची कुठेही कमतरता पडू नये यासाठी त्यांच्या वाहतुकीची योग्य ती सोय करावी, असेही ते म्हणाले. कोविड-19 च्या रूग्णांसाठी एम्सच्या विशेष पोर्टलवरून सर्वांनी समन्वय ठेवावा, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
कोविड-19शी लढा देणाऱ्या डॉक्टरांना घरमालकांनी घर सोडण्यास सांगितल्याच्या वृत्तावर बोलताना डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोणालाही घर सोडण्याविषयी सांगितल जाऊ नये याची काळजी राज्य सरकारांनी घ्यायची आहे.
सरकारने डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा काढला आहे, असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
लॉकडाऊन च्या काळात, सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, म्हणून सरकार गृहमंत्रालयासोबत समन्वय साधत सर्वतोपरी काळजी घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
R.Tidke/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1608532)
Visitor Counter : 203