पंतप्रधान कार्यालय

कोरोना विषाणू प्रसार धोका लक्षात घेवून पंतप्रधानांनी वाराणसीच्या जनतेशी साधला संवाद


संयम राखून प्रश्नाचे गांभीर्य ओळखून संवेदनशीलता दाखवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

कोरोनाविषयी मदत आणि माहिती मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी मदत क्रमांक केला जाहीर

Posted On: 25 MAR 2020 8:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 मार्च 2020

 

कोरोना विषाणू प्रसार धोका लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या गृह लोकसभा मतदारसंघातल्या म्हणजेच वाराणसीच्या जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.  वाराणसीचा खासदार म्हणून आपण आत्ता आपल्या मतदारसंघामध्ये असणं आवश्यक आहे. मात्र संपूर्ण देशात आणि दिल्लीमधील परिस्थिती लक्षात घेता हे शक्य नाही, म्हणून आपण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. सध्या आपण अनेक कामांमध्ये अतिव्यग्र असलो तरी वाराणसीच्या सहकारी मंडळींकडून तिथं काय सुरू आहे, याची माहिती सतत घेत असतो, असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू प्रसार झाल्यानंतर मोदी यांनी आपल्या मतदारसंघातल्या लोकांबरोबर आज पहिल्यांदाच संवाद साधला.

 

वाराणसीच्या लोकांनी शैलपुत्री देवीची पारंपरिक पूजा-अर्चना केल्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी शैलपुत्री देवी सर्व देशवासियांना शक्ती देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणालेसद्यस्थितीत लोक ज्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात, असं सांगून पंतप्रधान मोदी यांनी लोकांनी नेमके तथ्य जाणून घ्यावे, कोणत्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. कोरोनाचा विषाणू काही श्रीमंत-गरीब किंवा इतर कोणताही भेदाभेद करीत नाही. किंवा कुणालाही सवलत देत नाही. काबूलमधल्या गुरूव्दारामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

व्हॉटस् अॅपच्या सहकार्याने सरकारने कोरोनाविषयी मदत आणि माहिती देण्यासाठी एक ‘हेल्प डेस्क’ सुरू केला आहे. या दूरध्वनी क्रमांकावर सर्वांना अधिकृत आणि सत्य माहिती मिळू शकणार आहे. या सुविधेमुळे 9013151515 या व्हॉटस् अॅप क्रमांकावर हिंदी अथवा इंग्लिशमध्ये ‘नमस्ते’ असा एक संदेश पाठवून आपल्याला  माहिती घेता येणार आहे. पंतप्रधान यावेळी म्हणाले, महाभारतामध्ये 18 दिवस कुरूक्षेत्रावर युद्ध सुरू होते. आता कोरोनाविरुद्ध आपल्याला 21 दिवसांची लढाई करायची आहे आणि भारताला कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे.

सर्व नागरिकांनी डॉक्टर्स आणि परिचारिका यांना सन्मानाची वागणून द्यावी, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सर्व नागरिकांना केलं. जर एखाद्या ठिकाणी आरोग्य सेवेतल्या कर्मचारी वर्गाला अयोग्य वागणूक दिली जात असेल, तर अतिशय चुकीचे आहे. आणि अशा लोकांना त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागेल. आरोग्य खात्यातल्या लोकांना अयोग्य वागणूक देणा-या लोकांवर आणि त्यांना पाठिंबा न देणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना गृह मंत्रालय आणि सर्व पोलिस महासंचालक यांना देण्यात आल्याचेही मोदी यांनी यावेळी सांगितले. सध्याच्या अतिशय कठीण कालखंडामध्ये सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर वैद्यकीय व्यावसायिक आपल्या सर्वांना अथक सेवा देत आहेत. याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातला सर्वसामान्य नागरिक सरकारने योग्यवेळी योग्य पावले उचलली याविषयी आश्वस्त आहे. दि.22 मार्च रोजी आवाहन केल्याप्रमाणे सर्वांनी जनता कर्फ्यू यशस्वी केला. आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता, आवश्यक सेवा पुरवणा-यांविषयी कृतज्ञताही सर्वांनी व्यक्त केली. आरोग्य सेवेत कार्य करणारे पांढ-या पोशाखातले हे सर्वजण देवाचीच रूपे आहेत, हे लोकच तर आपला रोगापासून बचाव करीत आहेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.  आपले प्राण पणाला लावून आरोग्य सेवा क्षेत्रातले लोक रूग्णांची सेवा करीत आहेत, त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मतदारसंघातल्या काही लोकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरे दिली.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1608239) Visitor Counter : 166


Read this release in: English