दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळात लोकांना अखंडित सेवा देण्यासाठी इंडिया पोस्ट मुंबई प्रयत्नशील

Posted On: 25 MAR 2020 7:22PM by PIB Mumbai

 

 

ऑनलाईन आर्थिक सेवा सक्रिय, रोख निवृत्ती वेतन ज्येष्ठ नागरिकांना घरपोच  या  आपत्कालीन सेवा अविरत सुरू

सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होत आहे आणि देशात याचा सर्वात जास्त फटका मुंबई शहराला बसला आहे. कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि नवीन प्रकरणे कमी करण्यासाठी जगभरातील सरकारी संस्था प्रयत्न करीत आहेत.

आजपासून 14 एप्रिल 2020 पर्यंत 21 दिवस पूर्ण लॉकडाउन असतानाही अन्य सरकारी संस्थांसह मुंबई टपाल कार्यालय ऑनलाईन वित्तीय सेवा सक्रिय ठेवत जनतेला अखंडित सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  पीएलआय प्रीमियम पेमेंट, रिकरिंग डिपॉझिट, सुकन्या समृध्दी खाते आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक खात्यात पैसे जमा करणे यासारख्या सेवांसाठी सध्या मुंबई टपाल कार्यलयाच्या वतीने ऑनलाईन पेमेंट सुविधा दिली जात आहे.

या संकटाच्या काळात वयोवृद्ध नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता टपाल कार्यालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतनाची रोख रक्कम विनाविलंब घरपोच देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  यामुळेे  वृद्धांना घरातून बाहेर पडायची गरज भासणार नाही आणि ते स्वतःला पूर्णपणे विलग ठेवू शकतील.

मुंबई टपाल कार्यालयाच्या वतीने, मुंबई जीपीओसह सर्व मुख्य पोस्ट कार्यालये अखंडित सेवा देण्यासाठी शहरभर सुरू ठेवण्यात आली आहेत. बॉम्बे सेंट्रल, माहीम, काळबादेवी, दादर, चेंबूर, अंधेरी आणि बोरिवली ही मुख्य कार्यालयांपैकी काही आहेत. ताज्या माहितीनुसार, दादर मुख्य कार्यालयाने 24 मार्च रोजी 3 नवीन व्यवहार केले आहेत. त्याात 2 बचत  खाते आणि 1 एसएसए    अकाउंट सुरू करण्यात आले आहेत.

स्वाती पांडेपोस्टमास्टर जनरल, मुंबई विभागयांनी सर्व टपाल एटीएम यंत्रणा सक्षम ठेवण्याची सूचना केली आहे. कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड असलेले लोक पोस्टाच्या एटीएमचा आवश्यकतेनुसार वापर करू शकतील (काही तांत्रिक अडचणीमुळे केवळ अंधेरी एचओ मधील एटीएम सुरू ठेवता आलेले नाही) मुंबई टपाल कार्यालय सर्वांची सुरक्षा आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते.

 

(Source : India Post Mumbai)

 

G.Chippalkatti/S.Tupe/P.Kor(Release ID: 1608154) Visitor Counter : 67


Read this release in: English