पंतप्रधान कार्यालय

संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाउन - पंतप्रधानांचे आवाहन


कोविड - 19 संदर्भात पंतप्रधानांचे देशाला संबोधन

Posted On: 24 MAR 2020 11:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

 

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या एका विशेष भाषणात पंतप्रधान म्हणाले की, उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा असणाऱ्या राष्ट्रांमध्येही विषाणूचा संसर्ग रोखता आला नाही आणि त्यामुळे हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखणे हाच पर्याय आहे.

"आपण हेही पाहत आहात की, या जगातल्या सर्वात सामर्थ्‍यवान असलेल्या, महाशक्तिशाली देशांनाही या महामारीनं नाकीनऊ आणलं आहे. हे देश या आजाराच्या संकटाला परतवून लावण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत, असं नाही. किंवा या देशांकडे साधनसामुग्रीची कमतरता आहे, असंही नाही. परंतु कोरोना विषाणूचा इतका वेगानं प्रसार होत आहे की, सर्वांनी  पुरेशी तयारी केलेली असतानाही  आणि अनेक प्रयत्न केले जात असतानाही कोरोना आजाराच्या संकटाचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या सर्व देशांमध्ये दोन महिन्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर जो निष्कर्ष निघतोय, आणि या क्षेत्रातले तज्ञही असंच म्हणत आहेत की, या वैश्विक महामारी कोरोनाला तोंड देण्यासाठी म्हणजेच या आजाराविरूद्ध एकमेव प्रभावी पर्याय, तोडगा आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखणे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे" असे पंतप्रधान म्हणाले.

काही लोकांची बेपर्वा वृत्ती, काही लोकांमध्ये असलेली गैरसमजूत- तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या माता-पित्यांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रांना, स्नेहींना, आणि पुढे जावून संपूर्ण देशाला खूप मोठ्या संकटाच्या खाईत लोटू शकेल. जर अशा प्रकारे कुणी बेपर्वाईने वागणं सुरू ठेवलं तर भारताला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागांत राज्य सरकारांनी केलेले लॉकडाउन अत्यंत  गांभीर्याने घेतले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी लोकांना केले.

संपूर्ण देशामध्ये आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करण्यात येईल.  आज रात्री बारा वाजल्यापासून घरातून बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.

आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या आणि इतर देशांच्या अनुभवावरून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी 21 दिवस आवश्यक आहेत असेही पंतप्रधान म्हणाले.

ते म्हणाले की, जनता-कर्फ्यूपेक्षा हे काही प्रमाणात जास्त आणि कठोरही असेल मात्र देश आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

या महामारीच्या पुढील परिणामांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “या लॉकडाउनची आर्थिक किंमत देशाला नक्कीच  चुकवावी लागणार आहे.  तरीही प्रत्येक भारतीयाचा जीव वाचवणे ही आताच्या वेळी आमची प्राथमिकता आहे. म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही देशात कोठेही असा, जेथे असाल तेथे थांबून रहा.”

जर येत्या 3 आठवड्यात परिस्थिती आटोक्यात आली नाही तर देश 21 वर्ष मागे जाईल आणि कित्येक कुटूंबं/परिवार कायमचे देशोधडीला लागतील, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.  म्हणूनच “लोकहो, येत्या एकवीस दिवसात एकच गोष्ट करा, ती म्हणजे घरातच रहा”, अशी विनंती त्यांनी केली. पंतप्रधान म्हणाले की ज्या देशांनी करोनाशी दोन हात केले त्यांचे अनुभव आपल्याला काही प्रमाणात आशेच्या किरणांसारखे आहेत.ते म्हणाले की, ज्या देशांमध्ये संपूर्ण लॉकडाउन पाळण्यात आलं आणि जिथे नागरीकांनी नियमांचे पालन केले तेच देश या महामारीला आटोक्यात आणू शकले आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले की “भारत अश्या स्टेजला आहे जिथे आपल्या आताच्या वागणूकीवर ह्या  संकटाचा प्रभाव कमी करण्यात  आपण किती सफल झालो हे ठरणार आहे. सतत आपला दृढनिश्चय कायम ठाम राखण्याची हीच वेळ आहे”  प्रत्येक पाउल सावधपणे टाकण्याची हीच वेळ आहे. `जान है तो जहाँ है`, हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल. आपला संयम आणि शिस्त याच्या कसोटीचा हा काळ आहे. लॉकडाऊन परिस्थिती  सुरु  असेपर्यंत आपण आपला निश्चय आणि संयम ठाम ठेवणार  आहोत”.  पंतप्रधानांनी सांगितले की नागरिकांना त्यांच्या दैंनंदिन जीवनात कोणतीही गैरसोय सोसावी लागू नये म्हणून केन्द्र आणि राज्य सरकारे तातडीने ही व्यवस्था करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होत रहावा याची व्यवस्था असल्याचे ते म्हणाले.  केन्द्र आणि राज्य सरकारे तसंच नागरी समाज आणि संस्था या संकटाच्या परिस्थितीची गरिबांना कमीत कमी झळ बसावी यासाठी झटत आहेत. वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि करोनाबाधितांवरिल उपचारांसाठी केन्द्र सरकारतर्फे पंधरा हजार कोटी रूपये दिल्याचे मोदी यांनी जाहीर केले. या काळात समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अंधश्रद्धा पसरवू नका, त्यापासून लांब रहा असे कळकळीचे आवाहन मोदी यांनी लोकांना केले.  आपल्याला या आजाराची लक्षणे दिसत असल्यास कोणतीही औषधे वैद्यकीय सल्लयाशिवाय घेऊ नयेत, अशी विनंती त्यांनी केली.  सरकार आणि स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना पाळायला प्रत्येक नागरिक तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संकटाच्या या वेळी एकत्र येउन आपली जबाबदारी  आणि संवेदनशीलता यांचे दर्शन जनता कर्फ्यूच्या वेळी घडवल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीय नागरीकाची प्रशंसा केली. ते म्हणाले देश संकटातून जात असताना, माणूस संकटात असताना प्रत्येक भारतीय कश्या पद्धतीने एकत्र येऊन एकत्रितपणे सामना करतो ते भारतीयांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी सिद्ध केले. पंतप्रधानांनी समारोप करताना म्हटले की जरी 21 दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा कालावधी असला तरी तुम्ही तसेच तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा आवश्यकच आहे. प्रत्येक भारतीय या संकटाशी यशस्वीपणे झुंज देईल एवढेच नव्हे तर विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

G.Chippalkatti/S.Tupe/V.Sahajrao/P.Kor



(Release ID: 1608112) Visitor Counter : 298


Read this release in: English