पंतप्रधान कार्यालय

कोविड-19च्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यासाठी, पंतप्रधान विविध क्षेत्रातील संबंधितांशी विचारविनिमय सुरूच ठेवणार


स्थितीची ताजी माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न

कोरोना विषाणू विरोधातील संघर्षामध्ये भारत अग्रस्थानी

Posted On: 23 MAR 2020 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2020

 

कोवि-19च्या विरोधात भारताकडून सुरू असलेल्या संघर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध क्षेत्रातील सर्व संबंधितांशी चर्चा सुरूच ठेवतील.

या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे समूह आणि इंडिया आयएनसीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली.

नियमित संवाद आणि बैठका

जानेवारी महिन्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातल्या लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी कोवि-19च्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी बैठका घेतल्या आणि माहिती घेतली.

पंतप्रधान या संदर्भात दररोज बैठका घेत आहेत आणि मंत्रिमंडळ सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव यांच्याकडून त्यांना सातत्याने ताजी माहिती दिली जात आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिगटाकडून देखील त्यांना स्थितीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची ताजी माहिती दिली जात आहे.

आपल्या उदाहरणाद्वारे आदर्श

लोकांना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखण्या बाबत प्रवृत्त करण्यासाठी आपण होळीच्या उत्सवामध्ये सहभागी होणार नसल्याची पंतप्रधानांनी घोषणा केली होती.

देशवासियांना संबोधन- जनता कर्फ्यूचे आवाहन

कोवि-19 चा सामना करण्यासाठी देशाने सज्ज राहावे यासाठी 19 मार्च 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात 22 मार्च 2020 रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत स्वेच्छेने संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला संकल्प आणि संयम या दोन सूत्रांचा अंगिकार करण्याचा मंत्र दिला.

आपल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी गैरसमजातून निर्माण झालेल्या भीतीपोटी घाईगडबडीने खरेदी आणि साठेबाजी टाळण्याची विनंती केली आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची हमी दिली.

कोवि-19 आर्थिक प्रतिसाद कृती दल

या जागतिक साथीमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्र्याच्या नेतृत्वाखाली कोवि-19 आर्थिक प्रतिसाद कृती दल स्थापन करण्याची घोषणा केली. हे कृतीदल सर्व संबंधितांशी चर्चा करेल, त्यांच्याकडून माहिती घेईल आणि त्यांच्या आधारे या आव्हानांना तोंड देण्यासाठी निर्णय घेण्यात येतील. तसेच या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करेल.

व्यापारी समुदाय आणि उच्च उत्पन्न गटांनी विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या अल्प उत्पन्न गटांच्या आर्थिक गरजा विचारात घ्याव्यात, कामावर येण्यासाठी त्यांची असमर्थता लक्षात घेऊन ते ज्या दिवशी अनुपस्थित राहतील, त्या दिवसांचे त्यांचे वेतन कापू नये, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. या काळात मानवतेचे महत्त्व लक्षात घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 



(Release ID: 1607934) Visitor Counter : 102


Read this release in: English