पंतप्रधान कार्यालय

इकॉनॉमिक टाईम्स ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 06 MAR 2020 11:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2020

 

ग्लोबल बिझनेस समिटच्या या मंचावर जगभरातून आलेल्या तज्ञ मंडळींसमोर मला माझे मत मांडण्याची संधी इकॉनॉमिक टाईम्सने दिली आहे. आज सकाळपासून, तुम्ही जेव्हापासून इथे बसलेले आहात , तेव्हापासून इथे अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. उद्योग जगतातल्या  मान्यवर लोकांनी आपल्या कल्पना मांडल्या आहेत आणि विचारांच्या या प्रवाहात जो समान धागा आहे, तो आहे- शाश्वत विकासासाठी सहकार्य. आणि ही संकल्पना आजची गरज देखील आहे. भविष्याचा आधार देखील आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे कि ही संकल्पना अचानक गेल्या काही वर्षातील विचारांतून आलेली आहे , असेही नाही. विघटनामुळे काय-काय नुकसान होते, याचा जगाला अनुभव आहे. जेव्हा एकत्र चाललो, तेव्हा सावरलो. जेव्हा परस्परांविरोधात उभे ठाकलो तेव्हा विखुरलो. निर्मितीसाठी सहकार्याचा विचार जेवढा जुना आहे तेवढाच प्रासंगिक देखील आहे. प्रत्येक युगात आपली  निर्मितीसाठी सहकार्याची भावना तपासून पाहण्यासाठी आणि ती आणखी मजबूत करण्यासाठी नवनवीन आव्हाने समोर येतात.

जसा आज कोरोना विषाणूच्या रूपात एक खूप मोठे आव्हान जगासमोर आहे. आर्थिक जगासाठी देखील एक खूप मोठे आव्हान असल्याचे वित्त संस्थांनी म्हटले आहे. आज आपण सर्वांनी मिळून या आव्हानाचा सामना करायचा आहे. निर्मितीसाठी सहकार्याच्या संकल्प शक्तीद्वारेच आपल्याला विजयी व्हायचे आहे.

मित्रांनो ,

मंदावलेल्या जगाच्या तत्वज्ञानावर देखील आज तुम्ही इथे मंथन करणार आहात. वास्तविक दृष्ट्या मोडकळीला आलेलीकल्पनेच्या पलिकडे मोडकळीला आलेली आणि याला जबाबदार असलेल्या घटकांवरही चर्चा होणार आहे.

मित्रानो, एक काळ असा होता, जेव्हा एका विशिष्ट वर्गाच्या अंदाजानुसारच सर्व गोष्टी चालायच्या. त्यांनी व्यक्त केलेलं मत अंतिम समजले जायचे. मात्र तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि लोकशाहीकरणामुळे आता आज समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांचे मत महत्वाचे ठरत आहे. आज सामान्य जनता आपले मत अतिशय ठामपणेआधीच्या रूढ समजाव्यतिरिक्त अतिशय ताकदीने आपले म्हणणे मांडत आहे. यापूर्वी या सामान्य जनतेच्या आशा-अपेक्षावर , या विशिष्ट वर्गाचे तर्क आणि विचार वरचढ ठरायचे. हे एक खूप मोठे कारण होते कि जेव्हा आम्ही .. तुम्ही लोकांनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली ...2014 मध्ये प्रथमच हे कार्य स्वीकारले तेव्हा देशातील लोकसंख्येचा खूप मोठा हिस्सा शौचालये, वीज,गॅस जोडणी, स्वतःचे घर यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित होता.

मित्रांनो, आमच्या समोर मार्ग होतातो म्हणजे पूर्वीपासून जे चालत आले आहे त्या मार्गाने चालणे किंवा स्वतःचा नवीन मार्ग बनविणे, नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जाणे. आम्ही अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला… आम्ही एक नवीन मार्ग बनवला, नव्या दृष्टीकोनासह आणि त्यात  लोकांच्या आकांक्षांना सर्वाधिक प्राधान्य दिले.

या काळात देशात निवडणुका देखील झाल्या. आमच्या कार्यावर शिक्कामोर्तब झाले, परंतु आणखी एक रंजक गोष्ट समोर आली, आज ग्लोबल बिझिनेस समिटमध्ये मलाही ते तुमच्याबरोबर सामायिक करायचे आहे. या सभागृहात बसलेले माझे सहकारी नक्कीच माझ्या या म्हणण्याकडे लक्ष देतील.

मित्रांनो ,

ज्या वर्गाबाबत मी तुमच्याशी बोलत होतो त्यांची खूप मोठी ओळख आहे - 'टॉकिंग द राइट थिंग्ज'. म्हणजे नेहमी योग्य गोष्ट सांगणे . योग्य गोष्ट सांगण्यात काहीही वाईट नाही. परंतु 'योग्य गोष्टी करण्याचा मार्ग चोखाळणाऱ्यांचा ते तिरस्कार करतात , त्यांची चीड आहे. म्हणूनच जेव्हा स्थितीत बदल होतो तेव्हा अशा लोकांना काही खास प्रकारचे अडथळे दिसायला लागतात. तुम्ही लक्षात घ्या  की जे लोक स्वत: ला लिंग समानतेचा मसीहा म्हणवतात ते तिहेरी तलाक विरोधात कायदा करण्याच्या आमच्या निर्णयाला विरोध करतात. जे लोक जगाला निर्वासितांच्या हक्कांसाठी ज्ञान देतात, ते सीएए कायदा होत असताना विरोध करतात. जे लोक रात्रंदिवस राज्य घटनेचा दाखला देतातते जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370  सारखी तात्पुरती व्यवस्था हटवून संविधानाच्या पूर्ण अंमलबजावणीला विरोध करतात. जे न्यायाविषयी बोलतात, ते त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करतात.

मित्रांनो, तुमच्यापैकी काहींनी रामचरित मानसची ही चौपाई नक्कीच ऐकली असेल.

पर उपदेश कुशल बहुतेरे । जे आचरहिं ते नर न घनेरे ।

म्हणजे, दुसऱ्यांना उपदेश करणे खूप सोपे आहे, मात्र स्वतः त्या उपदेशांचे पालन करणे खूप कठीण आहे. जेव्हा जैसे थे स्थिती असते, तेव्हा त्यांना काही अडचण नसते. अशा लोकांना वाटते कि  ‘निष्क्रियता ही सर्वात सोयीस्कर कृती आहे. " ' मात्र आमच्यासाठी राष्ट्र निर्माण, देशाचा विकास, सुशासन हे सोयीचे विषय नाहीत, तर आमची श्रद्धा आहे. योग्य काम करण्याची श्रद्धा, जैसे थे स्थिती मोडण्याची श्रद्धा.

सहकाऱ्यांनो , काही लोक असे असतात जे स्वभावाने स्वतःच्या विचारांचे कैदी बनतात. आपल्या विचार-प्रक्रियेचे ते आयुष्यभर ओझे वाहत असतात. हे लोक यातच खूष असतात, आनंदी राहतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर जैसे थे स्थितीत राहण्यालाच आपले जीवन-मूल्य बनवतात. त्यांच्या दबावाला न जुमानता आमचे सरकार देशातील तमाम व्यवस्थांना जुन्या विचारांच्या कैदेपासून मुक्ती मिळवून देण्याचे काम करत आहे. एकेक करत आम्ही प्रत्येक क्षेत्राला निष्क्रियतेच्या सोयिस्करपणातून बाहेर काढत आहोत. डीबीटी .. थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आम्ही या परिस्थितीत खूप मोठे परिवर्तन घडवून आणले आणि हजारो कोटी रुपये अयोग्य हातात जाण्यापासून वाचवले.

रेरा कायदा तयार करून आम्ही गृहनिर्माण क्षेत्राला काळ्या पैशाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी खूप मोठे पाऊल उचलले आहे आणि मध्यम वर्गाची झेप त्याच्या स्वप्नातील घरापर्यंत नेली आहे.

मुक्तीचे हे अभियान कॉर्पोरेट जगात देखील चालले. आयबीसी बनवून आम्ही परिस्थिती बदलली आणि हजारो कोटी रुपयांची वसुली सुनिश्चित करण्याबरोबरच संकटात सापडलेल्या कंपन्यांना मार्ग देखील दाखवला. यापूर्वी आपल्याकडे एकेरी मार्ग होता, आत येऊ शकत होतो, मात्र बाहेर पडू शकत नव्हतो. आम्ही बाहेर पाडण्यासाठी देखील संधी निर्माण केल्या आहेत.

मुद्रा योजना आणून आम्ही बँकिंग व्यवस्थेला जुन्या विचारांतून बाहेर काढले आणि ११  लाख कोटी रुपयांहून अधिक निधी आम्ही बँक हमीशिवाय लोकांना, युवकांना, महिलांना , नवउद्योजकांना स्वयंरोजगारासाठी दिला. आम्ही संरक्षण दलांच्या प्रमुखाचे पद - CDS निर्माण करून जैसे थे परिस्थिती बदलली आणि आपल्या सैन्यदलांमध्ये उत्तम समन्वय आणि सहकार्य सुनिश्चित केले. सामान्य वर्गातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देऊन आम्ही व्यवस्थेत  एक मोठे परिवर्तन घडवले आणि गरीबांची खूप मोठी चिंता दूर केली.

मित्रांनो ,

2014 पासून देश सहकार्याची भावना, एकत्रित कृती आणि कल्पनांची जोड देऊन पुढे वाटचाल करत आहे. आज भारत शाश्वत विकासाचे एक असे मॉडेल तयार करत आहे , जे संपूर्ण जगासाठी लाभदायक ठरेल. जगातील सर्वात मोठा वित्तीय समावेशन कार्यक्रम , जगातील सर्वात मोठा स्वच्छता कार्यक्रम , जगातील सर्वात मोठी आरोग्य हमी योजना अशा अनेक योजना आहेत ज्यांचे अनुभव जगाच्या विकासात मदत करत आहेत. 21 व्या शतकातील भारत खूप काही शिकत आहे आणि देशातील लोकांपर्यंत विकासाचा लाभ पोहचवण्यासाठी तितकाच तत्पर देखील आहे.

मित्रांनो ,

वेगवेगळ्या क्षेत्रांवर, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत. 6 वर्षांपूर्वी देशात महामार्ग बांधणीचा वेग दररोज सुमारे 12 किलोमीटर होता. आज हा वेग  30 किलोमीटरच्या आसपास आहे. 6 वर्षांपूर्वी  स्थिति अशी होती कि एका वर्षात  600 किलोमीटर रेलवे मार्गाचे विद्युतीकरण होत होते. गेल्या वर्षी आम्ही 5300 किलोमीटर रेलवे मार्गाचे विद्युतीकरण केले आहे. 6 वर्षांपूर्वी , आपले विमानतळ अंदाजे 17 कोटी प्रवासी हाताळत होते. आता ही संख्या 34 कोटींहून अधिक झाली आहे.

6 वर्षांपूर्वी , आपल्या प्रमुख बंदरांवर माल वाहतुक सुमारे 550 दशलक्ष टनच्या आसपास होती. आता ती वाढून  700 दशलक्ष टनच्या जवळ पोहचली आहे. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट झाली आहे, ज्याकडे तुमचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. ती म्हणजे प्रमुख बंदरांवर  6 वर्षांपूर्वी जहाजांसाठी प्रतीक्षा कालावधी ( Turn Around Time) सुमारे 100 तासांच्या आसपास होता. आता तो कमी होऊन 60 तासांवर आला आहे. तो आणखी कमी करण्यासाठी निरंतर काम सुरु आहे.

मित्रानो, ही  5-6 उदाहरणे संपर्क व्यवस्थेशी निगडित आहेत. इथे या सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे  कि संपर्क , पायाभूत सुविधा, शासन याचा आर्थिक घडामोडीवर किती प्रभाव पडतो. एवढे मोठे परिवर्तन असेच झाले ? नाही. आम्ही सरकारी विभागातील अनास्था संपवण्यासाठी प्रयत्न केले, काटेकोर प्रयत्न केले आणि सहकार्यावर भर दिला. तळाशी जाऊन सर्व गोष्टी सुधारल्या. आज विमानतळांवर जे काम होत आहे, रेल्वे स्थानकांवर काम सुरु आहे ते तुम्ही देखील पाहत आहात. आपल्या देशातील लोकांना काय मिळायला हवे होते आणि त्यांना काय मिळाले, यातील फरक जाणून घेणे देखील खूप गरजेचे आहे.

मित्रांनो , काही वर्षांपूर्वी दररोज रेल्वे फाटकांवर अपघात घडल्याच्या बातम्या यायच्या. का? कारण  2014 पूर्वी देशात ब्रॉडगेज मार्गावर जवळपास  9 हजार मानवरहित रेल्वे क्रॉसिंग होती. 2014 नंतर आम्ही अभियान राबवून ब्रॉडगेज रेलवे मार्ग मानवरहित रेल्वे क्रॉसिंगपासून मुक्त केला. अशीच काहीशी परिस्थिती जैव-शौचालयांची देखील होती. पूर्वीच्या सरकारच्या काळात तीन वर्षात 9 हजार 500 जैव-शौचालये उभारण्यात आली होती. आमच्या सरकारने गेल्या 6 वर्षात रेल्वेच्या डब्यांमध्ये सव्वा दोन लाखांहून अधिक जैव-शौचालये उभारली. कुठे 9 हजार आणि कुठे सव्वा दोन लाख.

मित्रांनो , कुणी कल्पना करू शकले नसते … कि भारतात रेल्वेगाडीला विलंब होणे …बहुधा हे बातम्यांच्या कक्षेच्या बाहेर गेले …हे तर होतच असते .. ट्रेनला  तर उशीर होतोच.  या देशात प्रथमच अशी संस्कृती आणण्यात आली जिथे रेल्वेगाडीला विलंब झाला तर प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले जात आहेत. …सुरुवात केली आहे. अनेक विमानकंपन्या देखील विलंब झाला तर पैसे परत देत नाहीत, मात्र आज रेल्वेगाडीला विलंब झाला तर प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले जात आहेत. तेजस रेल्वेगाडीने प्रवास करणाऱ्यांना आम्ही ही सुविधा दिली आहे. आम्हाला माहित आहे हे किती जोखमीचे काम आहे. आरटीआयवाले लगेचच आज रात्री आरटीआय टाकतील. … पत्रकार देखील सरसावतील …विचारतील किती पैसे परत केले …  मात्र आम्हाला आनंद आहे कि एवढा विश्वास आहे कि देशाला त्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. …जिथे जर रेल्वेगाडीला विलंब झाला तर सरकार जबाबदार असेल.

मित्रांनो ,

आर्थिक असो किंवा सामाजिकआज देश परिवर्तनाच्या एक मोठ्या कालखंडातून मार्गक्रमण करत आहे.

गेल्या काही वर्षात भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा अधिक मजबूत घटक बनला आहे. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी आहे कि जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत आणि कठीण स्थितीत आहे. मात्र तरीही, त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा कमीत कमी होईल .. याबाबत जितक्या उपाययोजना करता येतील …जितक्या सक्रिय कृती करता येतील .. आम्ही करत आलो आहोत .. आणि त्याचा लाभ देखील मिळाला आहे. आमची धोरणे स्पष्ट आहेत, आमची मूलभूत तत्वे मजबूत आहेत. आता अलिकडेच भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.  2014 मध्ये जेव्हा आम्ही सत्तेवर आलो होतो तेव्हा आपण  11 व्या स्थानावर होतो .. आता पाचव्या स्थानावर पोहचलो आहोत.

मित्रांनो , भारताने  5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे यासाठी आमचे सरकार चार वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहे.

एक - खासगी क्षेत्राबरोबर सहकार्य

दोन - निकोप स्पर्धा

तीन - संपत्ती निर्मिती

आणि चार - वित्तीय तूट कमी करणे

मित्रांनो , आम्ही पायाभूत क्षेत्रात 100 लाख कोटी  रुपयांहून अधिक गुंतवणुकीची रूपरेषा आखली आहे. आम्ही सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP द्वारे)  PPP ला बळ देण्याचा मार्ग निवडला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून देशाच्या विकासाला शक्तिशाली पुरोगामी बळ !!!

हा देखील एक अनुभव आला आहे, ज्या क्षेत्रात खासगी क्षेत्राला स्पर्धा करण्याची सूट दिली जाते, ते वेगाने पुढे वाटचाल करते. म्हणूनच आमचे सरकार अर्थव्यवस्थेची जास्तीत जास्त क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुली करत आहे.

मित्रांनो ,

प्रामाणिकपणे जे पुढे येत आहेत, स्पर्धा करत आहेत, संपत्ती निर्माण करत आहेत, त्यांच्याबरोबर सरकार ठामपणे उभे आहे. त्यांच्यासाठी कायदा नियमितपणे सुलभ बनवला जात आहे, जुने कायदे रद्द केले जात आहेत. निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी आम्ही भ्रष्टाचार आणि पक्षपातीपणा, दोन्हीचा कठोरपणे सामना करत आहे. बँकिंग असो, थेट परकीय गुंतवणूक असो, किंवा मग नैसर्गिक साधनसंपत्तीचे वाटप, प्रत्येक ठिकाणाहून पक्षपातीपणा हटवला जात आहे. आम्ही भर दिला आहे -सुलभीकरणावर, सुसूत्रीकरणावर , पारदर्शकतेवर. करविषयक तंटे सोडवण्यासाठी आता आम्ही या अर्थसंकल्पात विवाद से विश्वास नावाची नवी योजना घेऊन आलो आहोत. कामगार सुधारणेच्या दिशेने देखील आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आता परवाच, सरकारने कंपनी कायद्यात मोठा बदल करतानाच, अनेक तरतुदीचे गुन्हेगारीकरण कमी केले आहे. 

मित्रांनो , आज भारत जगातील त्या प्रमुख देशांपैकी आहे जिथे कॉर्पोरेट कर सर्वात कमी आहे. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीत केवळ 5 वर्षात विक्रमी 77 स्थानांची सुधारणा करणारा देश देखील भारतच आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास सातत्याने वाढतच आहे. काही वेळापूर्वी इथेच तुम्ही  ब्लैकस्टोनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे भाषण ऐकले. ते म्हणत होते भारत जगात सर्वाधिक परतावा देतो आणि ते त्यांची गुंतवणूक दुपटीने वाढवण्याचा विचार करत आहेत.

मित्रांनो , 2019 मध्ये देशात सुमारे 48 अब्ज डॉलर्स इतकी थेट परदेशी गुंतवणूक आली. ही वाढ 16 टक्क्यांहून अधिक आहे. अशाच प्रकारे भारतात मागील वर्षी 19 अब्ज डॉलर्स खासगी समभाग आणि व्हेंचर भांडवली गुंतवणूक आली. यातही 53 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. परदेशी पोर्टफोलीओ गुंतणूकदार देखील आता गुंतवणूक वाढवत आहेत. गेल्या वर्षी ही गुंतवणूक सुमारे १९ अब्ज डॉलर्स एवढी होती. स्पष्ट आहे कि, नवीन पर्यायांचा शोध घेणारे गुंतवणूकदार देखील आता भारताच्या दिशेने पुढे येत आहेत.

मित्रांनो ,

आमचे सरकार सर्व हितधारकांबरोबर सातत्याने संपर्कात आहे , नियमितपणे फीडबैक प्रतिसाद जाणून घेत प्रत्येक स्तरावर मोठे निर्णय घेत आहेत जैसे थे स्थितीपासून भारताला मुक्ती देताना आम्ही राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सहकार्यातून निर्मितीच्या दिशेने पुढे जात आहोत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा भारताला जवळपास पूर्ण जगाचे प्रोत्साहान मिळाले होते. आणि बहुधा युएनच्या इतिहासात कुठल्याही प्रस्तावाला जगातील एवढ्या देशांचे समर्थन प्रथमच मिळाले असेल. आणि योगाचा प्रभाव  हा आहे कि बहुधा प्रथमच तुमच्या समिटमध्ये एखाद्याने ध्यानधारणा केली असेल.

मित्रांनो ,

आज भारत शांतता राखणाऱ्या दलांमध्ये सर्वाधिक भागीदारी करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे. अन्य देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वात अगोदर पुढे येत आहे. एवढेच नाहीतरआज भारत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या निर्माणात फार मोठी भूमिका बजावत आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेल किंवा मग आपत्ती संवेदनक्षम पायाभूत विकास आघाडी , भविष्याला दिशा देणाऱ्या अशा संस्था भारताच्या पुढाकाराने सुरु झाल्या आहेत आणि आज सम्पूर्ण जग यात सहभागी होत आहे. मात्र, मित्रांनो, जैसे थे परिस्थितीचे समर्थन करणाऱ्या, बदलांना विरोध करणाऱ्या शक्ती जशा आपल्या देशात आहेत, तशा शक्ती आता जागतिक स्तरावर देखील भक्कमपणे एकजूट होत आहेत.

मित्रांनो, इतिहासात एक कालखंड असा होताज्यात प्रत्येकजण संघर्षाच्या मार्गावर चालत होता. तेव्हा म्हटले जायचे - Might is Right. मग एक असा टप्पा आला ज्यात हा विचार अग्रेसर राहिला कि आपण या गटासोबत राहिलो तरच टिकू शकू. तो काळही गेला. नंतर एक काळ असाही आला- लोकांनी गट-निरपेक्षतेचा देखील प्रयत्न केला. नंतर असेही एक युग आले ज्यात उपयुक्ततेच्या आधारे संबंध विकसित करण्याचा विचार वरचढ राहिला.

आता आजचे युग पहा. तंत्रज्ञानाच्या या युगात आज जग एकमेकांशी जोडलेले आहे, एकमेकांशी संबंधित आहे आणि एकमेकांवर अवलंबून देखील आहे. हे याच शतकातील बदल आहेत... जागतिक स्तरावर झालेले बदल आहेत.

मात्र तरीही, एका जागतिक कार्यक्रमासाठी , एखाद्या जागतिक उद्दिष्टासाठी एक खूप मोठा संकल्प - जगातील गरीबी दूर कशी करता येईल, दहशतवाद कसा संपवता येईल, हवामान बदलाच्या समस्यांना कसे हाताळायचे .... आजही जग एका मंचावर येऊ शकत नाही. आज संपूर्ण जगाला याची प्रतीक्षा आहे , मात्र ते होत नाही.

मित्रांनो,

21 वे शतक हे अनेक संधींनी भरलेले आहे. या संधींमध्ये, आज एक सामायिक जागतिक आवाजाची उणीव जाणवत आहे. एक असा आवाज, ज्यात स्वर भले वेगवेगळे असतील, मात्र ते एकत्र येऊन एक सूर निर्माण करतील, एका सुरात आपला आवाज उठवतील. आज सम्पूर्ण जगासमोर हा प्रश्न आहे कि बदलत्या स्थितीशी  कसेही जुळवून मार्गक्रमण करणे किंवा मग नव्या पद्धतीने नवीन मार्ग विकसित करणे.

मित्रांनो,

बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील खूप व्यापक बदल केले आहेत. एक काळ होता, जेव्हा भारत तटस्थ होता, आपण तटस्थ होतो, मात्र देशांबरोबर समान अंतर कायम होते. बदल कसा झाला आहे  --- आजही भारत तटस्थ आहे, आपण  तटस्थ आहोत, मात्र लांब राहिल्यामुळे नाही, मैत्रीच्या आधारे. आम्ही सौदी अरेबियाशी देखील मैत्री करतो... इराणबरोबर देखील मैत्री करतो. आम्ही अमेरिकेबरोबर देखील मैत्री करतो…. रशियाबरोबर देखील मैत्री करतो. मात्र तरीही आम्ही तटस्थ आहोत … एक काळ होता जेव्हा लोक समान अंतर ठेवून तटस्थ होते, आम्ही  समान मैत्री करून तटस्थ आहोत. त्या कालखंडात अंतर राखून वाचण्याचा प्रयत्न केला गेला. आज आम्ही मैत्री कायम ठेवून एकत्र चालण्याचा प्रयत्न करत आहोत. हे भारताचे आजचे परदेश धोरण आहे, भारताच्या आजच्या आर्थिक धोरणाचे खूप मोठे सार आहे.

मित्रांनो, मी महात्मा गांधीजींच्या एका वाक्याने माझे भाषण संपवत आहे. गांधीजी म्हणायचे  कि मला भारताची प्रगती यासाठी हवी आहे जेणेकरून संपूर्ण जग त्याचा लाभ उठवू शकेल."या एका वाक्यात जागतिकीकरणाचा भारतीय विचार देखील आहे आणि भविष्यासाठी सहकार्याचा मंत्र देखील आहे.

मी पुन्हा एकदा या महत्वपूर्ण विषयावर मंथन करण्याची तुम्ही जी योजना आखली आहे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. आणि मला तुमच्याबरोबर सहभागी होण्याची संधी मिळाली , त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानत मी माझे भाषण संपवतो.

 धन्यवाद !!!

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 


(Release ID: 1607819) Visitor Counter : 189


Read this release in: English