आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
उच्चस्तरीय मंत्रीगटाच्या बैठकीत कोविड19 च्या सद्यस्थितीचा आढावा आणि प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापनाविषयीच्या कृतीची चर्चा
Posted On:
19 MAR 2020 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2020
कोविड19च्या सद्यस्थितीचा आढावा आणि प्रतिबंधाताम्क तसेच व्यवस्थापकीय कार्यवाहीविषयी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची आठवी बैठक आज नवी दिल्लीत झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध खात्यांचे मंत्री आणि कॅबिनेट सचिव राजीव गऊबा उपस्थित होते.
तासचे विविध विभागांच्या सचिवांनी या बैठकीत कोरोना आजाराबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. या बैठकीला तिन्ही सैन्यदले आणि निमलष्करी दलांचे अधिकारी देखील उपस्थित होते.
कोविड19 च्या जागतिक साथीच्या आजाराशी लढण्यासाठीचे व्यवस्थापन कसे सुरु आहे, याचा आढावा यावेळी घेण्यात आला. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने देशभरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेऊन आणखी काय करता येईल, याबाबत या बैठकीत शिफारसी केल्या.
देशातल्या कोरोना बाधित रुग्णांच्या स्थितीविषयी देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय, प्रवासासंदर्भात काही निर्णयही घेण्यात आले.
· 22 मार्च 2020 पासून 29 मार्च 2020 पर्यंतच्या काळातली सगळी परदेशातून येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या काळात भारतात कुठल्याही विमानतळावर एकही आंतरराष्ट्रीय विमान उतरणार नाही. पुढील सूचनेपर्यंत हे आदेश जारी राहतील.
· 22 मार्चच्या आधी येणाऱ्या विमानांमध्ये केवळ 20 तासांच्या प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.
· याच काळात, म्हणजेच, 22 मार्च 2020 पासून 29 मार्च 2020 भारतातूनही एकही विमान परदेशात जाणार नाही.
· कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या ह्या तात्पुरत्या उपयायोजना असून, सरकारतर्फे वेळोवेळी त्यांचा आढावा घेतला जाईल.
त्याशिवाय, सामाजिक अंतर पाळण्यासंदर्भात देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने 16 मार्च 2020 रोजी जारी केल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे अशा उपाययोजना या आजाराच्या फैलावाला प्रतिबंध घालण्यास उपयुक्त ठरत आहेत. जनतेने स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन सरकार वारंवार करत आहे.
श्रेणी ब आणि क च्या केवळ 50 टक्के सरकारी कर्मचारयांनी कार्यालयात जावे, इतरांनी घरुन काम करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा देखील वेगवगेळ्या असाव्यात.
या संदर्भातील सविस्तर सूचना कार्मिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://dopt.gov.in/sites/default/files/11013_9_2014_EsttAIII_19032020_English.PDF बघता येतील.
त्याशिवाय, राज्याराज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती बघून संबंधित राज्य सरकारे वेळोवेळी सूचना किंवा मार्गदर्शक तत्वे जारी करतील.
सर्व शैक्षणिक संस्था, सिनेमागृहे, वस्तू संग्रहालये, जीम सध्या बंद राहतील.
क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद राहतील.
सार्वजनिक वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात आले असून तिथे गर्दी होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे. रेल्वेनेही यासंदर्भात खबरदारी म्हणून प्रवाशांची गर्दी टाळण्याच्या उपाययोजना आणि प्रतिबंध लागू केले आहेत.
65 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घराबाहेर पडू नयेत अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
वैद्यकशास्त्रातील तज्ञांशी चर्चा करुन सर्व आरोग्य विभाग यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना वेळोवेळी जारी करत आहेत.
कोविड19 या आजाराचा सामना करण्यासाठी युवक आणि नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सैनिटायझर, मास्क अशा गोष्टींचा काळाबाजार रोखण्यासाठी औषधनिर्माण आणि ग्राहक व्यवहार मंत्रालय आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1607322)
Visitor Counter : 200