विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19च्या संसर्गजन्य परिस्थितीत किडनीचे रुग्ण अधिक असुरक्षित


डायलिसिसवरील रुग्णांची जोखीम कमी करण्यासाठी व्यवस्थापन काटेकोर असणे आवश्यक

‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ वेबसाइटवर मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 20 MAR 2020 3:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मार्च 2020

 

कोविड-19 हा साथीचा रोग सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेल्या  आरोग्य प्रणालींसाठी मोठी  आव्हाने निर्माण करत आहे. नियमितपणे ‘हेमोडायलिसिस’ घेणार्‍या रूग्णांसाठी विशेषत: आव्हाने निर्माण होऊ शकतात. मूत्रपिंडांचे क्षतिग्रस्त रुग्ण, ज्याला ‘युरेमिक’ रूग्ण म्हणून ओळखले जाते, त्यांना विशेषत: संसर्गाची जोखीम असते आणि वैद्यकीय लक्षणे तसेच संसर्गजन्यतेमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो.

इतर जोखीम असलेल्या व्यक्तींप्रमाणेच, या रुग्णांना घरी न राहणे आणि इतरांशी संवाद न साधणे शक्य नसते. त्यांना जास्त धोका असूनही, दर आठवड्यात 2-3 वेळा डायलिसिस सेंटरमध्ये जावे लागते. यामुळे जोखीम लक्षणीय वाढते. त्यामुळे स्वतः रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, या रुग्णाशी संपर्कात येणारे वैद्यकीय आणि सुविधा कर्मचारी या सर्व लोकांमध्ये संक्रमणाचा प्रसार होऊ शकतो, अशी माहिती ‘जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ इंडिया’चे कार्यकारी संचालक आणि ‘नेफ्रॉलॉजी’च्या ‘इंटरनॅशनल सोसायटी’चे अध्यक्ष प्रा. विवेकानंद झा यांनी दिली.

चीनसह जगभरातील नेफ्रोलॉजिस्टच्या तज्ज्ञ गटाने लिहिलेले द नोव्हेल कोरोना व्हायरस 2019 महामारी आणि मूत्रपिंड या शीर्षकाच्या पेपरमध्ये असे निदर्शनास आणून दिले आहे की डायलिसिसच्या रूग्णांसह राहणाऱ्या सर्व कुटुंब सदस्यांनी सांगितलेल्या खबरदारीचे व नियमांचे पालन केलेच पाहिजे. यामध्ये शरीराचे तापमान मोजणे, उत्तम वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे आणि संभाव्य आजारी लोकांची त्वरित नोंद करणे समाविष्ट आहे. या अभ्यासाचे निकाल ‘जर्नल किडनी इंटरनॅशनल’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

प्रा. झा यांनी सांगितले की, डायलिसिसवरील रुग्णांना कोविड-१९च्या संपर्कात असल्याचा संशय आला तर मार्गदर्शक तत्वांचे कडक पालन केले जावे; जेणेकरुन या रुग्णांची काळजी घेणार्‍या इतर रूग्ण आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना धोका कमी होईल. ‘इंटरनेशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी वेबसाइट’वर ही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

       

B.Gokhale/S.Nilkanth/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1607311) आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English