पंतप्रधान कार्यालय
कोविड-19प्रतिबंधासाठी पंतप्रधानांचे देशाला आवाहन
22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ यादरम्यान “जनता कर्फ्यू” पाळण्यात येणार
निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचे 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता नागरिक आभार मानणार
जागतिक साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी कोविड-19आर्थिक प्रतिसाद कृती दल स्थापन करणार
भीतीपोटी साठा करण्यासाठी खरेदी टाळण्याचा पंतप्रधानांचा सल्ला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याची दिली हमी
Posted On:
19 MAR 2020 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2020
कोविड-19च्या आव्हानाला तोंड देण्यासंदर्भात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. ‘नवरात्र’ पर्वाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जनतेला नऊ आवाहने केली आहेत.
जगभरात हाहाकार उडवणाऱ्या या जागतिक साथीचा मुकाबला करण्यासाठी भारतीयांचा संयम आणि निर्धार अतिशय महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अतिशय झपाट्याने पसरणाऱ्या या विषाणूला आळा घालण्यासाठी काही विशिष्ट उपायांचा अवलंब करण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे. या जागतिक साथीचे गांभीर्य दुर्लक्षित न करण्याच्या महत्त्वावर आणि कोविड-19च्या प्रतिबंधासाठी जागरुक आणि सक्रिय राहण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
‘ज्यावेळी आपण निरोगी असतो, त्यावेळी संपूर्ण जग निरोगी असते’ या मूलमंत्राचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.सोशल डिस्टन्सिंग अर्थात सुरक्षित अंतर राखण्यासारख्या स्वयंनियमनाचे पालन करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. या नियमाचा अंगिकार करताना नागरिकांनी स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवावे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावे,तसंच घरूनच काम करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, अशी विनंती त्यांनी केली. येत्या काही आठवड्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. रुग्णालयांवर असलेला ताण विचारात घेऊन या काळात आपल्या नेहमीच्या तपासण्या टाळण्यावर आणि जिथे शक्य असेल तिथे शस्त्रक्रियांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची देखील त्यांनी विनंती केली.
“जनता कर्फ्यू”
22 मार्च 2020 रोजी सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान जनता कर्फ्यू” या संकल्पनेचे पालन करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली. अत्यावश्यक सेवांशी संबंधित असलेल्यांव्यतिरिक्त इतर कोणीही या काळात घराबाहेर पडू नये, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या लोकचळवळीच्या यशामुळे आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवामुळे यापुढील काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज होऊ शकू, असे ते म्हणाले. 22 मार्च रोजी आपण जे प्रयत्न करणार आहोत ते आपल्या स्वयंनियमनाचे आणि राष्ट्रहितासाठी कर्तव्य बजावण्याच्या निर्धाराचे प्रतीक असेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
राज्य सरकारांनी या कामी पुढाकार घेण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी एनसीसी आणि एनएसएस सारख्या सर्व युवा संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी लोकांमध्ये जनता कर्फ्यू बाबत जागरुकता निर्माण करावी असे सांगितले.आपण स्वतःहून लागू करणाऱ असलेल्या या संचारबंदीबाबत किमान इतर दहा लोकांना फोनवरून प्रत्येकाने माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचे आभार प्रदर्शन
वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, सरकारी कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी, प्रसारमाध्यमातील कर्मचारी, बस/ट्रेन/ ऑटो चालक आणि घरपोच सेवा पुरवणाऱे असे अनेक धाडसी लोक सध्या आपली सेवा करत आहेत.
अतिशय कठीण प्रसंगात हे लोक करत असलेल्या महान देशसेवेबाबत आदरभाव व्यक्त करण्यासाठी 22 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता देशातील सर्व नागरिकांनी त्यांच्या घरांच्या सज्जांमध्ये, दरवाजांमध्ये उभे राहून पाच मिनिटे टाळ्या वाजवाव्यात किंवा घंटानाद करावा आणि त्यांच्या सेवेचे कौतुक करावे, असे पंतप्रधानांनी आवाहन केले. यासाठी देशभरातील स्थानिक प्रशासनांनी संध्याकाळी पाच वाजता सायरन वाजवून लोकांना या वेळेची सूचना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
आर्थिक आव्हानांचा मुकाबला
या जागतिक साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड-19आर्थिक प्रतिसाद कृती दल स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. हे कृती दल सर्व संबंधितांशी विचारविनिमय करेल, त्यांच्याकडून माहिती घेईल आणि त्यांच्या आधारे या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेईल.
व्यापारी समुदाय आणि उच्च उत्पन्न गटांनी विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या अल्प उत्पन्न गटांच्या आर्थिक गरजा विचारात घ्याव्यात, कामावर येण्यासाठी त्यांची असमर्थता लक्षात घेऊन ते ज्या दिवशी अनुपस्थित राहतील, त्या दिवसांचे त्यांचे वेतन कापू नये, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. या काळात मानवतेचे महत्त्व लक्षात घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
अन्न, दूध, औषधे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसल्याची हमी पंतप्रधानांनी दिली. लोकांनी भीतीपोटी घाईगडबडीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून साठेबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कोविद-19च्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आणि संपूर्ण योगदान देण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये, अशी सूचना त्यांनी केली. अशा जागतिक साथीच्या काळात मानवतेचा आणि भारताचा विजय होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
M.Chopade/S.Patil/P.Kor
(Release ID: 1607293)
Visitor Counter : 198