पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 च्या जागतिक साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण

Posted On: 19 MAR 2020 11:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मार्च 2020

नमस्कार!

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

संपूर्ण जग सध्या संकटाच्या अत्यंत मोठ्या आणि गंभीर काळातून जात आहे. साधारणपणे जेव्हा काही नैसर्गिक संकटे येतात तेव्हा ती काही देश आणि राज्यांपुरतीच मर्यादित राहतात. मात्र या वेळी हे असे संकट आले आहे, ज्याने जगभरात संपूर्ण मानवजातीलाच संकटाने व्यापले आहे. जेव्हा पहिले महायुद्ध झाले होते, जेव्हा दुसरे महायुद्ध झाले होते  तेंव्हाही इतके देश त्या युद्धामुळे प्रभावित झाले नव्हते, जितके आज कोरोनाच्या आजाराने प्रभावित झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आपण सातत्याने जगभरातून येणाऱ्या कोरोना विषाणूशी संबंधित चिंताजनक बातम्या बघत आहोत, ऐकत आहोत. या दोन महिन्यात भारतातल्या 130 कोटी नागरिकांनी कोरोना सारख्या जागतिक साथीच्या आजाराचा खंबीरपणे सामना केला आहे. सर्व देशवासियांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्नही केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असंही वातावरण तयार झालं आहे की जणू आपण या संकटापासून सुरक्षित आहोत. असे वाटतंय की सर्व काही ठीक आहे. कोरोनाच्या आजाराबद्दल आपली ही निश्चिंत वृत्ती योग्य नाही. खरे तर प्रत्येक भारतीयाने, सध्या सजग राहणे, सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो,

मी जेव्हा जेव्हा तुम्हाला जे काही मागितले आहे, माझ्या देशबांधवांनी मला कधीही निराश केलेलं नाही. तुमच्या आशीर्वादाच्या शक्तीमुळेच आपले सगळे प्रयत्न यशस्वी होतात. आज मी सर्व देशबांधवांना, 130 कोटी नागरिकांना, आपल्याला काही मागायला आलो आहे.

मला तुमचे येणारे काही आठवडे हवे आहेत. तुमचा येणारा काही काळ हवा आहे. मित्रांनो, अजून विज्ञानाला कोरोनाच्या आजारापासून बचाव करू शकेल असा कुठलाही उपाय सापडलेला नाही. या आजारासाठी कुठलीही लस अद्याप विकसित झालेली नाही. अशा स्थितीत प्रत्येकाची चिंता वाढणे अत्यंत स्वाभाविक आहे.

जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा अधिक प्रभाव दिसतो आहे, त्या देशांविषयीच्या अध्ययनातून आणखी एक तथ्य समोर आलं आहे. या देशांमध्ये सुरवातीच्या काही दिवसांनंतर अचानक या आजाराचा जणू विस्फोट झाला. या देशांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या अत्यंत वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीवर आणि कोरोना आजाराच्या फैलावाच्या पद्धतीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. तसे तर काही देश असेही आहेत ज्यांनी अत्यंत वेगाने  निर्णय घेऊन आपल्या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त वेगळे ठेऊन स्थिती नियंत्रणात आणली आहे. आणि त्यात नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे.

भारतासारख्या 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशासमोर, विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या देशासमोर कोरोनाचं हे वाढते संकट सर्वसामान्य गोष्ट नाही. आज जेव्हा आपण मोठमोठ्या आणि विकसित देशांमध्ये कोरोना या जागतिक महामारीचा व्यापक प्रभाव बघतो आहोत, तेंव्हा अशा स्थितीत भारतावर याचा काही परिणाम होणार नाही, असं समजणं चुकीचं आहे.

आणि म्हणूनच या आजाराचा सामना करण्यासाठी दोन मुख्य गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

पहिली – संकल्प आणि दुसरी – संयम

आज 130 कोटी देशबांधवांना, आपला संकल्प आणखी दृढ करायचा आहे की आपण या जागतिक साथीच्या आजाराला रोखण्यासाठी एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन करू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्णतः पालन करू.

आज आपल्याला हा संकल्प करायचा आहे की आपण स्वतःला या आजाराचे संक्रमण होऊ देणार नाही आणि इतरांनाही संक्रमित होण्यापासून वाचवू.

मित्रांनो,

या सारख्या जागतिक साथीच्या आजारात एकच मंत्र उपयुक्त ठरतो –

आपण निरोगी तर जग निरोगी’

आज अशा स्थितीत, जेंव्हा या आजारावर काहीही औषध उपलब्ध नाही तेंव्हा आपण स्वतः निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी आणि स्वतः निरोगी राहण्यासाठी संयम अनिवार्य आहे.आणि संयमाची पद्धत काय आहे, तर गर्दीची ठिकाणे टाळणे, घरातून बाहेर निघणे टाळणे. आजकाल ज्याला सामाजिक अंतर पाळणं (social distance)म्हटलं जातं. कोरोना आजाराच्या काळात हे अत्यंत आवश्यक आहे आणि उपयुक्त देखील आहे.  आपला संकल्प आणि संयम या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव कमी करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे.

आणि म्हणूनच जर आपल्याला वाटत असेल की आपण निरोगी आहोत, आपल्याला काही होणार नाही, आपण असेच बाजारात, रस्त्यांवर फिरत राहू आणि तरीही कोरोनापासून सुरक्षित राहू, तर हा आपला गैरसमज आहे. असं वागून तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबावर, तुमच्या जवळच्या लोकांवर अन्याय कराल. म्हणूनच, माझी सर्व देशबांधवांना ही आग्रही विनंती आहे की येत्या काही आठवड्यात अत्यावश्यक असेल तेंव्हाच घरातून बाहेर पडा. जितकं शक्य आहे, तितकं आपलं काम, मग ते व्यवसायाशी संबंधित असो, कार्यालयीन काम असो, ते घरूनच करा.

जे लोक सरकारी सेवांमध्ये कार्यरत आहेत, रुग्णालयात कार्यरत आहेत, लोकप्रतिनिधी, माध्यमांत काम करणारी माणसे या सगळ्यांना कामावर जाणे आवश्यक आहे मात्र यांना वगळता समाजातल्या इतर सर्व लोकांनी स्वतःला बाकी समाजापासून विलग करायला हवे.

माझा आणखी एक आग्रह आहे की आपल्या कुटुंबात जे वरिष्ठ नागरिक असतील, म्हणजे 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, त्यांनीही येत्या काही आठवड्यात घरातून बाहेर पडू नये. मी पुन्हा आग्रह करतो, आपल्या कुटुंबात जे वरिष्ठ नागरिक असतील, म्हणजे 65 वर्षांच्या वरच्या वयाच्या व्यक्ती, त्यांनीही येत्या काही आठवड्यात घरातून बाहेर पडू नये.

आजच्या पिढीला कदाचित या गोष्टीची फारशी कल्पना नसेल. मात्र जुन्या काळी, जेव्हा मी लहान होतो, जेव्हा युद्धाची परिस्थिती असे, तेव्हा गावागावात Black-out केले जायचे. घरातल्या खिडक्यांच्या काचांवर काळे कागद लावले जायचे. दिवे बंद केले जायचे. लोक ठीक-ठिकाणी पहारा देत असत. हे तर अनेकदा दीर्घकाळ चालत असे. युद्धाची परिस्थिती नसेल तरीही अनेक जागरूक नगरपालिका Black-out ची तालीम करत असत.

मित्रांनो,

आज मी प्रत्येक देशबांधवाकडे आणखी एका गोष्टीसाठी समर्थन मागतो आहे. ती गोष्ट म्हणजे जनता कर्फ्यू. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेनं जनतेसाठी स्वतःवरच लावलेली संचारबंदी.

या रविवारी म्हणजेच 22 मार्चला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशबांधवांना जनता कर्फ्यूचे पालन करायचे आहे. या काळात आपण घराबाहेर पडायचं नाही, रस्त्यावर जायचं नाही, आपल्या परिसरातही फिरायचे नाही. फक्त आवश्यक सेवांशी संबंधित लोकच 22 मार्चला आपल्या घराबाहेर निघतील.

मित्रांनो, 22 मार्चचा आपला हा प्रयत्न, आपल्या आत्मसंयमाचे, देशहितासाठी कर्तव्यपालनाचा संकल्प करण्याचे एक प्रतिक ठरेल. 22 मार्चला होणाऱ्या जनता कर्फ्यूचे यश, याचा अनुभव आपल्याला येणाऱ्या संकटासाठीही सज्ज करणार आहे. मी देशातील सर्व राज्य सरकारांना देखील आग्रह करेन की त्यांनीही जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे नेतृत्व करावे. एनसीसी, एनएसएस शी संबंधित युवक, नागरी समाज, सर्व प्रकारच्या संघटना, या सर्वांनाही माझी विनंती आहे की आतापासून पुढचे दोन दिवस सर्वांना जनता कर्फ्यूविषयी माहिती द्या.

शक्य असेल तर प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी किमान दहा जणांना फोन करून कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्याच्या उपायांबरोबरच जनता कर्फ्यु बाबतही माहिती द्यावी.

मित्रहो,

हा जनता कर्फ्यु एकप्रकारे आपल्यासाठी,भारतासाठी एका परिक्षेप्रमाणे आहे.

कोरोना सारख्या जागतिक महामारी, साथरोगाशी मुकाबला करण्यासाठी भारत किती सिद्ध आहे,हे पाहण्याची आणि पडताळण्याची ही वेळ आहे.

आपल्या या प्रयत्नांबरोबरच, जनता कर्फ्युच्या दिवशी 22 मार्चला मी आपल्याकडून आणखी एक सहकार्य घेऊ इच्छितो.

मित्रहो,

गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लोक, रुग्णालयात, विमानतळावर अहोरात्र काम  करत आहेत.मग ते डॉक्टर, परिचारिका , रुग्णालयाचे कर्मचारी, सफाई काम करणारे बंधू- भगिनी, विमान कंपन्यांचे कर्मचारी असोत, सरकारी कर्मचारी असोत, पोलीस असोत माध्यमात काम करणारे असोत, रेल्वे, बस, रिक्षा सुविधेशी संबंधित लोक असु देत,घरी वस्तू पोहोचवणाऱ्या व्यक्ती असु देत, हे लोक आपली पर्वा न करता दुसऱ्यांची सेवा करण्यात मग्न आहेत.

आजची परिस्थिती पाहता या सेवा सामान्य नाहीत.

या व्यक्तींना स्वतः संक्रमण किंवा लागण होण्याचा धोका आहे. तरीही या व्यक्ती आपले कर्तव्य बजावत आहेत, दुसऱ्यांची सेवा करत आहेत. कोरोना आणि आपण यांच्या मध्ये  हे राष्ट्र रक्षकाप्रमाणे, उभे आहेत. देश अशा सर्व छोट्या मोठ्या व्यक्तींच्याप्रती कृतज्ञ आहे. 22 मार्चला रविवारी अशा सर्व लोकांना आपण धन्यवाद द्यावेत असे मला वाटते.

रविवारी ठीक 5 वाजता, आपण आपल्या घराच्या दरवाज्यात उभे राहून, बाल्कनीमध्ये, खिडकीसमोर 5 मिनिटे या लोकांप्रती आभार व्यक्त करावेत. टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून, घंटानाद करून आपण त्यांचा उत्साह वाढवूया.त्यांना सलाम करूया.

देशाच्या स्थानिक प्रशासनालाही माझा आग्रह राहील की 22 मार्चला 5 वाजता भोंग्याच्या आवाजाद्वारे याची सूचना लोकांपर्यंत पोहोचवा.

सेवा परमो धर्म या संस्काराचे पालन करणाऱ्या अशा देशवासीयांप्रती, श्रद्धापूर्वक आपण भावना व्यक्त करूया.

मित्रहो,

संकटाच्या या काळात, आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपल्या अत्यावश्यक सेवांवर, आपल्या रुग्णालयांवर कामाचा सतत ताण वाढत आहे.

म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की नियमित तपासण्या करण्यासाठी रुग्णालयात सध्या जाणे जितके टाळता येईल तितके टाळा.

आपल्याला खूपच आवश्यक वाटले तर आपल्या ओळखीचे डॉक्टर, फॅमिली डॉक्टर नाहीतर आपल्या नातेवाईकांपैकी जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून फोनवरच आवश्यक तो सल्ला घ्या.

इलेक्टिव्ह म्हणजे तातडी नसलेली शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण तारीख घेतली असेल तर त्या साठी पुढची तारीख घ्या, एक महिन्यानंतरची तारीख घ्या असा माझा आग्रह राहील.

मित्रहो,

या जागतिक साथ रोगाचा अर्थव्यवस्थेवरही व्यापक परिणाम होत आहे.

कोरोना जागतिक साथ रोगामुळे निर्माण होणारी आर्थिक आव्हाने लक्षात घेऊन सरकारने, वित्तमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड-19 आर्थिक प्रतिसाद कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे कृती दल, सर्व संबंधितांच्या नियमित संपर्कात राहून, त्यांच्याकडून प्रतिसाद घेत,परिस्थितीचे आकलन करत नजीकच्या भविष्यात निर्णय घेईल.

आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, हे कृती दल सुनिश्चित करेल.

हा साथ रोग, देशाचा मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग आणि गरीब जनतेच्या आर्थिक हिताचे मोठे नुकसान निश्चितच करत आहे.

संकटाच्या या काळात, देशातला व्यापारी वर्ग, उच्च उत्पन्न वर्गाने, आपण ज्यांच्या सेवा घेत आहोत त्यांचे आर्थिक हित शक्यतो लक्षात घ्यावे, असा माझा आग्रह आहे.

येत्या काही दिवसात हे लोक कदाचित कार्यालयात,आपल्या घरी येऊ शकणार नाहीत.

अशा परिस्थितीत त्यांचे वेतन कापू नये, मानवी दृष्टिकोन स्वीकारत, संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा.

कायम लक्षात राहू दे की त्यांनाही आपले कुटुंब चालवायचे आहे, आपल्या कुटुंबाचाही या आजारापासून बचाव करायचा आहे.

मी देशवासियांना आश्वस्त करतो की, देशात दूध, खाद्य वस्तू, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा  तुटवडा भासू नये यासाठी सर्व पावले उचलण्यात येत आहेत.

हे सामान साठवून ठेवण्यासाठी घाई गर्दी करू नका असे आवाहन मी देशवासियांना करतो.

आपण नेहमीप्रमाणे खरेदी करा, उतावीळ होऊन खरेदी करू नका.

मित्रहो,

गेल्या दोन महिन्यात 130 कोटी भारतीयांनी, देशाच्या प्रत्येक नागरिकाने,देशासमोर आलेल्या या संकटाला आपल्यावरचे संकट मानले आहे.

भारतासाठी,समाजासाठी जे आवश्यक आहे ते केले आहे.

येत्या काळातही आपण आपल्या कर्तव्याचे, आपल्या जबाबदारीचे असेच पालन करत राहाल असा मला विश्वास आहे.

अशा काळात काही समस्या येतात, शंका आणि अफवा यांचे वातावरण निर्माण होते, हे मी मानतो.

काही वेळा एक नागरिक म्हणून आपल्या अपेक्षांची पुर्तताही होत नाही.

तरीही हे संकट इतके मोठे आहे, वैश्विक आहे की एक देश दुसऱ्या देशाची मदतही करू शकत नाहीये, अशा वेळी साऱ्या देशवासियांना या सर्व आव्हानातूनही दृढ संकल्प ठेवत याचा मुकाबला करावा लागेल.

मित्रहो,

आपल्याला आपले सारे सामर्थ्य कोरोनापासून बचाव करण्यासाठी लावायचे आहे.

आज देशात, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, स्थानिक प्रशासन असो, पंचायत असो लोक प्रतिनिधी असोत किंवा समाज असो, प्रत्येक जण आपापल्या परीने या जागतिक महामारीपासून संरक्षण करण्यासाठी आपले योगदान देत आहे.

आपल्यालाही आपले संपूर्ण योगदान द्यायचे आहे.

जागतिक महामारीच्या या वातावरणात मानवजगत विजयी होणे, भारत विजयी होणे आवश्यक आहे.

काही दिवसात नवरात्रीचे पर्व येत आहे.

शक्ती उपासनेचे हे पर्व आहे.

भारताची संपूर्ण शक्तीने पुढे वाटचाल सुरू राहावी, आवश्यक संकल्प पाळून आपण स्वतःचा बचाव करू, देशालाही वाचवू आणि जगालाही वाचवू, ही मनापासून आशा आहे.

मी आग्रह करेन जनता कर्फ्यू साठी, आग्रह करेन सेवा करणाऱ्यांच्या धन्यवादासाठी 

तुमचाही खूप- खूप धन्यवाद.

 

RT/MC/NT/RA/PM

 


(Release ID: 1607266)
Read this release in: English